भाग - १
इकॉलॉजिकली
सेंसीटीव्ह एरीया, म्हणुन वर्गीकरण झालेल्या क्षेत्रात, वेल्हे तालुक्यातील सर्वच(मोजकी
३-४ गावे सोडुन) गावांचा समावेश झालेला आहे. अशा प्रकारे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील
असणा-या या तालुक्यात मग विकासाची गंगा कधी येणारच नाही का? जंगलांचा आज तागायत झालेला
–हास , व अजुनही पत्येक वर्षी वणव्यांच्या रुपाने होणारी अपरीमीत हानी कधी थांबेल काय?
शहराकडे स्थलांतरीत होऊ लागलेल्या येथील लोकांस येथेच कायमस्वरुपी रोजगार मिळणार नाही
काय? वनौपज संरक्षण व संवर्धनातुन रोजगार, व्यवसाय निर्मिती होणार नाही काय? या व अशा अनेक प्रश्न , समस्यांवर व्यापक विचार करण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
पावसाळ्यात नयनरम्य वाटणारे हेच डोंगर, उन्हाळ्यात मात्र अप्रेक्षणीय होतात. |
उत्तरी-पश्चिम घाट , तेव्हा आणि आता या शीर्षकाचा एक व्हिडीयो युट्युब वर पाहीला.इकॉलॉइकल सोसायटी ने सर्वेक्षण करुन अभ्यास करुन उत्तर - पश्चिम घाटाविषयी अतिशय सखोल माहीती यात दिली आहे.
पश्चिम घाट उत्तरेकडे गुजरात, डहाणु पासुन सुरु होऊन, दक्षिंणेत केरळ पर्यन्त पसरला आहे. अंदाजे लांबी १६०० किमी तर अंदाजे क्षेत्रफळ ६०,००० चौ कि मी आहे. किमान १५ करोड वर्षापुर्वी गोंडवन नावाच्या एका भुखंडाचे तुकडे झाल्याने व तो पुर्वोत्तर सरकल्यामुळे, युरेशिया खंडाला येऊन मिळाला. असे झाल्यामुळे अंदाजे ६.५ कोटी वर्षापुर्वी इथे ज्वालामुखीचा उद्रेक होऊन,दख्खन चे पठार म्हणतात ते निर्माण झाले.
या पश्चिम घाटास आपण सह्याद्री असे ही म्हणतो. दक्षिंणेकडील बाजुने आपण पश्चिम घाट पाहीला तर असे स्पष्ट पणे जाणवते की, महाराष्ट्राच्या उत्तरेकडे पश्चिम घाटाची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पुण्याचेच उदाहारण घ्या. पुण्याच्या पश्चिमेला चार तालुके आहेत. मावळ, मुळशी , वेल्हे व भोर. या चार ही तालुक्यातील पश्चिमेकडचा सर्वच्या सर्व भाग, ज्यास स्थानिक भाषेत "मावळ" असेच म्हणतात, हा खुद्द पश्चिम घाटाचाच एक भाग आहे. तसेच आणखी उत्तरेकडे गेल्यास भीमाशंकर दिसते. एक संरक्षित क्षेत्र म्हणुन भीमाशंकर अभयारण्य व तेथील वनराई बहुंशी शाबुत आहे. पुणे शहराच्या पश्चिमेकडील या चार ही तालुक्यातील जंगलांचा, वनक्षेत्रांचा, डोंगर उतारांचा -हास खुप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.
मागच्याच आठवड्यात मुळशी-ताम्हिनी परीसरात जाण्या्चा योग आला. मुळशी धरणाचे पाणी उजव्या बाजुला दिसायला लागताच डावीकडील डोंगररांगामध्ये असणारी गर्द वनराई लक्ष वेधुन घेते. उंच च्या उंच डोगररांगा व त्या डोंगरांच्या खांद्यावर वाढलेली जंगले, हे म्हणजे डोळ्याचे पारणे फेडणारेच होते. ही वनराई अगदी कोकण भागापर्यंत दिसुन येते.
याच्याच विरुध्द अवस्था वेल्ह्याची आहे. या दिवसात, म्हणजे फेब्रुवारी नंतर मे पर्यंत जर वेल्ह्या च्या मावळ भागात प्रवासाचा तुम्हाला योग आला तर, तुमचे लक्ष वेधुन घेईल ते म्हणजे जळालेले डोंगर, तर कुठ जळणारे डोंगर. नुसतेच डोंगर जळतात असे नव्हे, तर वेल्ह्यातील किल्ले देखील जळतात. तोरणा जळला आहे, राजगड देखील जळलाय. तोरणा किल्ल्याच्या पश्चिमेकडील डोंगररांगेवर अतिशय छान जंगल आहे. बहुधा ते वनविभागाच्या ताव्यात असावे. पण ते ही जळाले आहे. निवी, विहीर, अंत्रोली, बाघदरी ची अवस्था देखील अशीच आहे. राजगड व तोरणा किल्ल्यास जोडणारी रांग देखील जळुन खाक झाली आहे. इकडे, वरोती, कोलंवी, घिसर भागात देखील कमी अधिक प्रमाणात डोंगर जळाले आहेत. जाधववाडी मधुन पासली कडे जाताना,रस्त्याच्या डाव्या बाजुला असलेला भुखंड देखील जळुन गेला आहे.
मी ब-याचदा गावक-यांशी या विषयावर बोलतो तेव्हा समजते की बहुतांश लोकांना वणवा नको असतो. वणवा लागल्या मुळे, मे महिन्यापर्यंत चरण्यासाठी शिल्लक असणारे गवत, फेब्रुवारी महिन्यातच संपते, व जनावरांस वण वण भटकावे लागते. कित्येकदा गावकरी, वणवा विझवताना देखील दिसतात.
जर हे वणवे लागण्याचे कारण रस्त्यावरची वर्दळ असेल तर, शासनाने (म्हणजेच तहसील, वनविभाग ) रस्त्याच्या दुतर्फा जाळ रेषा, कमीत कमी २० फुटाची काढणे गरजेचे आहे.
तसेच चुकुन वणवा लाअगलाच, तर त्या वणव्यामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठीच्या उपाय योजना देखील करायला हव्यात. जसे, नैसर्गिक जे पाण्याचे प्रवाह आहेत, त्या प्रवाहातुन आग, एका बाजुकडुन दुस-या बाजुस जाऊ नये यासाठी, त्या पाटातील (नाल्यातील किंवा नाळेतील) दोन बाजु जोडणारी वाळलेली लाकडे, गवत काढुन घेणे, जेणे करुन आग लागलीच तर ती एका बाजुलाच अडकेल, दुस-या बाजुस जाणार नाही.
सोबतच रस्त्याला व पहील्या जाळरेषेला समांतर दुसरी जाळरेषा, किमान १०० मी अंतरावर काढली तर दुर डोंगरमाथ्यावर आग पोहोचण्याची शक्यताच राहणार नाही.
वरकरणी जाळ रेषा काढली पाहीजे असे म्हणायला खुप सोपे आहे पण प्रत्यक्षात हे काम करणार कसे व कोण? त्यासाठी निधी कोण देणार? मनुष्यबळ कुठुन मिळणार?
तर यासाठी आपण म्हणजे शासनाने पुढची पाच वर्षे किमान, नवीन झाडे लावायचे बंद केले की मनुष्यबळ मिळेल, निधी देखील मिळेल. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांवर दरवर्षी शेकडी कोटी रुपये खर्च केले जातात. व आज पर्यंत या वृक्षारोपण कार्यक्र्मातुन लावलेल्या झाडांची जंगले आपण कधी पाहीली नाहीत. तर हा खर्च टाळुन शासनाने, वणव्यापासुन डोंगररांगाचे संरक्षण जर केले, तर आपोआप बीज अंकुरतील, रोपे येतील, जंगले वाढतील. कारण एक एक वृक्ष लाखो बीजांची निर्मीती करतो, गरज असते फक्त हे बीज जळु न देण्याची. वृक्षारोपणाचा निधी इकडे संरक्षणाकडे वळवल्यास, स्थानिक लोकांस रोजगार हमी च्या अंतर्गत, कामे देऊन ज्या जाळ रेषा काढण्याचे काम करता येऊ शकते.
महोद्य, आपणास विंनती आहे की, आपण वरील संदेश गांभीर्याने घ्याल, यावर अधिक अभ्यास करुन योग्य ती पावले उचलाल. आपण वेल्हा तालुक्यापासुन सुरुवात करुन एक रोल मॉडेल तयार करुन सर्वांसमोर आदर्श ठेवु शकता.
आपण जर खरच असे काही करु शकलो, तर फक्त पाच वर्षांच्या कालावधी मध्येच हा उत्तरी-पश्चिम घाट देखील पुन्हा सदाहरीत होऊन इथे देखील जैव विविधतता जोपासली जाईल.
(या संदर्भात आणखी कसल्याही सल्ल्या-माहीतीची आवश्यकता असल्यास आपण मला ०९०४९००२०५३ वर संपर्क करु शकता, किंवा या इमेल वर देखील संपर्क साधता येऊ शकतो.)
श्री हेमंत सिताराम ववले
No comments:
Post a Comment