Tuesday, January 31, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा


अष्टावक्र गीता

राजा जनक - चरीत्र दर्शन

रामायण, महाभारत वेदांत आदी ग्रंथांतुन राजा जनकाचा उल्लेख आहेच, तसेच काही पुराणामध्येदेखील राजा जनकाच्या चरीत्राचा उल्लेख आढळतो. बालपणापासुन टिव्ही, सिनेमा आदींतुन आपण जनकास फक्त एकाच व्यक्तिरेखेत पाहीलेले आहे, ते म्हणजे जानकीचा पिता. महादेवी सीता ही जनकाचीच पुत्री आहे व "जनक" या नावावरुनच तिचे नाव जानकी असे ही ठेवले गेले. २० वर्षापुर्वी ज्यांनी महाभारत मालीका टिव्हीवर पाहीली असेल त्यांना जर आठवत असेल तर त्यात दाखवलेला जनक एक हतबल "पिता" आहे असेच आपण आजपर्यंत मानतो आहोत. मालिका व सिनेमे भारतीय महापुरुषांच्या जीवन चरीत्रांना कधीच न्याय देऊ शकणार नाहीत. याला कारण ही तसेच आहे. एका व्यक्तिरेखेवर आपण लक्ष केंद्रीत करावयास गेलो तर त्या व्यक्तिरेखेच्या अनुशंगाने शेकडो व्यक्तिरेखा दृष्टीगोचर होतात. त्यामुळे दुरदर्शन वरील रामानंद सागर यांची मालिका म्हणजे "मर्यादापुरुषोत्तम श्रीराम" या एका व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रीत करुन तयार केलेली असल्याने, त्यात इतर पात्रांना तितकास न्याय देता आलेला नाही. असो.

जनक राजाचे वर्णन करताना उपरोक्त ग्रंथ त्याचा उल्लेख करताना अनेकविध विशेषणे वापरतात.
उदा - विदेही. म्हणजे ज्यास देह अहंकारापासुन सुटका प्राप्त असा तो म्हणजे विदेही. खरतर अध्यात्मात या स्तरापर्यंत पोहोचणे म्हणजे खुप मोठी उपलब्धी मानली जाती. देहाभिमान विसरला असा "वि"देही. जो "देह" नाही असा विदेही. अद्वैत मता मध्ये द्वैत नसतेच.  जनकास अद्वैत मताचा उपदेश अष्टावक्र मुनिकडुन झाला, पण जनकास "विदेही" हे विशेषन मात्र अष्टावक्र मुनिंची भेट होण्या आधीपासुनच लावले गेले आहे. सामान्य साधकास देहाभिमान, देहाहंकारापासुन सुटका करुन घेणे त्या अर्थाने सोपे आहे कारण त्याच्या मागे व्याप कमी असतात. पण एक प्रजाहित दक्ष राजा व तो देखील विदेही? हे समीकरण थोडे अजबच वाटते. असेच आश्चर्य व्यासपुत्र मुनि शुकास देखील वाटले व कुतुहलापोटी मेरु पर्वतापासुन म्हणजे त्याच्या निवासापासुन सलग तीन वर्षे पायी भ्रमण करीत मिथिला देशी पोहोचला होता. शुक आणि जनक हा देखील एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. पुन्हा कधी तरी या विषयावर आपण चिंतन करुयात. तर एका राज्याचा कारभार पाहणारा एक व्यक्ति देखील "देहातीत" अवस्थेस पोहोचु शकतो. व हे केवळ भारतातच घडु शकते. बर त्याचे राज्य नुसते येरेगबाळे राज्य नव्हते, तर तेथील प्रजा अत्यंत सुखी व ज्ञानी देखील होती. रोजगार, रस्ते, पाणीव्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण आदी सर्वच अंगांनी राज्याची प्रगती इतकी झालेली की हजारो कोस दुरुन चिकित्सक(उदा -शुक मुनि) राज्य शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इथे येत. तर अशा राज्याचा राजा अध्यात्मात देखील प्रचंड गतिमान होता. इथे आवर्जुन एक उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे तथागत भगवान बुध्द देवांचा. भारतीय संस्कृतीने दिलेल्या अनगणित अनमोल नररत्नांपैकी ही दोन रत्ने आहेत. एकाने राजविलास, राजवैभव या सर्वांचा त्याग करुन सलग सहा वर्षे तप करुन , गरजा कमी करुन , कमी अन्न, कमी पाणी, कमी बोलण, तपाच्या शेवटी शेवटीतर बोलणे बंदच, आदी प्रकारे तप करुन "विदेहावस्था" प्राप्त केली. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही असा साक्षात्कार होणे, अनुभव होणे म्हणजेच विदेहावस्था होय. तर दुसरीकडे राजा जनक आहे, ज्याने राजपाट सांभाळता सांभाळता विदेहावस्थेस प्राप्त झाला. त्याने राजकारभार देखील केला व नुसताच केला नाही तर तो आदर्श केला व परमार्थ ही केला व तो देखील आदर्शच केला.
असो.
जिज्ञासुंनी जनकाचे चरीत्राचे अनुशीलन आणखी ही भिन्न प्रकारे करावे. अनेकविध पैलुंनी युक्त असा हा राजा अलौकिक होता. राजा असुनही योगी होता. राजा असुनही भक्त होता. राजा असुनही तर्कपंडीत होता. राजा असुनही कुशल योध्दा व परम प्रतापी होता. त्याच्या जीवनप्रवासात तो टप्प्याटप्प्याने उर्ध्वगामी गतीस प्राप्त होत होता.

त्यामुळेच भगवान श्रीकृष्णाच्या भगवदगीतेत ज्याप्रमाणे गुरु-शिष्य प्रश्नोत्तरे पाहायला मिळतात त्याप्रमाणे अष्टावक्रगीतेत प्रश्नोत्तरे नाहीत. अष्टावक्र गीतेत "संवाद" पाहावयास मिळतो. दोन अत्यंत बुध्दीमान, अधिकारी पुरुषांचा संवाद अष्टावक्र गीतेत अनुभवास येतो. अष्टावक्र गीता अद्वैत मतातील एक महान ग्रंथ आहे, मग त्या ग्रंथात वर्णन केलेला अद्वैतवाद या दोन व्यक्तिंच्या संवादात झळकणार नाही तरच नवल. इथे गुरु-शिष्य असे द्वैत नाही, हीच या अष्टावक्र गीतेची खुप मोठी उपलब्धी आहे.
टिप - अजुन ही इथे प्रत्यक्ष अष्टावक्र गीतेतील श्लोकांचा अर्थ , त्यावर विश्लेषण करण्याचे मी जाणीवपुर्वक टाळले आहे. जिज्ञासुंनी मुळातुनच या महान ग्रंथाचा अभ्यास करावा यासाठी असे केले आहे. परंतु, जर अष्टावक्र व जनक यांच्या चरीत्राचा अभ्यास असेल तर या गीतोपनिषदात शब्दबध्द केलेला "अद्वैतवाद" समजण्यास सुलभ होईल , अशा कारणाने त्रोटक रुपात जनकाच्या चरीत्राचा व त्याच्या व्यासंगाचा उल्लेख इथे केला आहे.

हेमंत सिताराम ववले.


Friday, January 13, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा --अष्टावक्र गीता - एक चिंतन

ठेवा भारतीय दर्शनांचा
अष्टावक्र गीता - एक चिंतन
एकीकडे बायबल उच्चरवाने उद्गोष करीत आहे की "मनुष्य मुळात पापी आहे, व ईशु ला शरण गेल्यावरच त्याच्या पापांचे क्षालन होईल", तर अनादी काळापासुन भारतीय दर्शने , साहीत्य, मनुष्याच्या थोरवीची गीते गात आहेत. आचार्य शंकरांच्या निर्वाण षटकं मध्ये त्यानी "वयं अमृतस्य पुत्रः" असा जयघोष केला. 
आचार्य शंकराच्या आधी कित्येक हजारो वर्षे लिहिल्या गेलेल्या अष्टावक्र गीतेत, मनुष्याच्या थोरवीची, महतीची , मनुष्यातील, नव्हे नव्हे, चराचरातील प्रत्येक जीव , वस्तुतील देवत्वाचे वर्णने शब्दांच्या मर्यादेत बसवुन,त्या शब्दांनाही थोरवी प्राप्त करुन दिली आहे.

मनुष्यामधील देवत्वास स्वीकारणारे, त्याचा जयघोष करणारे, देवत्व साजरे करणारे विचार भारतीय संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपासुन आहेत. हे सगळे एवढ्या साठीच लिहाअयचे की आजकाल भारतामध्ये एक विषिष्ट वर्ग देव,धर्म न मानता, केवळ "माणुसकी हाच आमचा धर्म" अशी टिमकी वाजवताना दिसतात. अशी टिमकी वाजवताना, त्यातील एक अस्पष्ट संदेश, असा दिला जातो की जणु "माणुसकी" नावाची गोष्ट भारतास ठाउकच नव्हती यापुर्वी.
अष्टावक्र गीतेच्या पहील्या अध्यायात, मुनि अष्टावक्र राजा जनकास उपदेश देताना म्हणतात, की तु कोणत्याही वर्णाचा (आजच्या भाषेत जातीचा) असु देत, तु कोणत्याही आश्रमाचा (आश्रम म्हणजे काय माहीत नसेल तर कमेंट मध्ये विचारा) असु देत, तु स्त्री असो वा पुरुष असु देत, तुला संपुर्ण अधिकार आहे, स्व-रुपा ला जाणण्याचा. कारण तु म्हणजे मुळात दॄष्य असणारे, असे काहीच नाहीस, तु शरीर नाही, तु मन बुध्दी अहंकार नाही, तु, म्हणजे तुझे वैभव वा तुझे दारीद्रय नाही, तु म्हनजे तुझ्या अवतीभवतीचा संसार नाही, तु म्हणजे हे विश्व नाहे, तु म्हणजे ही पृथ्वी नाही, तु खर तर या सा-यांचा साक्षी आहेस, चैतन्य स्वरुप आहे, या सा-यंमध्ये जे तत्व सामायिक आहे , ते तुच आहेस.
 शब्दांची किमया, कविकल्पना , उदाहरणे सुरेख दिली आहेत. दुस-या अध्यायात, जनक राजाच्या मुखातुन "स्व-रुपा" विषयी जे काही बोलवले गेले आहे , ते थोड्या अधिक फरकाने माउलींच्या ज्ञानेश्वरीतदेखील आढळते, काही अम्शी तुकोबा रायांच्या अभंगात देखील आढळते. शंकराचार्यांच्या विविध रचनांमध्ये ही अशा प्रकारचे दाखले दिले गेले आहेत.
मी (म्हणजे मानव या अर्थाने वाचा) , शुध्दबोध आहे, मी ज्ञान, ज्ञेय, ज्ञाना असे देखील काहीच नाही, मी या सर्वांच्या पलीकडचा आहे. मला नमस्कार असो.
इतक्या स्पष्ट पणे माणुसपणास नमस्कार करणारे तत्वज्ञान अन्यत्र कुठे आहे? कुठे ही नाही. त्यामुळेच मित्रहो, जो पर्यंत आपण आपल्या पुर्वजांनी दिलेल्या ज्ञानास घेण्यास अनुकुल होत नाही, जोपर्यंत आपण त्यांना स्वीकारत नाही, तो पर्यंत आपणास कधीच कळणार नाही की आपल्या संस्कृतीमध्ये किती वैविध्य , किती स्वातंत्र्य होते. आपले पुर्वज किती गहन तत्वांचे दृष्टे होते, हे आपणास कधी ही समजणार नाही जोपर्यत्न आपण त्यांच्या कार्याचा, तत्वज्ञानाचा अभ्यास करणार नाही.
मुद्दामचे या लेखात दुस-या अध्यायातील श्लोकांवर टिपणे केली नाहीत. आपण स्वतः , निवांत वेळी, एक एक श्लोक वाचुन त्यावर मनन, चिंतन कराल, ही अपेक्षा.
हेमंत सिताराम ववले

Wednesday, January 11, 2017

ठेवा भारतीय दर्शनांचा

ऋषि अष्टावक्र व अष्टावक्र गीता
रामायण, महाभारत तसेच छांदोग्य उपनिषदात, अष्टावक्र चरीत्राचा उल्लेख विस्ताराने आढळतो. ढोबळ मानाने कथा खालीलप्रमाणे आहे.

उद्दालक मुनी, आपल्या गुरुकुलामध्ये स्वतच्या मुलासह(श्वेतकेतु) अन्य ही साधकांना वेद-विज्ञाना आदींचे शिक्षण देत असतात. गुरुवर्य्यांना सुजाता नामक एक सुंदर, सुशील कन्या देखील आहे त्यांच्या आश्रमात, कहोद नावाचा आणखी साधक, जो अत्यंत बुध्दीमान तसेच वेद आदींचा अभ्यासु व निष्णात, साधक देखील असतो. आचार्य उद्दालक, आपल्या उपवर मुलीसाठी आदर्श वर म्हणुन कहोद कडे अपेक्षा ठेवतात. प्रमाणे, कालांतराने, कहोद व सुजाता यांचा विवाह होतो. सुजाता गर्भवती राहील्यावर, सुजाता आपल्या पतीस, ऋषि कहोदास, होणा-या मुलाच्या पालनपोषणासाठी अधिक धनसंपत्ती मिलवण्यासाठी राजा जनकाकडे पाठवते. जनकाकडे, त्याच वेळी "बंधी" नावाचे एक विद्वान ऋषी असतात, जे शास्त्रार्थात निष्णात असतात. बंधी ऋषि, स्वतच्या यशामध्ये इअतके बुडालेले असतात की ते एक विचित्र अट घालुन स्वतचे श्रेष्टत्व सिध्द करण्याचे जणु व्यसनच त्यांन जडलेले असते. जनक राजाच्या आश्रयाने, व अनुमतीने बंधी मुनी शास्त्रार्थ व वादविवाद याची एक स्पर्धा आयोजित करतात व बंधी ज्यांना या स्पर्धेत हरवेल, त्यांना समंगा नदीत जलसमाधी घ्यावी लागेल अशी ती अट असते. कहोद, धन मिलवण्याच्या लालसेने ते आवाअहन स्वीकारतात, व वादविवादात पराभुत होऊन, जलसमाधी घेतात.
इकडे ही बातमी सुजातास समजल्यावर, तिला पश्चाताप होतो. तदपश्चात, ती एका विचित्र अवयव असलेल्या बालकास जन्म देते. या बालकाचे शरीर आठ ठिकाणी वाकडे असते, तसेच दिसायला ही हे बालक, कुरुप दिसणारे असते. याचे नावच "अष्टावक्र" असे ठेवण्यात येते.
बालक मोठा होत जातो, अभ्यास करतो, कष्ट घेतो. जाणत्या वयामध्ये, जेव्हा त्यास स्वतच्या पित्याविषयी व त्यांच्या जलसमाधी विषयी समजते, तेव्हा, अष्टावक्र स्वतच्या मातेस व आजोबा, उद्दालक मुनि यांची परवानगे घेऊन व श्वेतक्केतुस सोबत घेउन, जनक राजाकडे येतो. जनक राजा, तसेच दरबारातील, अनेक लोक त्या विकलांग तरुण साधकाकडे चेष्टेने पाहुन त्यावर हसतात. त्यावेळी अष्टावक्र म्हणतो, माणसाची ओळख त्याच्या वय व दिसण्यावरुन नसते, तर त्याच्या बुध्दीवरुन असते. असे म्हणुन तो, बंधी ऋषिस वादविवादासाठी आव्हान देतो. त्यांची चर्चा, वादविवाद, सलग सात दिवस सुरु असतो. अखेरीस, बंधी ऋषिंना हार मान्य करावी लागते. वादविवादाच्या शर्ती नुसार, बंधी ज्यावेली जलसमाधीसाठी नदीत उतरतात, त्यावेळी अष्टावक्र, त्यांना तासे करण्यापासुन परावृत्त करतो. या सगळ्या प्रकाराने राजा जनक अत्यंत प्रभावित होऊन, अष्टावक्रास गुरुस्थान अर्पित करतो. त्यानंतर जनक आणि अष्टावक्र ऋषि यांमध्ये जो संवाद झाला आहे तो म्हनजेच
"अष्टावक्र गीता" होय.