Saturday, February 18, 2017

मत कोणाला द्यायचे?

मत कोणाला द्यायचे?



निवडणुकांची रणधुमाळी गर्जते आहे गेले अनेक दिवस. उद्या प्रचाराची सांगता होईल. मग हे सगळे भोंगे, पॅंपलेट बॅनर्स होर्डींग लावणे बंद.
उमेदवारांनी स्वतस अधिक मते मिळावी यासाठी जो प्रचार केला त्या प्रचाराचे परीणाम खरच का मतदाराच्या निर्णय प्रक्रियेवर होईल?
प्रत्येक उमेदवाराचे पत्रक घरात येऊन पडले. प्रत्येक उमेदवाराचे भोंगा असलेले वाहन घराजवळुन गेले. अनेक उमेदवारांचे समर्थक सोशल मीडीया वर भरभरुन पोस्ट टाकीत आहेत. अनेक उमेदवारांचे मेसेज  ही आले मोबाईल वर. या सर्वातुन एक ॲनालॉगी सुचली...

बाजारात एकाच प्रकारचे पण अनेक उत्पादकांनी बनवलेले उत्पादन विक्री साठी आहे. ह्या उत्पादनाची जाहीरात गेले बरेच दिवस जोमात सुरु आहे. बर, जाहीरात का करावी लागते हे सर्वांना ठाउक असेलच. आपापले उत्पादनाची माहीती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यन्त पोहोचवणे, जेणे करुन हे उत्पादन कसे दिसते?, त्याचे फायदे काय? ते अन्य उत्पादनांपेक्षा(प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा) कसे सरस आहे? किमंत कशी कमी आहे? वगैरे वगैरे.. 
ग्राहकापुढे अशा प्रकारे प्रत्येक उत्पादनाची माहीती असते. ग्राहक तुलना करु शकतो. जाहीरातीचे काम एवढेच होते की उत्पादन विषयी माहीती जसे आहे तसे (शक्यतोखोटी कोण देत नाही) जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचवणे.
मग ग्राहक स्वतच्या बुध्दीमत्तेचा वापर करुन  निर्णय घेतो. हा निर्णय घेताना तो अनेक गोष्टी पाहतो जसे
१. उत्पादन काय आहे?
२. उत्पादनाची श्रेणी काय आहे?
३. उत्पादनाचा उत्पादक कोण आहे?
४. उत्पादन स्थानिक पातळीवर निर्मित आहे का?
५. उत्पादनात कच्चा माल काय काय वापरला आहे?
६. उत्पादनाची एक्सापायरी तारीख काय आहे?
७. लेबल लिहिले आहे, तेवढेच वजन  आहे की नाही?
८. हेच उत्पादन पुर्वी कधी वापरले आहे का?
९. पुर्वी वापरले असेल तर पुर्वीचा अनुभव कसा होता?
१०. त्याच उत्पादकाचे आणखी एखादे उत्पादन आपण पुर्वी वापरलेआहे का? असल्यास जाहीरात व प्रत्यक्ष सेवा यामध्ये फरक अनुभवास आला का?
११. सगळीच उत्पादने सुमार दर्जाची असतील तर काय ब्रॅंड पाहुन ठरविता येईल का?

तर आता वरील यादी मध्ये 
उत्पादन ऐवजी उमेदवार हा शब्द टाका..
उत्पादक ऐवजी राजकीय पक्ष किंवा विद्यमान उमेदवाराचा पती किंवा पत्नी असे वाचा.
म्हणजेच काय तर या झालेया प्रचारातुन खरच का मतदाराला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत?

काही निकष पाहु आता..

गुणवत्ता हीन पण पैशेवाले उमेदवार 

कुणी जर आपणास म्हणेल की अरे माझी वस्तु घे , मी तुला वरुन पैसे ही देतो. मटण दारु पार्टी ही देतो.
तर याचा अर्थ काय की आज वस्तु फुकट मिळणार, वरुन पैसे, पार्टी मिलणार...पण निकृष्ट दर्जाची वस्तु खाल्ल्याने मी आजारी पडुन त्याच विक्रेत्याचा भाऊ असलेल्या डॉक्टरकडे जाऊन पैसे घालवील.व  आरोग्य ही गमावेल.
त्यामुळे मित्रहो, पार्ट्या-पैसे देऊ करणा-या (ब-याच जणांनी पार्ट्या खाल्ल्या ही असतील )उमेदवारांना मत देऊ नका. कारण आज हे पैसे खर्च करताहेत तर उद्या निवडुण आल्यावर आपल्यालाच लुटतील.

स्त्री उमेदवार ? की नव-याच्या राजकीय महत्वकांक्षेचे बाहुले?

