Friday, June 2, 2017

लवासा, सत्ताधारी व जनता


लवासा च्या २०१६ च्या ताळेबंद मध्ये लवासाची एकुण मिळकत (असेट्स) ३२८७०१.७५ लक्ष रुपये एवढी दाखविली आहे. हा आकडा लाखांत आहे. नीट समजुन घ्या, ३२८७०१.७५ लाख आहेत हे, ३ लाख नव्हे. म्हणजे ३,२८,७०,१०,७५,०००/- (तीनशे अठ्ठावीस अब्ज रुपये)रुपये एवढी एकुण मिळकत.(बर हा जाहीस केलेला आकडा आहे. जाहीर न केलेला खरा आकडा यापेक्षा चार पट जास्तच असेल)
लवासा कुणाच्या छत्रछायेखाली तयार झाले, व पडद्यामागचे खरे धनी कोण आहेत हे सर्वांना ठाऊक आहे. लवासाचा उद्य आणि विकास मागील १५ ते १७ वर्षात झालेला आहे. ज्या दुरदर्शी लोकांनी हे स्वप्न पाहीले व ते सत्यात उतरवले त्या लोकांस मानले पाहीजे.
आता गम्मत पहा...कॉन्ग्रेस गेली ७० वर्षे देशात व राज्यात सत्तेवर आहे, तर राष्ट्रवादी गेली १५ वर्षे पेक्षा जास्त काळ सत्तेत होती. या जनप्रतिनिधींना लवासास कर्ज, ना हरकत प्रमाणपत्रे, परवानग्या इत्यादी देता आले तसेच सत्ताधा-यांपैकी काहींचे शेयर्स देखील लवासामध्ये आहेत.
लवासा इतके मोठे होते, आर्थिक नफ्याचे नवनवीन टप्पे गाठते, तर त्याच सत्ताधा-यांना, शेतक-यांसाठी शेतीआधारीत उद्योग, लघुउद्योग, सुक्ष्म उद्योग आदी का करता येऊ नये?
केवळ नफेखोरी व स्वतःची व स्वतःच्या नातेवाईकांची घरे भरण्यासाठी यांनी सरकार चालवले अर्धशतकाहुन ही जास्त काळ. शेतकरीच नाही, तर कुशल अकुशल बलुतेदार, मजुर, भुमीहीन, अल्पभुधारक यांचा विचार फक्त कागदावरच राखीव जांगासाठीच केला गेला, व भोळी जनता आरक्षणाच्या प्रलोभनास बळी पडली.
वर्तमान सरकारला जर जनतेसाठी खरच काही करावयचे असेल तर, उद्योजकता विकसित करण्यावर अधिक भर दिला पाहीजे. मागणी आणि पुरवठ्याचे तंत्र समजुन स्थानिक पातळीवर विविध उत्पादने तयार करण्याचे कुटीरोद्योग गावोगाव निर्माण होतील याकडे लक्ष देण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी लागेल.
तसेच स्वतःस पुढारी म्हणवुन घेणारे, वाढदिवसाची बॅनर बाजी करणा-यांनी स्वतस एक प्रश्न विचारुन पहा, की तुमच्या मुळे असे किती कुटीरोद्योग निर्माण झाले व किती लोकांस रोजगार मिळाला?
स्वतःची पोळी भाजुन घेण्यात अधिक रस असल्याने मागील सत्ताधा-यांना समस्येचे नीटसे आकलन झालेच नाही. लोकनेत्यांनी, तथाकथित जाणत्या राजाने, दादाने, ताईने स्वतःचे हजारो क्लोन निर्माण केले त्यामुळे ह्या क्लोनांना त्यांच्या मुळ प्रतींमध्ये दोष दिसणार नाहीच, तसेच हे क्लोन जनसामान्यांमध्ये इतके खोलवर रुतलेले आहेत की तळागाळात देखील ह्या मुळ, ओरीजीनल नेत्यांच्या अवगुणांनी भरलेले कार्यकर्ते अजुनही समाजात विष कालवण्याचे काम इमानेइतबारे करीत आहेत.
एखादा शेतकरी जो अपार कष्टाने पीक घेतो, जेव्हा त्याने घेतलेले पीक जेव्हा मळनी ला अथवा काढणीला येते , व शिवारात वा-यावर डोलते, धान्याच्या छोट्याअ का होईना पण राशी तयार होतात, तेव्हा शेतक-याच्या चेह-यावर एक अवर्णनीय असा आमोद व हृद्यात उचंबळणा-या पुर्णत्वाच्या भावनाच सगळ काही देऊन जातात. तो शेतकरी त्याचे ते पीक, भाजीपाला रस्त्यावर फेकुन देईल? कदापि शक्य नाही. आणि जर कोणी देतच असेल तर समजा की तो शेतकरी नाहीच. त्याच्यासाठी शेती ही फक्त एक मशीन आहे. पण आपला शेतकरी ह्या शेतीस काळी आई म्हणतो. ह्या काळ्या आईने दिलेले जोंधळे शिरोधारी घेऊन, त्याचा यथोचित आदर, पुजा करुनच शेतकरी स्वत हे धनधान्य खातो किंवा इतरांस देतो. शेतक-यासाठी त्याने पिकविलेले धान्य म्हणजे त्याच्यासाठी पृथ्वीमातेने दिलेला प्रसादच असतो. तर असा अमुल्य ठेवा रस्त्यावर फेकणारा शेतकरी असुच शकत नाही.
बदलत्या काळानुसार मुल्य अदलाबदलीची पध्दत बदलली असली तरी डोलणारे शिवार व धान्याची रास यातुन जे आत्मिक समाधान शेतक-यास मिळते ते अन्य कशातच नाही.
काळ बदलला असला, पिक, धान्य भाजीपाला, याची किंमत रुपया पैश्यामध्ये व्हायला लागली तरीही शेतक-यासाठी त्याचे पीक स्वर्गसुखाहुन ही श्रेष्ट होते व आहेच.
त्यामुळे दुध , फळे , भाजीवाला इत्यादी,(मग ते स्वतःचे असो वा नसो), रस्त्यावर फेकणारा शेतकरी असुच शकत नाही. हे नक्कीच त्या ऐहीक स्वार्थाने बरबटलेल्या नेत्यांचे क्लोन आहेत, हे नीटसे समजा.
मुद्दा हा आहे की, मागणी आणि पुरवठ्याचे तंत्रावर आधारीत, स्थानिक पातळीवर लागणा-या वस्तुंचे उत्पादन स्थानिक पातळीवरच करणे व अधिकचे बाहेर विक्रीसाठी पाठवणे. व त्याद्वारे, शेती-आधारीत कुटीरोद्योग, गृहोद्योगाचे जाळे निर्माण करणे अतिशय गरजेचे आहे. लवासा सारखे उद्योग १५ वर्षात एवढी मालमत्ता व नफा कमावु शकतात तर, असे उद्योग(कुटीरोद्योग, गृहोद्योग, लघुउद्योग) , व्यापारी वृत्तीने , गावागावात का नाही केले जाऊ शकत. तर मित्रांनो, हे करता येणार असेल तर कसे, याबाबत चर्चा होऊ शकते काय?

Monday, April 24, 2017

मिळकतीचे वाटप सामंजस्याने करणेच योग्य

मिळकतीचे वाटप सामंजस्याने करणेच योग्य

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 85 खालील वाटप - 

शेत जमिनीच्याबाबतीत शासनाने वाटप होण्यासाठी जर आपापसांत वाद नसतील तर वाटपाची प्रक्रिया पुष्कळ सोपी केलेली असून, ती कमी खर्चिकसुद्धा असते. यामध्ये सर्व सहदायकांनी मिळून मा मलतदाराकडे सर्व चालू 7/12 चे उतारे, खाते उतारा व सदर ज मीन एकत्रित कुटुंबाकडे कशी आली याचे आवश्‍यक फेरफार दाखल अर्जासोबत सादर करून स्वत:च आपापसात सरस-निरस वाटप करून तसे जबाब दिल्यास त्याच्या आदेशाने वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. यात सर्वांत मोठा अडथळा मुंबई तुकडे बंदी व तुकडेजोड कायदा 1947 खालील तरतुदींचा येऊ शकतो. 


या कायद्याप्रमाणे जमिनींचे पुढील तुकडे विभागानुसार 40 आर., 20 आर. किंवा 10 आर. क्षेत्रापेक्षा कमी झालेले चालत नाहीत. कोणत्याही धारण जमिनीत एकाहून अधिक सहधारक असतील तर आपल्या हिश्‍श्‍याच्या विभाजनाकरिता मामलतदाराकडे असा अर्ज करता येईल, मात्र त्यासही इतर सर्व सहधारक व सह-हक्कधारक यांची संमती आवश्‍यक असते. 


जमिनीच्या मालकीबाबत कोणतेही वाद उद्‌भवल्यास अशा प्रश्‍नांचा निर्णय दिवाणी न्यायालयात लागणे बंधनकारक असते. नंतरच पुढील प्रक्रियेकामी हे प्रकरण महसूल विभागाकडे येते. सर्व सहधारक वा सहहक्कधारक यांची बाजू ऐकून घेणे, त्यांना तशी स ंधी देणे हे नैसर्गिक तत्त्वाचे पालन होणे कायद्याला अभिप्रेत असते.


शासनास महसूल देण्याचा व धारण जमिनीचे विभाजन करताना यो ग्य रीतीने झालेला खर्च महसूल अधिकाऱ्यास योग्य वाटेल अशा प्र माणात वसूल करता येतो. 


मिळकतीचे वाटप सामंजस्याने करणेच योग्य 
ज्या विनंतीवरून विभाजन झालेले आहे अशा सहधारकाकडून किंवा विभाजनात ज्यांचा हितसंबंध असेल, अशा व्यक्तींच्या हिश्‍श्‍या मधून महसुलाच्या मागणीप्रमाणे विभाजन करून वसूल करण्यात येईल. जमिनीच्या वाटपासाठी या कलमात खास तरतूद करण्यात आलेली आहे. बरेच शेतकरी तलाठ्याकडे वाटपासाठी अर्ज देऊन विनंती करतात, मात्र तलाठ्यास या संबंधाने कोणतेही अधिकार नाहीत. हे या संबंधाने लक्षात घ्यावे, तसेच न्यायालयाचा हुकूमना मा झाल्यानंतर पुढील अंमलबजावणीकामी कलम 85 खाली महसूल यंत्रणेकडे सोपविले जाते.



मामलतदारास करावयाच्या अर्जात पुढील गोष्टींचा समावेश असावा :
1) धारण केलेल्या एकत्र कुटुंबाचे एकूण क्षेत्र, त्याचा सर्व्हे नं. (गट नं.) वा हिस्सा नंबर प्रत्यक्षात 7/12 प्रमाणे पोटखराब्यास हित 
2) धारण शेतजमिनीची पट्टी/शेतसारा/वा चावडी
3) सहधारकांचे सध्याचे व नियोजित नावे, पत्ते आणि हिस्से
4) अर्जासोबत सर्व 7/12 च्या, खातेउतारा व आवश्‍यक त्या फेरफार नकला जोडणे अभिप्रेत
5) अर्ज दोन प्रतींत तयार करावा. एका प्रतीवर बारनिशी कारकुनाची पोच सहीशिक्‍क्‍यानिशी घ्यावी. अर्जावर सर्व सहदायक/ हक्कदार यांच्या संमतीदर्शक सह्या घ्याव्यात.
6) अर्ज प्राप्त झाल्यानंतर मामलतदार सर्वांना नोटिसा बजावतील व सुनावणीसाठी योग्य त्या दिवशी समोर हजर राहण्याकामी नोटिशीत उल्लेख असेल, त्या दिवशी मामलतदार सर्व संबंधितांचे म्हणणे ऐकून घेतील, लेखी वा तोंडी जबाब नोंदवून घेतील. आवश्‍यक कागदपत्रे अपुरी असल्यस वा अधक पुरावे आवश्‍यक असल्यास ते सादर करण्याविषयी पक्षकारास सूचना देऊन पुढील तारीख ने मतील.
7) सर्व अर्जदारांचे व संबंधितांचे म्हणणे ऐकून नियम दहाप्रमाणे तुकडेबंदी व तुकडेजोड कायद्याच्या तरतुदी लक्षात घेऊन या कायद्याचे कलम 230 फार्म "अ'प्रमाणे सर्व हिस्सेदारांना, सह हिस्सेदारांना व संबंधितांना नोटिसा काढतील. यात गहाणदार बॅंक, पतसंस्था, सावकार वा इतर बोजेधारक यांचा समावेश असतो.



वाटपाचा जाहीरनामा -
वाटपाचा सर्वसाधारण मसुदा तयार झाल्यानंतर त्याचा नमुना फॉर्म नं. "ब' प्रमाणे जाहीरनामा तयार केला जातो. त्याची योग्य ती जा हिरात दर्शनीभागी मामलेदार कचेरी, चावडी, तलाठी कचेरी, गावातील सार्वजनिक जागी, बैल, शेती वगैरे ठिकाणी प्रकाशित केली जाते.



आवश्‍यक कार्यवाही -
हरकती नोंदविण्याची योग्य ती संधी दिल्यानंतर व त्या संबंधित मुदत संपल्यानंतर मामलतदाराची खात्री झाली व सर्वांचे म्हणणे ऐकून त्यांचे मत असे झाले, की अर्जदार यास अर्जातील ज मिनीबाबत रस नाही किंवा जमिनीच्या मालकीबाबत वाजवी तक्रारी आहेत तर ते असा अर्ज आवश्‍यक शेरा ठेवून रद्द करतील. अर्जातील जमिनीबाबत भांडणे असतील तर निवाड्यासाठी दिवाणी कोर्टात जाणे कामी सूचना देतील.



वाटपाची पद्धत :
जर मामलतदाराने सर्व संधी दिल्यानंतर अर्ज नाकारला नाही तर ते स्वत: किंवा योग्य त्या निर्देशित महसूल अधिकाऱ्यामार्फत वाटपाची पुढील कार्यवाही करतील. शक्‍यतो प्रत्यक्ष वाटप करताना प्रत्येक सहहिस्सेदारांच्या हिश्‍श्‍यात संपूर्ण सर्व्हे नंबर/ गट नंबर वा त्याचा पोट विभाग येईल याची दक्षता घेतील. पुढे त्या संपूर्ण गटांचे पुनर्वाटप होत नाही. सर्व क्षेत्र हे आटोपशीर, गरजेनुसार ते प्रत्येक पक्षास द्यावे अशीही दक्षता घेतील. वाटप लेखी स्वरूपात झाल्यानं तर त्यावर काही हरकती/सूचना असल्यास सर्व सहहिस्सेदारांचे म्हणणे ऐकून योग्य त्या दुरुस्त्या केल्या जातात वा मान्य केले जाते. असे मान्य वाटप व दुरुस्त वाटप याची अंमलबजावणी शेतीचे नवीन वर्षापासून प्रत्यक्षात केले जाते किंवा तेव्हापासून ग्राह्य धरले जाते.



वाटपाचा खर्च 
वरीलप्रमाणे झालेल्या वाटपाचा खर्च कलम 85(5) प्रमाणे सर्व सह हिस्सेदार, भागीदार, पक्षकार, अर्जदार यांच्याकडून वसूल केला जातो.
मुदतीचा कायदा - शेतजमिनीच्या वाटपासाठी मामलतदाराकडे अर्ज उशिरा दाखल केला म्हणून अर्ज मुदतीत नाही हे ग्राह्य नसते. त्यास मुदतीच्या कायद्याचा अडसर नसतो. 



हुकूमानंतर - मामलतदाराकडून वाटपाचा हुकूम झाल्यानंतर अ भिलेख 7/12 ला हक्कदुरुस्ती फेरफार करण्यासाठी तलाठ्याकडे पाठविले जाते. तलाठी हुकमानुसार गाव न. नं. 6 ड ला फेरफार घेऊन 7/12 दुरुस्त करतात. या कामी परत पक्षकारांना नोटिसा बजावण्याची गरज नसते किंवा नोटिशीचा कालावधीही लागू पडत नाही. याचा अर्थ तत्काळ 7/12 दुरुस्त होणे आवश्‍यक ठरते.


वाटपानंतरचा ताबा - वाटपातील तपशिलाप्रमाणे सर्व सहहिस्सेदारां नी जागेवर ताबा घेतला असे समजले जाते, मात्र काही वाद उद्‌भवल्यास महसूल अधिकारी पंचांसमक्ष जागेवर ताबा देवू शकतात. थोडक्‍यात एकत्र कुटुंबाचे मिळकतीचे वाटप समजून/उ मजून सामंजस्याने करणेच श्रेयस्कर ठरते. कारण वाद उद्‌भवल्यास ते किती काळ चालतील, किती पैसा खर्च करतील व किती शक्तीचा व्यय करतील हे कुणीच सांगू शकत नाही. म्हणून तुमचे वकील काहीही म्हणोत जुन्या माणसांचे म्हणणे ऐका की "शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये.'

Friday, April 7, 2017

पर्यावरण संरक्षण, संवर्धनात व वनशेती मध्ये वेल्हा बनु शकतो रोल मॉडेल


भाग - १

इकॉलॉजिकली सेंसीटीव्ह एरीया, म्हणुन वर्गीकरण झालेल्या क्षेत्रात, वेल्हे तालुक्यातील सर्वच(मोजकी ३-४ गावे सोडुन) गावांचा समावेश झालेला आहे. अशा प्रकारे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असणा-या या तालुक्यात मग विकासाची गंगा कधी येणारच नाही का? जंगलांचा आज तागायत झालेला –हास , व अजुनही पत्येक वर्षी वणव्यांच्या रुपाने होणारी अपरीमीत हानी कधी थांबेल काय? शहराकडे स्थलांतरीत होऊ लागलेल्या येथील लोकांस येथेच कायमस्वरुपी रोजगार मिळणार नाही काय? वनौपज संरक्षण व संवर्धनातुन रोजगार, व्यवसाय निर्मिती होणार नाही काय? या व अशा अनेक प्रश्न , समस्यांवर व्यापक विचार करण्याचा येथे प्रयत्न केला आहे. 

पावसाळ्यात नयनरम्य वाटणारे हेच डोंगर, उन्हाळ्यात मात्र अप्रेक्षणीय होतात.



उत्तरी-पश्चिम घाट , तेव्हा  आणि आता या शीर्षकाचा एक व्हिडीयो युट्युब वर पाहीला.इकॉलॉइकल सोसायटी ने सर्वेक्षण करुन अभ्यास करुन उत्तर - पश्चिम घाटाविषयी अतिशय सखोल माहीती यात दिली आहे.

पश्चिम घाट उत्तरेकडे गुजरात, डहाणु पासुन सुरु होऊन, दक्षिंणेत केरळ पर्यन्त पसरला आहे. अंदाजे लांबी १६०० किमी तर अंदाजे क्षेत्रफळ ६०,००० चौ कि मी आहे. किमान १५ करोड वर्षापुर्वी गोंडवन नावाच्या एका भुखंडाचे तुकडे झाल्याने व तो पुर्वोत्तर सरकल्यामुळे, युरेशिया खंडाला येऊन मिळाला. असे झाल्यामुळे अंदाजे ६.५ कोटी वर्षापुर्वी इथे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन,दख्खन चे पठार म्हणतात ते निर्माण झाले. 

या पश्चिम घाटास आपण सह्याद्री असे ही म्हणतो. दक्षिंणेकडील बाजुने आपण पश्चिम घाट पाहीला तर असे स्पष्ट पणे जाणवते की, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पश्चिम घाटाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पुण्याचेच उदाहारण घ्या. पुण्याच्या पश्चिमेला चार तालुके आहेत. मावळ, मुळशी , वेल्हे व भोर. या चार ही तालुक्यातील पश्चिमेकडचा सर्वच्या सर्व भाग, ज्यास स्थानिक भाषेत "मावळ" असेच म्हणतात, हा खुद्द पश्चिम घाटाचाच एक भाग आहे. तसेच आणखी उत्तरेकडे गेल्यास भीमाशंकर दिसते. एक संरक्षित क्षेत्र म्हणुन भीमाशंकर अभयारण्य व तेथील वनराई बहुंशी शाबुत आहे. पुणे शहराच्या पश्चिमेकडील या चार ही तालुक्यातील जंगलांचा, वनक्षेत्रांचा, डोंगर उतारांचा -हास खुप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. 

मागच्याच आठवड्यात मुळशी-ताम्हिनी परीसरात जाण्या्चा योग आला. मुळशी धरणाचे पाणी उजव्या बाजुला दिसायला लागताच डावीकडील डोंगररांगामध्ये असणारी गर्द वनराई लक्ष वेधुन घेते. उंच च्या उंच डोगररांगा व त्या डोंगरांच्या खांद्यावर वाढलेली जंगले, हे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारेच होते. ही वनराई अगदी कोकण भागापर्यंत दिसुन येते.

याच्याच विरुध्द अवस्था वेल्ह्याची आहे. या दिवसात, म्हणजे फेब्रुवारी नंतर मे पर्यंत जर वेल्ह्या च्या मावळ भागात प्रवासाचा तुम्हाला योग आला तर, तुमचे लक्ष वेधुन घेईल ते म्हणजे जळालेले डोंगर, तर कुठ जळणारे डोंगर. नुसतेच डोंगर जळतात असे नव्हे, तर वेल्ह्यातील किल्ले देखील जळतात. तोरणा जळला आहे, राजगड देखील जळलाय. तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेकडील डोंगररांगेवर अतिशय छान जंगल आहे. बहुधा ते वनविभागाच्या ताव्यात असावे. पण ते ही जळाले आहे. निवी, विहीर, अंत्रोली, बाघदरी ची अवस्था देखील अशीच आहे. राजगड व तोरणा किल्ल्यास जोडणारी रांग देखील जळुन खाक झाली आहे. इकडे, वरोती, कोलंवी, घिसर भागात देखील कमी अधिक प्रमाणात डोंगर जळाले आहेत. जाधववाडी मधुन पासली कडे जाताना,रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेला भुखंड देखील जळुन गेला आहे. 

मी ब-याचदा गावक-यांशी या विषयावर बोलतो तेव्हा समजते की बहुतांश लोकांना वणवा नको असतो. वणवा लागल्या मुळे, मे महिन्यापर्यंत चरण्यासाठी शिल्लक असणारे गवत, फेब्रुवारी महिन्यातच संपते, व जनावरांस वण वण भटकावे लागते. कित्येकदा गावकरी, वणवा विझवताना देखील दिसतात. 

जर हे वणवे लागण्याचे कारण रस्त्यावरची वर्दळ असेल तर, शासनाने (म्हणजेच तहसील, वनविभाग ) रस्त्याच्या दुतर्फा जाळ रेषा, कमीत कमी २० फुटाची काढणे गरजेचे आहे. 

तसेच चुकुन वणवा लाअगलाच, तर त्या वणव्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठीच्या उपाय योजना देखील करायला हव्यात. जसे, नैसर्गिक जे पाण्याचे प्रवाह आहेत, त्या प्रवाहातुन आग, एका बाजुकडुन दुस-या बाजुस जाऊ नये यासाठी, त्या पाटातील (नाल्यातील किंवा नाळेतील) दोन बाजु जोडणारी वाळलेली लाकडे, गवत काढुन घेणे, जेणे करुन आग लागलीच तर ती एका बाजुलाच अडकेल, दुस-या बाजुस जाणार नाही.

सोबतच रस्त्याला व पहील्या जाळरेषेला समांतर दुसरी जाळरेषा, किमान १०० मी अंतरावर काढली तर दुर डोंगरमाथ्यावर आग पोहोचण्याची शक्यताच राहणार नाही.

वरकरणी जाळ रेषा काढली पाहीजे असे म्हणायला खुप सोपे आहे पण प्रत्यक्षात हे काम करणार कसे व कोण? त्यासाठी निधी कोण देणार? मनुष्यबळ कुठुन मिळणार?

तर यासाठी आपण म्हणजे शासनाने पुढची पाच वर्षे किमान, नवीन झाडे लावायचे बंद केले की मनुष्यबळ मिळेल, निधी देखील मिळेल. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांवर दरवर्षी शेकडी कोटी रुपये खर्च केले जातात. व आज पर्यंत या वृक्षारोपण कार्यक्र्मातुन लावलेल्या झाडांची जंगले आपण कधी पाहीली नाहीत.  तर हा खर्च टाळुन शासनाने, वणव्यापासुन डोंगररांगाचे संरक्षण जर केले, तर आपोआप बीज अंकुरतील, रोपे येतील, जंगले वाढतील. कारण एक एक वृक्ष लाखो बीजांची निर्मीती करतो, गरज असते फक्त हे बीज जळु न देण्याची.  वृक्षारोपणाचा निधी इकडे संरक्षणाकडे वळवल्यास, स्थानिक लोकांस रोजगार हमी च्या अंतर्गत, कामे देऊन ज्या जाळ रेषा काढण्याचे काम करता येऊ शकते.

महोद्य, आपणास विंनती आहे की, आपण वरील संदेश गांभीर्याने घ्याल, यावर अधिक अभ्यास करुन योग्य ती पावले उचलाल. आपण वेल्हा तालुक्यापासुन सुरुवात करुन एक रोल मॉडेल तयार करुन सर्वांसमोर आदर्श ठेवु शकता.
आपण जर खरच असे काही करु शकलो, तर फक्त पाच वर्षांच्या कालावधी मध्येच हा उत्तरी-पश्चिम घाट देखील पुन्हा सदाहरीत होऊन इथे देखील जैव विविधतता जोपासली जाईल.

(या संदर्भात आणखी कसल्याही सल्ल्या-माहीतीची आवश्यकता असल्यास आपण मला ०९०४९००२०५३ वर संपर्क करु शकता, किंवा या इमेल वर देखील संपर्क साधता येऊ शकतो.)

श्री हेमंत सिताराम ववले

Friday, February 24, 2017

वणवा म्हणजे आपलेच नुकसान


ही भुमाता जिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिची मनुष्याव्यतिरिक्त ही अनेक संताने आहेत. की जे आपले बांधव आहेत. म्हणजे वृक्ष, वेली, प्राणी,सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या, असे असंख्य जीव या भुमातेच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत असतात. त्याचप्बरोबर हे असंख्य जीव आपले निसर्गचक्र नीट राखण्याचे काम ही माणसापेक्षा जास्त चांगल्या पध्दतीने करीत असतात. मग माणुस का निसर्गचक्रामध्ये हस्तक्षेप करीत आहे?. डोंगराला आग लावल्यामुळे आपण आपल्याच पायावर कु-हाड मारीत आहोत. 
दरवर्षीच्या पावसाळ्यात उगवलेली लाखो रोपे माणसाच्या वणवा लावण्याच्या अविचारामुळे होरपळुन मरतात. परीणामी झाडाची संख्या वाढत नाही, हिरवे छत्र लुप्त होत आहे. 
दरवर्षी काही पर्यावरण प्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतात. पण ह्या वणव्यामुळे जेवढी झाडे लावली जातात त्याच्यापेक्षा हजारपट जास्त झाडे मरतात. निसर्ग स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, माणसाने फक्त वणवा लावण्यासारख्या गोष्टींपासुन स्वतःला परावृत्त करणे गरजेचे आहे.


आग लावणा-या माणसांकडे फेसबुक नसते, व्हॉट्सऍप नसते, ऍम्ड्रॉईड फोन नसतो, त्यामुळे तुमच्या माझ्या सारख्यांचे (म्हणजेच हा संदेश वाचणा-यांचे) काम आहे की आपाअपल्या गावात अशा प्रत्येक व्यक्ति पर्यत हा संदेश तोंडी पोहोचवावा, शेतकरी, गुराखी,कातकरी,आदी लोकांना याबाबत जागरुक करणे गरचे आहे. कारण ते लोक आपल्या पेक्षा जास्त जवळ असतात निसर्गाच्या, निसर्गाच्या कुशीत असतात, त्यामुळे जसे वृक्ष वेली, प्राणीमात्राम्चे सर्वाधिक नुकसान होते, तसेच शेतकरी, गुराखी, आदीवासी बांधवांचे देखील खुप नुकसान होते, व संपुर्ण पर्यावरणाचे होणारे नुकसान तर सगळ्या चराचर, प्राणीमात्रांना , इकोसिस्टमला भोगावे लागते आहे.

वणव्याविषयी एक गैरसमज आहे. तो काय आहे  व त्यांच्याविषयी सत्य माहीती जाणुन घेऊयात.

वणवा लावल्यामुळे पुढच्या वर्षी गवत चांगले येते - मुळात वणवा लावल्यामुळे जमीनीची सर्वाधिक धुप होती. गवत जळुन गेल्याने, त्या गवताच्या मुळांनी माती धरुन ठेवलेली मोकळी होते. तसेच पहील्या पावसात ही माती वाहुन जाते. म्हणुन आपणास पहील्या पावसात डोंगरद-यांतुन वाहणारे पाणी गढुळ असल्याचे दिसते. याचाच आणखी एक दुष्परीणाम असाही होतो आहे की काही वर्षांनी आपली सर्वच्या सर्व धरणे निम्मी मातीने व निम्मी पाण्याने भरतील. पाणी साठा कमी होईल, परीणामी नागरी लोकसंख्येला पर्यायाने धरणक्षेत्रातील लोकांना अधिक भुरदंड पडेल. कारण पाणी कमी पडले की आणखी जास्त धरणांची आवश्यकता निर्माण होईल व पर्यायाने नवीन धरणे पावसाच्या क्षेत्रातच बांधली जातील व तेथील लोकांस(वेल्हा, मुळशी, मावळ, भोर) संसार पाठीवर लावुन दुस-या भागात धरणग्रस्त म्हणुन जावे लागेल.

जर आपण वणवा लावण्याचे थांबवु शकलो, तर त्याचे फायदे खालील प्रमाणे होतील
१. पावसाचे प्रमाण वाढेल
२. पावसाची अनिश्चितता कमी होईल
३. झाडे झुडपे वाढल्याने, पावसाचे पाणी जमीनीत खोलवर मुरेल व त्यामुळे तुमच्या विहीरी, बोअरवेल ला पाण्याची कमतरता होणार नाही.
४. वनौषधी ची वाढ देखील होईल. आपल्या भागात, हिरडा, गेळा, बेहडा, आवळा, कुडा,कढीपत्ता, शिकेकाई, रिठा, वावडींगी आणखीही अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्या या डोंगरद-यात अमाप प्रमाणात वाढायच्या पुर्वी पण वणवा लावण्याच्या अविचाराने यातील कित्येक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वनस्पती म्हणजे आपल्या येथील लोकांस अर्थार्जनाचे एक वरदानच निसर्गाअने दिले आहे. आपण करंटे त्याला वणवा पेटवुन हे वरदानच झिडकारतो.
५. वनफळे व भाज्या -  करवंदा पासुन मे महीनाभर दररोज किमान ३०० ते ४०० रुपये आपल्याकडील स्त्रिया कमावताना आपण मागच्या वर्षीच पाहीले.(शेणवड/बालवडच्या महीला). विचार करा, जर वणवा पेटला नाही व करवंदीच्या नव नवीन जाळ्या तयार झाल्या तर येत्या काही वर्षात , करवंद हा एक संघटीत व्यवसाय या रुपाने नावारुपास येईल. आळु, तोरण , फणस, जांभळं यांचे पर्यायही आहेत आपल्याकडे.
वनभाज्या ..म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली पार्टीच जणु...शेंडवेल, मुरुट आणखी ब-याच वन भाज्या आपणास जंगलात मिळतात. पण मित्रांनो जरा आपल्या आजी आजोबांस विचारुन पाहा बरे, की या भाज्यांचे प्रमाण पुर्वी किती होते व आता किती आहे? व या सा-यास कारणीभुत आहे हा वणवा..
६. वन-आधारीत अर्थव्यवस्था - लाकुड, गवत,फळे, औषधे, स्वतपुरती निसर्गाने घेणे ठिक आहे. पण योग्य नियोजन करुन यातुन एक पर्यायी व्यपार उदीम देखील उभा राहु शकेल.
७. पर्यटन वाढ - जरा विचार करा, सध्या, मढे घाट, लिंगाणा इत्यादी ठिकाणे शहरातील लोकाम्साठी आकर्षण आहे. पण ते केवळ पावसाळ्यात. जर आपण आपला परीसर हिरवागार करु शकलो, वनराई बहरु देऊ शकलो, तर बारा महीने , तेरा काळ चालेल असा पर्यटन व्यवसाय देखील वाढेल. शहरात ड्रायव्हर, आचारी, वेटर अशी कामे करण्यापेक्षा आपण आपल्याच भागात उद्योग व्यवसाय करु शकता. 

मित्रांनो, वणवा थांबवण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपण स्तःतसोबतच निसर्गाचे देखील कल्याण करण्यात यशस्वी होऊ.

हेमंत ववले.

Sunday, February 19, 2017

काय महाराज सुफी पंथांचे होते?

जास्तीत जास्त लोकांपर्यन्त शेयर करा व शेवटी दिलेल्या लिंक वर जाऊन या लेखास "१" म्हणजे "एक" असे रेटींग देऊन आपापली नाराजी नोंदवा.

आज सकाळ वर्तमान पत्रातील सप्तरंग या पुरवणीमध्ये छापलेल्या भोकाटेच्या लेखास माझी प्रतिक्रिया...

काय महाराज सुफी पंथांचे होते?
भोकाटे पिसाळलाय आणि सकाळ वाले सुध्दा पिसाळले आहेत.

सकाळ समुहा सारख्या प्रतिष्टीत व निष्पक्ष माध्यमाने अशा प्रकारच्या लेखास प्रसिध्द करणे "सकाळ" च्या प्रतिमेस धक्का आहे. लेखक एकीकडे म्हणतो आहे की महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सामावुन घेतले व या म्हणण्यास आधार देण्यासाठी काही उदाहरणे देखील दिली आहेत. ही उदाहरणे देताना लेखकाने त्या त्या जातीच उल्लेख न विसरता केला आहे. मुळात जात पाहुन कुणाची नेमणुक केली असेल असे म्हणने महाराजांचा एक प्रकारे केलेला अपमानच आहे. महाराज जात व्यवस्थेला थारा देत नव्हते तर मग जात पाहुन त्यांनी नेमणुका केल्या असतील असे मानणे व सकाळ सारख्या प्रगल्भ वृत्तपत्राने असा सुमास लेख प्रसिध्द करावा हे हास्यास्पदच आहे. "व्यक्तिच्या गुणवत्तेच्या आधारावर महाराजांनी नेमणुका केल्या" हे सर्वात महत्वाचे आहे. व अधोरेखीत करणे आवश्यक आहे.
पुढे .... दौलत खान, इब्राहिम खान आदींचा जो उल्लेख लेखकाने केला आहे, तो अर्धवट आहे. हे लोक स्वराज्य निर्मीतीचे ध्येय घेऊन महाराजांसोबत आलेले नव्हते. नंतरच्या काळात ह्या लोकांनी स्वराज्याच्या गनिमांना सामील होऊन साथ दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
जातीच्या नावांचा उल्लेख करताना लेखक "ब्राम्हण" जातीचा उल्लेख करण्याचे टाळतो हा देखील पक्षपातच आहे. "जानवे" शब्दाचा अर्थ प्रतिष्टा असा घेताना जाणीवपुर्वक तेथेही ब्राम्हण जातीचा उल्लेख टाळतो. स्वराज्याच्या यज्ञात सर्व समाजाचे योगदान होते मग काय ब्राम्हण समाजाचे काहीच योगदान नव्हते?
पुढे जाऊन लेखक असे अकले चे तारे तोडतो की महाराज सुफी पंथ मानणारे होते. उद्या म्हणतील महाराज मुस्लीम होते. व अरबस्थानात शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे व महाराजांचे पुर्वज देखील अरबस्थानातुनच आल्याचे पुरावे ही देतील.
माझे म्हणने आहे की महाराजच काय तर यच्चयावत हिंदु समाज सहिष्णु असल्याने आपणास पर-पंथाविषयी आदर नेहमी आहेच. शिवरायांना देखील होता. पण फक्त तेवढीच गोष्ट अधोरेखीत करुन लिहिणे म्हणजे पुनश्च पक्षपात आहे. महाराजांनी सनातन वैदीक पध्दतीने राज्याभिषेक करवुन घेतला. त्याच्या मोहीमा दस-याच्या (सीमोल्लंघन) मुहुर्तावर म्हणजेच वैदीक परंपरेला साजेशा निघत. रामायण महाभारत वाचुन महाराजांचे शिक्षण झाले. लिहिण्यासारखे खुप काही आहे. महाराजांनी सुल्तानी आणि अस्मानी अशा दोन्ही संकटांपासुन येथील प्रजेला संरक्षण देऊन , मग्रुर, धर्मांध,अत्याचारी, बलात्कारी, चारीत्र्यहीन अशा हिंदुस्थानात ज्याकाळी चहु दिशांना इस्लामी राजे, बादशाह व राज्ये होती व हिन्दु केवळ गुलाम होते, अशा वेळी "एक हिन्दु राजा होऊ शकतो" व राज्य ही करु शकतो हे महाराजांनी सिध्द करुन दाखवले.
त्यामुले अधोरेखीत काही करायचे असेल तर "महाराज एक अभिषिक्त हिन्दु राजे होते" हे वाक्य अधोरेखीत करा.
मुळात मावळ्या-मराठ्यांचे जाती-जातीत विभाजन करणारे असे लेखन समाजासाठी घातक आहे. त्यातही समाजमनातुन जाणीवपुर्वक विशिष्ट जातीला विस्मरणात ढकलण्याचे मोठ्या षडयंत्रामध्ये लेखकासोबतच "सकाळ माध्यम समुह" देखील सामील आहे असा दर्प या लेखातुन व त्याच्या सकाळ मधील प्रसिध्दीतुन येत आहे.

http://beta1.esakal.com/saptarang/chatrapati-shivaji-maharaj-jayanti-31165

Saturday, February 18, 2017

मत कोणाला द्यायचे?

मत कोणाला द्यायचे?



निवडणुकांची रणधुमाळी गर्जते आहे गेले अनेक दिवस. उद्या प्रचाराची सांगता होईल. मग हे सगळे भोंगे, पॅंपलेट बॅनर्स होर्डींग लावणे बंद.
उमेदवारांनी स्वतस अधिक मते मिळावी यासाठी जो प्रचार केला त्या प्रचाराचे परीणाम खरच का मतदाराच्या निर्णय प्रक्रियेवर होईल?
प्रत्येक उमेदवाराचे पत्रक घरात येऊन पडले. प्रत्येक उमेदवाराचे भोंगा असलेले वाहन घराजवळुन गेले. अनेक उमेदवारांचे समर्थक सोशल मीडीया वर भरभरुन पोस्ट टाकीत आहेत. अनेक उमेदवारांचे मेसेज  ही आले मोबाईल वर. या सर्वातुन एक ॲनालॉगी सुचली...

बाजारात एकाच प्रकारचे पण अनेक उत्पादकांनी बनवलेले उत्पादन विक्री साठी आहे. ह्या उत्पादनाची जाहीरात गेले बरेच दिवस जोमात सुरु आहे. बर, जाहीरात का करावी लागते हे सर्वांना ठाउक असेलच. आपापले उत्पादनाची माहीती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यन्त पोहोचवणे, जेणे करुन हे उत्पादन कसे दिसते?, त्याचे फायदे काय? ते अन्य उत्पादनांपेक्षा(प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा) कसे सरस आहे? किमंत कशी कमी आहे? वगैरे वगैरे.. 
ग्राहकापुढे अशा प्रकारे प्रत्येक उत्पादनाची माहीती असते. ग्राहक तुलना करु शकतो. जाहीरातीचे काम एवढेच होते की उत्पादन विषयी माहीती जसे आहे तसे (शक्यतोखोटी कोण देत नाही) जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचवणे.
मग ग्राहक स्वतच्या बुध्दीमत्तेचा वापर करुन  निर्णय घेतो. हा निर्णय घेताना तो अनेक गोष्टी पाहतो जसे
१. उत्पादन काय आहे?
२. उत्पादनाची श्रेणी काय आहे?
३. उत्पादनाचा उत्पादक कोण आहे?
४. उत्पादन स्थानिक पातळीवर निर्मित आहे का?
५. उत्पादनात कच्चा माल काय काय वापरला आहे?
६. उत्पादनाची एक्सापायरी तारीख काय आहे?
७. लेबल लिहिले आहे, तेवढेच वजन  आहे की नाही?
८. हेच उत्पादन पुर्वी कधी वापरले आहे का?
९. पुर्वी वापरले असेल तर पुर्वीचा अनुभव कसा होता?
१०. त्याच उत्पादकाचे आणखी एखादे उत्पादन आपण पुर्वी वापरलेआहे का? असल्यास जाहीरात व प्रत्यक्ष सेवा यामध्ये फरक अनुभवास आला का?
११. सगळीच उत्पादने सुमार दर्जाची असतील तर काय ब्रॅंड पाहुन ठरविता येईल का?

तर आता वरील यादी मध्ये 
उत्पादन ऐवजी उमेदवार हा शब्द टाका..
उत्पादक ऐवजी राजकीय पक्ष किंवा विद्यमान उमेदवाराचा पती किंवा पत्नी असे वाचा.
म्हणजेच काय तर या झालेया प्रचारातुन खरच का मतदाराला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत?

काही निकष पाहु आता..

गुणवत्ता हीन पण पैशेवाले उमेदवार 

कुणी जर आपणास म्हणेल की अरे माझी वस्तु घे , मी तुला वरुन पैसे ही देतो. मटण दारु पार्टी ही देतो.
तर याचा अर्थ काय की आज वस्तु फुकट मिळणार, वरुन पैसे, पार्टी मिलणार...पण निकृष्ट दर्जाची वस्तु खाल्ल्याने मी आजारी पडुन त्याच विक्रेत्याचा भाऊ असलेल्या डॉक्टरकडे जाऊन पैसे घालवील.व  आरोग्य ही गमावेल.
त्यामुळे मित्रहो, पार्ट्या-पैसे देऊ करणा-या (ब-याच जणांनी पार्ट्या खाल्ल्या ही असतील )उमेदवारांना मत देऊ नका. कारण आज हे पैसे खर्च करताहेत तर उद्या निवडुण आल्यावर आपल्यालाच लुटतील.

स्त्री उमेदवार ? की नव-याच्या राजकीय महत्वकांक्षेचे बाहुले?

आणखी एक गंभीर प्रश्न या निवडनुकीच्या निमित्ताने समोर आला..तो म्हणजे सर्व अपेक्षित उमेदवारांच्या पत्न्या, ह्या आरक्षण पडल्यावर रातोरात कशा काय योग्य उमेदवार झाल्या? ज्या स्त्री उमेदवार फक्त आणि फक्त नवरोबांच्या नावावर किंवा नवरोबाच्या अहंकारापोटी रिंगणात उतरल्या आहेत (नव्हे त्यांना त्यांच्या नवरोबांनी वापरुन घेतले आहे), अशा स्त्री उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेबद्दल अभ्यास केल्याशिवाय मत देउ नका.

उमेदवार स्थानिक आहे का?

स्थानिकच का असावा? म्हणजे काय तर, उमेदवार राहतो पुण्यात, त्याची पोर शाळा शिकत्यात पुण्यातल्या एखाद्या इंग्लिश मीडीयम शाळेत, त्याचे वयस्कर आई वडील इलाज घेतात खासगी इस्पितळात, अवस-पुनव ला भारीतल्या कार ने गावाला आल्यवर त्याला गावाकडच्या रस्त्यांची दुरवस्था कशी कळेल बरे? गावाकडे वीज, पाणी याची काय अवस्था आहे हे शहरात राहणा-या उमेदवारास कसे कळेल? गावातील शाळांमध्ये काय प्रश्न आहेत हे ज्याची मुले खासजी शाळांत शिकतात त्या उमेदवारास कसे बरे कळेल?
कसे कळेल? असे म्हणताना मला हे सांगायचे आहे की, जनसामान्यांना ज्या सोई सुविधा आहेत, त्यांचाच उपभोग घेत, असणारास समस्यांविषयी लवकर समजेल.

उमेदवाराचे अर्थार्जनाची साधने काय आहेत?

काय उमेदवाराचे दारु चे बीयरचे (अधिकृत का असेना) दुकान आहे? किंवा होते काय? काय त्याचे परमिट रुम आहे? काय उमेदवार अरेरावी, हफ्तेखोरी अशा प्रकारे पैसे कमावतो? काय उमेदवारास वडीलोपार्जित भरपुर संपत्ती मिळालेली आहे? काय उमेदवाराने जमीनी खरीदी विक्री करुन पैसा कमावला आहे? 
जर चुकुन ही असा उमेदवार निवडुन येत असेल तर नतभ्रष्ट तो उमेदवार नाही तर नतभ्रष्ट व नैतिकता हरवलेले आपण असु , हे लक्षात ठेवा. 

उमेदवार नातेवाईक आहे का?

असु द्या मित्रांनो. कर्तबगार व योग्य उमेदवार असेल व तो तुमचा नातेवाईक, भावकीतला असेल तर करा मतदान त्याला/तिला.
पण मतदान करताना उमेदवार माझ्या भावकीतला आहे, नातेवाईक आहे या एकाच निकषावर मतदान करु नका. 

उमेदवाराचे शिक्षण काय आहे?

मुलभुत प्रश्न हा नाही. त्या ही पेक्षा आपण प्रश्न असा विचारला पाहीजे की, उमेदवाराचे जे काही शिक्षण आहे, त्या शिक्षणाचा उपयोग उमेदवाराने  स्वतच्या आयुष्य बदलण्यासाठी तसेच  समाजासाठी काय केला आहे हे पाहावे.

तुम्ही ज्या उमेदवारास मत देणार तो

१. पोटभरण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी रोज किमान ८ तास काम करतो का? 
(या कामात नोकरी-धंदा-शेती हे अपेक्षित आहे. जमीनी खरेदी विक्री ची दलाली हे काम अथवा धंदा करणारा आधीच "बाद उमेदवार" आहे.)
२. उमेदवाराने प्रचारादरम्यान तुमच्या भागातील समस्यांचे आकलन अभ्यास करुन समस्या समाजासमोर मांडल्या का? व त्या समस्यांचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करुन त्यावर उपाय योजना काय करता येईल या विषयी काही मुद्दे मांडले का?
३. उमेदवार सभ्य-सुसंस्कृत आहे का ? 
सुशिक्षित असला म्हणजे सुसंस्कृत असतोच असे नाही हे लक्षात असु द्या.
अरेरावी, दादागिरी अशा कुठले प्रसंग उमेदवाराच्या बाबतीत ऐकले असतील तरी अशा प्रसंगाची सत्यता पडताळुन घ्यावी, कसलाही पुर्वग्रह न ठेवता, उमेदवार वरील सर्व निकषांवर(१,२,३ प्रश्नांच्या वरील परीच्छेदातील निकष) खरा उतरतो का? हे पाहावे व मगच मतदान करावे...तर 

सध्यातरी किमान वरील तीन प्रश्नाची उत्तरे जर "हो" असतील तर तुमचा निर्णय योग्य आहे व समाजाच्या हिताचा आहे असे अभिमानपुर्वक समजा.

Tuesday, January 31, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा


अष्टावक्र गीता

राजा जनक - चरीत्र दर्शन

रामायण, महाभारत वेदांत आदी ग्रंथांतुन राजा जनकाचा उल्लेख आहेच, तसेच काही पुराणामध्येदेखील राजा जनकाच्या चरीत्राचा उल्लेख आढळतो. बालपणापासुन टिव्ही, सिनेमा आदींतुन आपण जनकास फक्त एकाच व्यक्तिरेखेत पाहीलेले आहे, ते म्हणजे जानकीचा पिता. महादेवी सीता ही जनकाचीच पुत्री आहे व "जनक" या नावावरुनच तिचे नाव जानकी असे ही ठेवले गेले. २० वर्षापुर्वी ज्यांनी महाभारत मालीका टिव्हीवर पाहीली असेल त्यांना जर आठवत असेल तर त्यात दाखवलेला जनक एक हतबल "पिता" आहे असेच आपण आजपर्यंत मानतो आहोत. मालिका व सिनेमे भारतीय महापुरुषांच्या जीवन चरीत्रांना कधीच न्याय देऊ शकणार नाहीत. याला कारण ही तसेच आहे. एका व्यक्तिरेखेवर आपण लक्ष केंद्रीत करावयास गेलो तर त्या व्यक्तिरेखेच्या अनुशंगाने शेकडो व्यक्तिरेखा दृष्टीगोचर होतात. त्यामुळे दुरदर्शन वरील रामानंद सागर यांची मालिका म्हणजे "मर्यादापुरुषोत्तम श्रीराम" या एका व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रीत करुन तयार केलेली असल्याने, त्यात इतर पात्रांना तितकास न्याय देता आलेला नाही. असो.

जनक राजाचे वर्णन करताना उपरोक्त ग्रंथ त्याचा उल्लेख करताना अनेकविध विशेषणे वापरतात.
उदा - विदेही. म्हणजे ज्यास देह अहंकारापासुन सुटका प्राप्त असा तो म्हणजे विदेही. खरतर अध्यात्मात या स्तरापर्यंत पोहोचणे म्हणजे खुप मोठी उपलब्धी मानली जाती. देहाभिमान विसरला असा "वि"देही. जो "देह" नाही असा विदेही. अद्वैत मता मध्ये द्वैत नसतेच.  जनकास अद्वैत मताचा उपदेश अष्टावक्र मुनिकडुन झाला, पण जनकास "विदेही" हे विशेषन मात्र अष्टावक्र मुनिंची भेट होण्या आधीपासुनच लावले गेले आहे. सामान्य साधकास देहाभिमान, देहाहंकारापासुन सुटका करुन घेणे त्या अर्थाने सोपे आहे कारण त्याच्या मागे व्याप कमी असतात. पण एक प्रजाहित दक्ष राजा व तो देखील विदेही? हे समीकरण थोडे अजबच वाटते. असेच आश्चर्य व्यासपुत्र मुनि शुकास देखील वाटले व कुतुहलापोटी मेरु पर्वतापासुन म्हणजे त्याच्या निवासापासुन सलग तीन वर्षे पायी भ्रमण करीत मिथिला देशी पोहोचला होता. शुक आणि जनक हा देखील एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. पुन्हा कधी तरी या विषयावर आपण चिंतन करुयात. तर एका राज्याचा कारभार पाहणारा एक व्यक्ति देखील "देहातीत" अवस्थेस पोहोचु शकतो. व हे केवळ भारतातच घडु शकते. बर त्याचे राज्य नुसते येरेगबाळे राज्य नव्हते, तर तेथील प्रजा अत्यंत सुखी व ज्ञानी देखील होती. रोजगार, रस्ते, पाणीव्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण आदी सर्वच अंगांनी राज्याची प्रगती इतकी झालेली की हजारो कोस दुरुन चिकित्सक(उदा -शुक मुनि) राज्य शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इथे येत. तर अशा राज्याचा राजा अध्यात्मात देखील प्रचंड गतिमान होता. इथे आवर्जुन एक उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे तथागत भगवान बुध्द देवांचा. भारतीय संस्कृतीने दिलेल्या अनगणित अनमोल नररत्नांपैकी ही दोन रत्ने आहेत. एकाने राजविलास, राजवैभव या सर्वांचा त्याग करुन सलग सहा वर्षे तप करुन , गरजा कमी करुन , कमी अन्न, कमी पाणी, कमी बोलण, तपाच्या शेवटी शेवटीतर बोलणे बंदच, आदी प्रकारे तप करुन "विदेहावस्था" प्राप्त केली. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही असा साक्षात्कार होणे, अनुभव होणे म्हणजेच विदेहावस्था होय. तर दुसरीकडे राजा जनक आहे, ज्याने राजपाट सांभाळता सांभाळता विदेहावस्थेस प्राप्त झाला. त्याने राजकारभार देखील केला व नुसताच केला नाही तर तो आदर्श केला व परमार्थ ही केला व तो देखील आदर्शच केला.
असो.
जिज्ञासुंनी जनकाचे चरीत्राचे अनुशीलन आणखी ही भिन्न प्रकारे करावे. अनेकविध पैलुंनी युक्त असा हा राजा अलौकिक होता. राजा असुनही योगी होता. राजा असुनही भक्त होता. राजा असुनही तर्कपंडीत होता. राजा असुनही कुशल योध्दा व परम प्रतापी होता. त्याच्या जीवनप्रवासात तो टप्प्याटप्प्याने उर्ध्वगामी गतीस प्राप्त होत होता.

त्यामुळेच भगवान श्रीकृष्णाच्या भगवदगीतेत ज्याप्रमाणे गुरु-शिष्य प्रश्नोत्तरे पाहायला मिळतात त्याप्रमाणे अष्टावक्रगीतेत प्रश्नोत्तरे नाहीत. अष्टावक्र गीतेत "संवाद" पाहावयास मिळतो. दोन अत्यंत बुध्दीमान, अधिकारी पुरुषांचा संवाद अष्टावक्र गीतेत अनुभवास येतो. अष्टावक्र गीता अद्वैत मतातील एक महान ग्रंथ आहे, मग त्या ग्रंथात वर्णन केलेला अद्वैतवाद या दोन व्यक्तिंच्या संवादात झळकणार नाही तरच नवल. इथे गुरु-शिष्य असे द्वैत नाही, हीच या अष्टावक्र गीतेची खुप मोठी उपलब्धी आहे.
टिप - अजुन ही इथे प्रत्यक्ष अष्टावक्र गीतेतील श्लोकांचा अर्थ , त्यावर विश्लेषण करण्याचे मी जाणीवपुर्वक टाळले आहे. जिज्ञासुंनी मुळातुनच या महान ग्रंथाचा अभ्यास करावा यासाठी असे केले आहे. परंतु, जर अष्टावक्र व जनक यांच्या चरीत्राचा अभ्यास असेल तर या गीतोपनिषदात शब्दबध्द केलेला "अद्वैतवाद" समजण्यास सुलभ होईल , अशा कारणाने त्रोटक रुपात जनकाच्या चरीत्राचा व त्याच्या व्यासंगाचा उल्लेख इथे केला आहे.

हेमंत सिताराम ववले.