आणखी एक गंभीर प्रश्न या निवडनुकीच्या निमित्ताने समोर आला..तो म्हणजे सर्व अपेक्षित उमेदवारांच्या पत्न्या, ह्या आरक्षण पडल्यावर रातोरात कशा काय योग्य उमेदवार झाल्या? ज्या स्त्री उमेदवार फक्त आणि फक्त नवरोबांच्या नावावर किंवा नवरोबाच्या अहंकारापोटी रिंगणात उतरल्या आहेत (नव्हे त्यांना त्यांच्या नवरोबांनी वापरुन घेतले आहे), अशा स्त्री उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेबद्दल अभ्यास केल्याशिवाय मत देउ नका.

उमेदवार स्थानिक आहे का?

स्थानिकच का असावा? म्हणजे काय तर, उमेदवार राहतो पुण्यात, त्याची पोर शाळा शिकत्यात पुण्यातल्या एखाद्या इंग्लिश मीडीयम शाळेत, त्याचे वयस्कर आई वडील इलाज घेतात खासगी इस्पितळात, अवस-पुनव ला भारीतल्या कार ने गावाला आल्यवर त्याला गावाकडच्या रस्त्यांची दुरवस्था कशी कळेल बरे? गावाकडे वीज, पाणी याची काय अवस्था आहे हे शहरात राहणा-या उमेदवारास कसे कळेल? गावातील शाळांमध्ये काय प्रश्न आहेत हे ज्याची मुले खासजी शाळांत शिकतात त्या उमेदवारास कसे बरे कळेल?
कसे कळेल? असे म्हणताना मला हे सांगायचे आहे की, जनसामान्यांना ज्या सोई सुविधा आहेत, त्यांचाच उपभोग घेत, असणारास समस्यांविषयी लवकर समजेल.

उमेदवाराचे अर्थार्जनाची साधने काय आहेत?

काय उमेदवाराचे दारु चे बीयरचे (अधिकृत का असेना) दुकान आहे? किंवा होते काय? काय त्याचे परमिट रुम आहे? काय उमेदवार अरेरावी, हफ्तेखोरी अशा प्रकारे पैसे कमावतो? काय उमेदवारास वडीलोपार्जित भरपुर संपत्ती मिळालेली आहे? काय उमेदवाराने जमीनी खरीदी विक्री करुन पैसा कमावला आहे? 
जर चुकुन ही असा उमेदवार निवडुन येत असेल तर नतभ्रष्ट तो उमेदवार नाही तर नतभ्रष्ट व नैतिकता हरवलेले आपण असु , हे लक्षात ठेवा. 

उमेदवार नातेवाईक आहे का?

असु द्या मित्रांनो. कर्तबगार व योग्य उमेदवार असेल व तो तुमचा नातेवाईक, भावकीतला असेल तर करा मतदान त्याला/तिला.
पण मतदान करताना उमेदवार माझ्या भावकीतला आहे, नातेवाईक आहे या एकाच निकषावर मतदान करु नका. 

उमेदवाराचे शिक्षण काय आहे?

मुलभुत प्रश्न हा नाही. त्या ही पेक्षा आपण प्रश्न असा विचारला पाहीजे की, उमेदवाराचे जे काही शिक्षण आहे, त्या शिक्षणाचा उपयोग उमेदवाराने  स्वतच्या आयुष्य बदलण्यासाठी तसेच  समाजासाठी काय केला आहे हे पाहावे.

तुम्ही ज्या उमेदवारास मत देणार तो

१. पोटभरण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी रोज किमान ८ तास काम करतो का? 
(या कामात नोकरी-धंदा-शेती हे अपेक्षित आहे. जमीनी खरेदी विक्री ची दलाली हे काम अथवा धंदा करणारा आधीच "बाद उमेदवार" आहे.)
२. उमेदवाराने प्रचारादरम्यान तुमच्या भागातील समस्यांचे आकलन अभ्यास करुन समस्या समाजासमोर मांडल्या का? व त्या समस्यांचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करुन त्यावर उपाय योजना काय करता येईल या विषयी काही मुद्दे मांडले का?
३. उमेदवार सभ्य-सुसंस्कृत आहे का ? 
सुशिक्षित असला म्हणजे सुसंस्कृत असतोच असे नाही हे लक्षात असु द्या.
अरेरावी, दादागिरी अशा कुठले प्रसंग उमेदवाराच्या बाबतीत ऐकले असतील तरी अशा प्रसंगाची सत्यता पडताळुन घ्यावी, कसलाही पुर्वग्रह न ठेवता, उमेदवार वरील सर्व निकषांवर(१,२,३ प्रश्नांच्या वरील परीच्छेदातील निकष) खरा उतरतो का? हे पाहावे व मगच मतदान करावे...तर 

सध्यातरी किमान वरील तीन प्रश्नाची उत्तरे जर "हो" असतील तर तुमचा निर्णय योग्य आहे व समाजाच्या हिताचा आहे असे अभिमानपुर्वक समजा.

1 comment: