Tuesday, November 14, 2017

फरक आहे की नाही?


मानवी मनास ह्या अपरंपार सृष्टीच्या गुढतेची ओढ अगदी सनातन आहे. मनुष्यास प्रश्न पडतात म्हणुनच तो मनुष्य आहे अन्यथा तोही एक आहार-निद्रा-मैथुन यातच रमणारा आणखी एक जीव असाच असता. ह्या प्रश्न पडण्यामुळेच ज्ञानाची अनगनित क्षेत्रे खुली झालेली आहे. मग ते क्षेत्र कोणतेही असो. अगदी अध्यात्मापासुनन ते आधुनिक विज्ञानापर्यंत. व ही जी काही क्षेत्रे आहेत ती सगळीच्या सगळी मानवीच्या मनाच्या ह्या प्रश्न पडणा-या, चिकित्सक वृत्तीमुळे निर्माण झालेली आहेत.
याच चिकित्सक वृत्तीतुन विविध दर्शने मांडली गेली. ह्या दर्शनांमध्ये मानवी मुल्यांचे संकलन झालेले दिसते. याच परंपरेमध्ये भारतामध्ये अनेक सांप्रदाय गेली हजारो वर्षे उद्यास आलेले आपण पाहत आहोत. ह्या विविध सांप्रदायांमध्ये आचरण आणि मुल तत्व असे दोन्ही प्रकारचे भेद आहेत. प्रत्येक सांप्रदायाची स्वतची एक उपास्य देवता/देव आहे.
गेल्या १२०० वर्षांपासुन भारतात इस्लाम हा सांप्रदाय देखील वाढला. तो वाढण्याची कारणे सांप्रदायिक उच्च मुल्ये होती असे मुळीच नाही. इस्लाम भारतामध्ये वाढण्याचे मुख्य कारण होते तलवार. तलवारीच्या जोरावर जगभरात पसरलेला ह्या सांप्रदायाच्या अनुयायांनी भारतात देखील हिच पध्दती अवलंबीली.
सहाव्या शतकात वेद वेदांताला पुन्हा एकदा प्रस्थापित करणा-या आचार्य शंकराच्या जीवनातील एक प्रसंग या ठिकाणी सांगावासा वाटतो. त्यांच्या अल्पशा म्हणजे अवघ्या ३२ वर्षांच्या काळात त्यांनी अनेक महान कार्ये केली. भारतात अष्टदिशांना मठांची स्थापना करुन गणराज्यांमध्ये विभागलेल्या भारतास त्यांनी सांस्कृतिक एकराष्ट्रभावा मध्ये गुंफले. दरम्यान त्यांचा सामना एका बौध्द सांप्रदायाच्या एका उच्च अधिकारी व्यक्तिशी झाला (मला त्यांचे नाव आता स्मरत नाहीये) . त्या दोघांमध्ये अखंड सात दिवस वाद-विवाद , धर्मचर्चा सुरु होती. वेदांताला पुनरुज्जीवीत करण्याचे महत्कार्य करणा-या आचार्यांनी त्याअ बौध्द व्यक्तिस चर्चे मध्ये परास्त केले. त्यानंतर ती बौध्द व्यक्ति बौध्द मताचा त्याग करुन आचार्यांचे शिष्यत्व पत्करुन वैदीक परंपरेमध्ये आली. तर हे दोघेही महान असे बुध्दीजीवी होते. व तर्कशास्त्र व दर्शनशास्त्र या विषयांत तसेच धर्माचे जीवनातील स्थान या बाबतीतही ते अधिकारी होते. पण त्यांमध्ये अहंकार नव्हता. शंकराचार्य योग्य की ते बौध्द व्यक्ति योग्य असा चर्चेचा सुर नव्हता. चर्चा तत्वाधीन होती. हे तत्व मानवी जीवनास अधिक लाभदायक आहे की ते तत्व मानवी जीवनास अधिक लाभप्रद आहे या बाबतीत चर्चा होती. व ती व्यक्तिनिरपेक्ष होती. त्यामुळेच जे योग्य ते , बौध्द व्यक्तिने आत्मसात करुन वैदीक पंरंपरा स्वीकारली.
तर वरील प्रसंगावरुन आपणास हे दिसते की,  अगदी इस्लामचा जन्म होण्या अगोदर पर्यंत भारतात उपासना पध्दतीचे स्वातंत्र्य अगदी सर्वांना होते. व हि उपासना पध्दती जन्मावर आधारीत नसुन ती व्यक्तिच्या आकलन शक्तिवर व श्रध्देवर आधारीत होती. आजही आपण हेच पाहतोय भारतात. एकाच कुटुंबात अनेकविध देवतांची पुजा अर्चा करणारी अनेक मंडळी , अगदी एका छताखाली राहतात. यास काय म्हणावे? तर हे आहे साप्रदायिक सौहार्द.
बर आता हे साप्रदायोक सौहार्द आणखी खोलात जाऊन आपण पाहुयात. घरात मुलांना आवडणारे देव कोणते? तर गणपती व मारुती. बरोबर ना? बर आजपर्यंत आपण कधीतरी आपल्या मुलांना हे शिकवल्याचे आठवते आहे का, की गणपती आणि मारुती एकच आहेत. युवक किंवा प्रौढांचीए उपास्य देवता वेगळी असु शकते , किंवा एक ही असेल. पण देव देवता अनेक आहेत. व्यापाराच्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पुजा करतो, व घरी कदाचित सगळेच्या सगळेच असतात किंवा, एखाद्याकडे एखादे दत्त मंदीर, किंवा विठ्ठल मंदीर ही असते देवघरात. इतके वैविध्य असताना आपण कधीही हे सगळे देव एकच आहेत असा अट्टाहास करीत नाही.
मग नेमके अल्ला आणि ईश्वर, असे शब्द द्वय आल्यावरच, हे दोघेही एकच आहेत असे भोंगळ तत्व कसे काय बरे सांगितले जाते. काही लोकांच्या मते हे दोघे ही, त्या एकाच परमात्म्याची दोन वेगळी रुपे आहेत. क्षणभर आपण असे मान्य जरी केले तरी, सामान्य माणसास,(बुध्दीजीवी नव्हे) ती परमतत्वाची भाषा कळत नसल्यानेच त्या परम तत्वाच्या अवनत रुपाची गरज निर्माण झाली. परम तत्व निराकार आहे, असे आपण समजु यात. सर्वशक्तिमान आहे, सर्वज्ञ आहे, वगैरे, वगैरे… तर अशा निराकार अनंत अशा सत-चित-तत्वास समजुन घेण्याची सर्वांचीच कुवत नसल्याने प्रत्येकाने आपापल्या परीने , समजेल, रुचेल, प्रांत, वेश आवडेल अशा एखाद्या साकार रुपाची निर्मीती केली. ज्या लोकांनी ह्या साकार रुपाची निर्मीती केली आहे , त्यांच्या पक्षी त्यांनी निर्माण केलेले साकार रुप म्हणजेच सर्वकाही आहे. सर्वशक्तिमान कोण तर त्यांनी निर्माण केलेले रुप. त्या निर्माण करणा-यांच्या पक्षी साकाराच्या (शब्द-मुर्ती आदी द्वारे ज्याचे वर्णन करता येऊ शकते असे रुप) पलीकडे आणखी काहीही नाही.
माझ्यासारख्या माणसास जर विचारले की कोणता देव खरा आणि कोणता खोटा? किंवा कोणता देव त्या शब्दांच्या पलीकडे असलेल्या चिदानंद स्थितीचे प्रतिनिधीत्व चांगले करु शकतो? तर मी म्हणेन त्या सर्वात्म शक्तीची अभिव्यक्ति तर चराचरात होते आहे. मला कोणत्याही मुर्ती अथवा नावाची गरजच नाहीये. (सर्वम खलु इदं ब्रम्हं!!)
खंडण
१.      पण आपण ज्या दोन व्यक्तिरेखांविषयी बोलत आहोत त्या दोन व्यक्तिरेखा, दोन आहेत. ज्या अर्थी मी म्हणतोय , किंवा तुम्ही म्हणताय की त्या “दोन" आहेत त्या अर्थी त्या दोनच आहेत. एक नाहीत हे प्रथमदर्शनी सिध्द होते आहे.
२.      आधी सांगितल्या प्रमाणे आपण आपल्या मुलांना ज्याप्रमाणे गणपती आणि हनुमान एकच आहेत असे सांगण्याच्या फंदात पडत नाहीत तर ईश्वर आणि अल्ला एकच आहेत, हे शिकविण्याची घाई आपण का करतो. आपल्या मुलांस प्रश्न पडु द्या, त्यांना उत्तरे शोधु द्या, संशोधन करु द्या. का म्हणुन आपण स्वतस व पुढच्या पिढ्यांस अपंग बनवित आहोत. विचक्षण असणे हा देखील एक अमुल्य असा गुण विशेष आहे.
३.      तिसरे असे,, जर तुमचे म्हणणे असे आहे की त्या दोन असुन एकच आहेत तर, (तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा) तुमच्या इष्ट देवतेच्या जागी दुस-या देवाची उपासना कधीपासुन सुरु करताय ते सांगा? तुम्ही जर हिन्दु कुटंबात जन्मला असाल व तुमचे म्हणणे असेल की अल्ला आणि इश्वर हे एकच आहेत, तर तुम्ही कदाचित तुमच्या ह्या (नसलेल्या, जबरदस्तीने आणलेल्या) सांप्रदायिक सौहार्दाच्या हट्टाने प्रेटुन जाळीदार टोपी घालुन घरातच अल्लाची इबादत सुरु कराल देखील. पण तुम्ही असा एकतरी मुसलमान दाखवु शकाल का, की जो अल्लाची इबादत सोडुन आकंठ विठुरायाच्या भक्तिमध्ये बुडुन जाईल (दांडीया आणि गणपतीचे उदाहरण नको इथे देऊ कृपा करुन).
४.      आणखी असे, की आपण दोन्ही साप्रदायात ज्याप्रमाणे त्या दोन व्यक्तिरेखांचे वर्णन की गेले आहे, व हे केलेले वर्णन, त्या त्या सांप्रदायाच्या अनुयांयाना मान्य देखील आहे. तर ह्या वर्णनाच्या आधारावर, त्या त्या व्यक्तिरेखेच्या चरीत्रावर, उपदेशावर तुलनात्मक अभ्यास केला तर आपणास हे लगेच समजेल की ही दोन्ही व्यक्तित्वे भिन्न आहेत व ती भिन्न प्रकारचे आयुष्य जगली व भिन्न भिन्न उपदेश त्यांनी जगास दिले. मी जाणीव पुर्वक या दोन व्यक्तित्वापैकी एक श्रेष्ट व दुसरा दुष्ट असा भेद करण्याचा मोह टाळतो आहे. तो वाचकांनी करावा.
५.      आणखी एक महत्वाचा मुद्दा. एक बुध्दीजीवी म्हणुन एखाद मान्य करेल की दोघेही सारखेच आहेत किंवा एकच आहेत. कारण बुध्दीजीवी माणुस त्याच्याही पुढे जाऊन म्हणेल की ते दोघेच काय सगळी सृष्टीच एक सारखी आहे. यात भेद मुळीच नाही. कारण चराचरामध्ये एकच सामान्य तत्व आहे. विज्ञानवाद म्ह्णेल सगळ्यात अणुरेणू आहेत. सगळ्यांचे आकार भिन्न असले तरी मुलतः ते एकच आहेत. पण अल्ला आणि ईश्वर यास माणणारे लोक वैज्ञानिक नाहीत आणि बुध्दीजीवी देखील नाहीत. त्यांच्यासाठी सत्य हवे आहे. कि जे निखळ सत्य असेल. सुर्यासम प्रखर आणि तत्क्षणी योग्य-अयोग्य असा निर्णय करणारे. त्यामुळे ह्या दोन व्यक्तिरेखा एकच आहेत की भिन्न आहेत हे ठरविण्यासाठी आपणास त्या त्या व्यक्तिरेखांच्या अनुयायांच्या दृष्टीकोनातुन पहावे लागणार आहे. व मग आपण तटस्थ भुमिकेतुन, साकार रुपाच्या पार्श्वभुमीवर(च) याची पडताळणी करु शकतो.

पण जर सर्वात आधीचा जो परीच्छेद आहे, त्यात म्हंटल्याप्रमाणे, आपण जर आपल्यातील मुलभुत प्रवृतीचे (म्हणजे प्रश्न पडणे) दमन नाही केले, तर आपणास या दोन्ही व्यक्तित्वातील मधील भेद स्पष्ट दिसेल. 

Monday, October 30, 2017

माणसातील निसर्ग कधी जागा होईल का?

शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते. अनेक वाहन चालकांना हे माहीतच नाही की समोरुन दुसरी एखादी गाडी आली असता आपल्या गाडीचा दुय्यम प्रकाशझोत लावुन समोरच्या चालकास त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते. रात्रीच्या अंधारात अशाप्रकारे डोळे दिपल्यामुळे अनेक अपघात होत असतात. आपल्याकडे समस्या अनेक आहेत. रस्त्यांवर खड्डे असणे, रस्ते अरुंद असणे, रस्त्यावर लाईटस नसणे(ग्रामीण भागात), गतिरोधक नसणे किंवा असले तर त्यांची उंची एवढी जास्त असणे की गाडी सहीत चालकाची हाडे खिळखिळी होणे, अशा अनेक समस्या आहेत. या समस्या बहुंशी शासन यंत्रणेच्या कुचकामामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या अज्ञानामुळे आहेत. व त्यामुळे देखील अनेक अपघात होत असतात. नागरीक म्ह्णुन कदाचित या बाबतीत आपण निषेध, तक्रार, पाठपुरावा यापेक्षा अधिक काही करु शकत नाही. परंतु अप्पर आणि डीपर चा उपयोग आपण वाहन चालविताना केला तर आपण काही प्रमाणात तरी डोळे दिपण्यामुळे होणारे अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात करु शकतो. २०११ मध्ये या अशाच डोळे दिपण्यामुळे मला एक अपघात झाला व माझा डावा हात कायमस्वरुपी अधु झाला.
मला शनिवारी रात्री देखील अशा डोळे दिपण्यामुळे नीटसे दिसत नव्हते. अंधार होता. समोरुन एकही गाडी येत नसेल तरच रस्ता आणि रस्त्यावरचे खड्डे दिसत. संपुर्ण ३० किमी च्या प्रवासात एक अनाकलनीय गोष्ट जाणवली. दर पाच दहा फुटांवर , रस्त्यात अनेक बेडुक, रस्त्यावर धावणा-या गाड्यांच्या चाकाखाली येऊन, चिरडुन मरुन पडलेले दिसले. हजारोंच्या संख्येने असतील हे बेडुक. कधी कधी माझ्या गाडीच्या समोरुन टुणुक उडी मारताना ही अनेक बेडुक दिसले. लहान, मोठे मध्यम आकाराचे असंख्य बेडुक. एक दोन साप ही रस्त्या ओलांडताना चिरडले गेल्याचे दिसले.
बेडुक म्हणा किंवा साप म्हणा, ह्यांना काय गरज आहे रस्त्यावर येण्याची. इथे स्वतच्या गाडीच्या हेडलाईट मुळे समोरुन गाडी चलवत येणा-या माणसाचे काय हाल होतात याची तमा न बाळगणारा माणुस का म्हनुन ह्या तुच्छ बेडकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील बरे? रस्ते माणसांनी बनवलेत. माणसांचा अधिकार आहे रस्त्यांवर. त्या रस्त्यांवर बिनधास्त उड्या मारण्याचे धाडस बेडकांनी का करावे. चुक बेडकांचीच आहे. आणि त्या सापांची सुध्दा. रस्ते नसतील तर आमची प्रगती कशी होईल? आमच्या प्रगती साठी आम्ही रस्ते बनवुच आणि जर तुम्ही तुच्छ बेडुक किंवा साप, ससे, हरण भेकर आमच्या रस्त्यावर आले तर आम्ही तुमचा क्षुद्र जीव वाचवण्यासाठी गाडीचे ब्रेक दाबण्याचे कष्ट आम्ही माणसे का बरे घेऊ? ब्रेक दाबला व आमचा वेग कमी झाला तर आमची प्रगती कशी काय होणार बरे?
पण चुक बेडकांची हे नक्की. त्यांना समजत नाही का की ह्या सगळ्या डांबरी रस्त्यांवर आले नाही पाहीजे. का बरे एवढ्या मोठ्या संख्येने हे बेडुक रस्त्यावर येऊन जीव गमावत असतील? मला काहीही सुचत नव्हते. मन सुन्न, खिन्न झाले होते. माझ्या वेळ कमी होता. मला कॅम्पसाईटवर आमचे ग्राहक येण्या आधी पोहोचायचे होते. तरी देखील मी जाताना माझ्या गाडीच्या चाकाखाली कुणी ही बेडुक मरणार नाही याची दक्षता घेत गाडी चालवीत गेलो. सोबतच मी एक पट्टेरी मण्यार, म्हणजे अतिविषारी साप, कि जो रस्त्यावर आडवा होता व हळु हळु हालचाल करीत होता असा पाहीला. माझे लक्षात आल्यावर गाडी वळवुन माघारी आलो व गाडीचा प्रकाशझोत त्याच्यावर सोडुन आणि पाय आपटुन त्याला हळु हळु रस्त्याच्या कडेला झाडीत जाण्यास भाग पाडले. आणि दुसरा गवत्या साप. अगदी गवताच्या काडी सारखाच पातळ साप. रस्त्यात जर हा दिसला तर क्वचित असे वाटेल की गवताची काडीच पडली आहे. मी अशा प्रकारे दोन्ही दिसलेल्या सापांना रस्त्याबाहेर हाकलुन लावले. रस्ता काय त्यांच्या बापाचा आहे काय? आले मोठे आमच्या रस्त्यावर.
शनिवार रविवार आमचा निसर्गपर्यटनाचा कार्यक्र्म नेहमीप्रमाणेच अमेझींग, ऑसम असा झाला. माघारी निघताना रविवारी पुन्हा अंधारले. संध्याकाळची सांजवेळ. सुर्य पश्चिमेला सिंगापुर रोडच्या पल्याड, क्षितिजाला स्पर्श करता झाला. वेल्ह्याला पोहोचेपर्यंत मी मुद्दामहुन हेल्मेटची काच लावली नव्हती. वेल्हे सोडल्यावर मात्र रस्ता थोडा सुस्थितीत असल्याने, वेग वाढवण्याची संधी मिळते. त्यामुळे हेल्मेटची काच लावुन थोडा वेग वाढवला. आणि पुन्हा दिसायला लागले त्या राज्य मार्ग क्र. ६५ वर मृतुचे तांडव. फुटाफुटवर बेडुक उड्या मारुन मारुन रस्ता ओलाम्डण्याच्या प्रयत्नात वाहनांच्या चाकाखाली जीव देत होते. पुन्हा तेच प्र्श्न कशासाठी हे बेडुक मरणाला मिठी मारण्यासाठी रस्त्यावर येत होते? तीच खिन्नता. गाडी खड्ड्यांमध्ये आदळत होती, त्यामुळे गाडीच्या वेगवेगळ्या भागांचा आवाज येत होता. हेल्मेटच्या काचेच्या बेचंगळीतुन वा-याचा आवाज येत होता, मध्ये फटाक्यांचा आवाज, मध्येच एखाद्या गाडीच्या कर्णकर्कश्श हॉर्नचा आवाज. इतके सगळे आवाज असताना देखील स्मशान शांततेचा अनुभव येत होता. जीवे जीवस्य जीवनम असे आपण म्हणतो. त्यामुळे एखाद्या प्राण्याला दुस-या प्राण्याने भुक भागवण्यासाठी मारणे हे ठिक आहे. पण ह्या असंख्य बेडकांच्या मरणाने कुणाची भुक भागतेय? कुणाला काय फायदा होतोय? विशेषतः माणसाला काय उपयोग होतोय का?

आणखी एक गोष्ट मला जाणवली ह्या ३० किमी च्या राइड मध्ये. वेल्ह्याकडुन पुणे बेंगलोर हाय वे कडे येताना, गुंजवणी नदी रस्त्याला काहीशी समांतर, एखाद्या किमी च्या अंतरावर वाहते. म्हणजे पुण्याकडे येताना माझ्या डावीकडे नदी आणि उजवी कडे डोंगररांग. हा क्रम थोडा नीट पाहु. माझ्या डावीकडे सर्वात आध डोंगररांग आहे. ही डोंगररांग देखील रस्त्याला समांतरच आहे. डोंगर , मग डोंगर उतार, मग सखल भाग. ह्या सखल भागात भात खाचरे, काही गावे आणि मग रस्ता आणि उजवीकडे पुन्हा भातशेती आणि नदी.
बेडकांच्या उड्यामारण्या मध्ये एक साधर्म होते. सर्व बेडुक रस्त्याच्या डावीकडुन उजवी जाण्याच्या प्रयत्नात असताना उड्या मारीत रस्त्यावर येऊन चिरडले जात होते. काल रात्री हे माझ्या लक्षात आले नव्हते. निसर्गचक्राच्या अनेकविध आ-यांपैकीच ही एक आरी असावी असे मला तरी वाटते. पावसाळा संपलाय. डोंगर, डोंगर उतार व नंतरच्या सखल भागातील पाणी हळु हळु कमी कमी होत जाणार. बेडुक जरी उभयचर असला तरी पाणी व जमीन एकत्रित म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. नैसर्गिक बदलांची चाहुल ह्या बेडकांना लागली नसेल कशावरुन? कदाचित त्यामुळे हे बेडुक भविष्यात जिथे मुबलक पाणी असेल अशा ठिकाणी स्थलांतर करीत असतील. त्या बिचा-यांना काय माहीत रस्ता म्हणजे काय? ते पाण्याच्या दिशेने प्रवासास निघाले आणि माणसाच्य प्रगतीच्या वाटेने त्यांना रस्त्यावरच निष्ठुरपणे मारले.
प्रत्येक जीव निसर्गाची अप्रतिम अशी कलाकृती आहे. प्रत्येक जीवामध्ये वैश्विक चैतन्याच्या आविष्कार होत असतो. प्रत्येक जीव निसर्गातील महान अशा सामंजस्याचा (हार्मनी) एक महत्वाचा घटक आहे. असे असताना आपण, म्हणजे मनुष्याने, अशा निष्पाप बेडकांना विनाकारण का बरे मारावे? विकास प्रगती साधताना रस्ते बनणारच. पण आपण हे का विसरतोय की रस्त्यावर चालणा-या गाडीचे स्टीयरींग आपल्या हातात आहे. ब्रेक लावणे, मर्यादीत वेग ठेवणे आपल्या हातात आहे. आपण निसर्गातील आपल्या सहचरांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करुन देखील एखाद दुसरा प्राणी अनावधाने मारला जाणे आपण समजु शकतो. पण बेदरकार होऊन बेभान होऊन आपल्या सहचरांना चिरडणे म्हणजे माणुसकी नव्हे.

एरवी, अशी बेडक आपल्या गाडी खाली मरतात याची जाणीव देखील आम्हास नसते. असो. प्रगती होणार, रस्ते होणार, गाड्या धावणार, बेडुक आदी प्राणी रस्त्या ओलांडण्याचा प्रयत्न करणार. आपण त्यांच्या असण्याचा आदर करीत त्यांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्न करावा. आणि तरीही कुणी आपल्यामुळे कुणी गतप्राण झाले असेल तर किमान आपल्यातील अमानुषपणाची व या प्राण्यांच्या हकनाक मृत्युची जबाबदारी स्वीकारुन क्षणभर का होईना अंतर्मुख व्हावे व माणसातील निसर्ग जागा व्हावा..
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

Wednesday, September 27, 2017

पिरंगुट येथील जागृत शक्तिस्थान – तुळजाभवानी मातेचे मंदीर.


नवरात्र – जागर शक्तिचा  

शारदीय नवरात्र तसा आपणासर्वांसाठी नेमेची येणार इतर सणांसारखाच एक सण उत्सव आहे. घराघरातुन होणारी घटस्थापना, घटाची घराघरात दररोज सकाळी भराड्याने केलेली आरती, सार्वजनिक ठिकाणी मंडप, पताका लावुन , दांडीया आदी आपल्याला तसे नवीन नाही. काही गोष्टी नवीन आहेत जसे ट्राफीक ला अडथळा करुन नऊ दिवस निघणारी माळेची मिरवणुक, मंडपांमधुन सिनेमाच्या गाण्यांचा कर्णकर्कश्श आवाज, दांडीया गरबाच्या नावाखाली होणारा बीभत्सपणा… या सगळ्या बजबजपुरीमध्ये उत्सवाचे ऐतिहासिक आध्यात्मिक आणि पारंपारीक महत्व टिकवुन ते जनसामांन्यामध्ये रुजवण्याचे काम करताना कुणी दिसत नाही याची एक खंत नवरात्र सुरु झाल्यापासुन दरवर्षी जाणवते व आतल्याआत अस्वस्थ करीत असते. यावर्षी देखील असेच घडले आहे आजपर्यंत.
कालचा अनुभव मात्र खुपच वेगळा होता. काल सायंकाळी पिरंगुट येथील भवानी टेकडी वरील तुळजाभवानी मंदीरातील आरतीच्या वेळी मंदीरात उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले. भाग्य च म्हणावे लागेल याला कारण सणाउत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला आधुनिक कुरीतींना फाटा देत सार्वजनिक उत्सव कसे साजरे करावे याचे एक अतिशय छान उदाहरण पाहावयास मिळाले.  मंदीरामध्ये नवरात्रामध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरतीचा कार्यक्रम असतो व ही आरती अशा लोकांच्या हस्ते केली जाते की ज्यांनी समाजामध्ये सकारात्मक परीवर्तनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अनेकदा आपण पाहतो की दहीहंडी सारख्या उत्सवांमध्ये सिने अदाकारांना फक्त गर्दी खेचण्यासाठी आणले जाते. ५ ते १० मिनिटांचे लाख लाख रुपये समाजाच्या वर्गणीतुन गोळा केलेले पैसे असे अनाठायी उडवणारे संयोजकांच्या भाऊगर्दीमध्ये , तुळजाभवानी मंदीर विश्वस्तांनी रुढ केलेली प्रथा खरच सर्वांसाठी प्रेरणादायी, अनुकरणीय व आदर्शवत आहे, यात संदेह नाही.
काल महाआरतीसाठी आमंत्रित केलेले पाहुणेदेखील खरोखर समाजामध्ये सकाअरात्मक बदलांसाठी आयुष्य झिजवलेले असे दोन-तीन दिग्गज होते. त्यातील पहीले श्री मनोज जी वर्मा. हे श्रीमान, विश्व हिंदु परीषद, बजरंगदलाचे अखिल भारतीय संयोजक म्हणजे प्रमुख आहेत. तर दुसरे म्हणजे श्रीमंत दगडुशेठ गणेशोत्सव ट्रस्ट चे विद्यमान अध्यक्ष श्री अशोक गोडसे. तिसरे होते, वेदवेदांत गुरुकुलम चे संस्थापक आचार्य मंदार येनपुरे.  असा हा त्रिवेणी संगम कालच्या आरतीच्या वेळी झालेला. सेवा सुरक्षा आणि संस्कार हे ब्रीद असलेल्याअ बजरंग दलाचे मुळशी तालुक्यातील कामाची मुहुर्तमेढ देखील कालच रोवली गेली. दुर्गा मातेने सतत नऊ दिवस नऊ रात्री युध्द करीत असुरांचे निर्दालन केले त्यामुळेच स्त्री शक्तीच्या जागराचे प्रतीक म्हणुनच नवरात्र साजरी केली जाते. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी हातात शस्त्र धारण करणा-या आई दुर्गेच्या प्रेरणे ने तरुणांना राष्ट्र निर्माणासाठी देववंदने सोबतच राष्ट्रवंदनेचा संस्कार करणा-या बजरंग दलाचे कार्याचा आरंभ नवरात्रीच्याअ मुहुर्तावर व्हावा याअत नक्कीच दैवी संकेत आहे यात शंका नाही. मतांच्या राजकारणापायी आजपर्यंत झालेले मुस्लीम तुष्टीकरण, असमान नागरी कायदे यासारख्या अनेक गोष्टींनी आजपर्यंत भारतात मुस्लीम धर्मांधतेचा देखील असुरच केला आहे. तसेच ख्रिस्ती धर्मप्रसारक देखील प्रलोभन आणि दहशत यांच्या बळावर सर्रास मतपरीवर्तनाचे काम करीत आहेत. व दोघेही आसुरी शक्तींचे प्रतीक आहेत. भारताचा आत्मा म्हणजे सांप्रदायिक सौहार्द व सांप्रदायिक स्वातंत्र्य. या सांप्रदायिक सौहार्दाच्या मुळावरच घाव करणारे हे दोन राक्षस देखील आज ठेचण्याची गरज आहे. व या कार्याचा शुभारंभ बजरंग दलाच्या अखिल भारतीय प्रमुखांच्या आशीर्वादाने व्हावा ही म्हणजे दुधात साखरच आहे.
धर्मादाय क्षेत्रात कसे काम करावे याचा आदर्श घ्यावा तो श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्रस्ट कडुन. विविध समाजोपयोगी प्रकल्प आणि वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्तीमध्ये समाजासाठी धावुन जाणारी सर्वात तत्पर संस्था म्हणजे दगडुशेठ हलवाई ट्रस्ट. आता हा निव्वळ योगायोगच असावा असे नाही की जयतुळजा भवानी ट्रस्ट, पिरंगुट देखील अशाच प्रकारे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहे. आज म्हणजे दिनांक २७ रोजी म्हणजे नवरात्रीतील सप्तमी या दिवशी जय तुळजा भवानी ट्रस्ट व मायमुळशीडॉटकॉम चे संपादक, आतंरराष्ट्रीय क्रिडा पत्रकार , लेखक प्रा. संजय दुधाने यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी सेवा पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वर्षी हा पुरस्कार राष्ट्रीय सर्वांगिण ग्रामविकास संस्थेच्या पुनम मेहता यांचा देण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात निस्वार्थ भावनेने सर्वसामान्यांच्या हितासाठी सदोदीत झटणा-या कार्यकर्त्यांस हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. तसेच ट्रस्ट च्या वतीने सर्वज्ञ विकास प्रबोधिनीच्या अंतर्गत मुळशी तालुक्यातील तरुणांना पोलीस भरतीसाठी विनामुल्य मार्गदर्शन देखील केले जाते. मुळशी तालुक्यात आजपर्यंत असे अभिनव प्रयोग झाले नव्हते. जय भवानी ट्रस्ट ने ही प्रथा सुरु केली व यात खंड पडु दिला नाही. गेली दहा पेक्षा जास्त वर्षे अनेक प्रकारे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे काम ट्रस्ट करीत आहे. गावागावातील चौकाचौकातील अनेक गणेशोत्सव मंडळे, नवरात्री मंडळे यांनी अनुकरण करावे असे आदर्श उपक्रम जय तुळजा भवानी ट्रस्ट करीत आहेत. का नाही प्रत्येक गावागावात, त्या त्या गावामध्ये चांगले काम करणा-या गावच्याच व्यक्तिस पुरस्कार देण्यात यावा?  असो, तर या जयतुळजा भवानी ट्रस्टच्या विनंतीस मान देऊन अशोक गोडसे सारख्या दिग्गजाने इथे यावे म्हणजे पुन्हा दुधात साखर. श्री गोडसे कडुन जय तुळजा भवानी ट्रस्ट ला नक्कीच आणखी बरेच काही शिकावयास मिळाले असणार व गोडसेंनाअ देखील जय तुळजा भवानी ट्रस्ट चे काम पाहुन आनंद झाला असेल.
कालच्या आरती मध्ये उपस्थित असलेली तिसरे व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य मंदारजी येनपुरे. खरतर व्यक्तिमत्व वगैरे सारखे शब्द त्यांच्या साठी वापरले तर त्यांच्यातील साधेपणाचा अपमान होईल. संस्कृत प्रचुर, वेद वेदांताचे अधिकारी अभ्यासक, अध्यापक, साधक, मदांर स्वामींनी भारतीतील महान अशा आचार्यांकडुन वेदांताचे शिक्षण, गुरुगृही राहुन घेतले. चार भांड्यांचा संसार न करता अवघ्या संसाराची, चराचराची चिंता करण्याचा संकल्प करुन, जीवन भारतमातेच्या सर्वसाधारण कन्या पुत्रांस वेदांताचे धडे देण्याचे कार्यास आरंभ केला. मुळशी तालुक्यात, चिंचवड या त्यांच्याच गावी, स्वतच्याच शेतजमीनीमध्ये गुरुकुलाची मुहुर्तमेढ रोवुन , येतील त्यांच्यासह आणि न येतील त्यांच्या शिवाय हा अवलिया अनेक वर्षे झपाटल्या सारखा कार्यरत आहे. नित्याचा स्वतचा वेद वेदांताचा अभ्यास , लौकीक सुखांचा त्याग, एक प्रकारे सर्वसंग परीत्यागच. पण समाजासाठी असणा-या प्रेमापोटी समाजामध्ये येऊन समाजाच्या उत्थानाचे काम करणारे आचार्य मंदारजींच्या हस्ते देखील काल आरती झाली. एकुणच काय तर काल पिरंगुटच्या भवानी टेकडीवर धर्मरक्षण, सेवाभाव आणि अध्यात्म या क्षेत्रात काम करणा-या तीन दिग्गजांचा त्रिवेणी संगमच झाला होता.
महाआरती सुरु होण्यापुर्वीच मी मंदीरात पोहोचलो होतो. प्रमुख पाहुणे अद्याप पोहोचायचे होते. मंदीरात सुरेल भजनाचा कार्यक्रम सुरु होता. पंचक्रोशीतील अनक भजनकरी, वादक, गायक वारकरी पंरपरेमधील कर्णमधुर भक्तिरसाने ओतप्रोत अशा भजनांची मालिका सादर करीत होते. भक्त भाविक मोठ्या आस्थेने मंदीरात येत, भक्तिभावाने मातेचे दर्शन घेऊन सभामंडपाअमध्येच भजनाच्या सुरांमध्ये हरवुन जात. हळु हळु सभामंडप भक्त भाविकांच्या गर्दीने भरुन जाऊ लागला. गर्दी वाढत होती व गर्दी नियमनाचे काम, स्वयंसेवी वृत्तीने तालुक्यातीलच तरुण-तरुणी निस्वार्थ भावनेने करताना देखील दिसत होते. हे सर्व स्वयंसेवक पोलीस भरती प्रशिक्षणासाठी टेकडीवर नित्याने येणारे, मैदानी खेळ खेळणारे आणि पुस्तकी अभ्यास करणारे देखील होते. हे सर्व स्वयंसेवक अतिशय नम्रतेने व्यवस्था सर्व व्यवस्था पाहत होते.

आजच्या आरतीचे प्रमुख पाहुणे मनोज जी वर्मा मंदीरामध्ये, त्या पाठोपाठ अशोक जी गोडसे देखील पोहोचले लगेच. आचार्य मंदार जी येनपुरे आधीच भजनी मंडळींमध्ये बसुन भजन गाण्यात तल्लिन झाले होते. ज्ञानबा तुकारामच्या गजराने भजनाची सांगता झाली व सर्व जण बसल्या जागेवर उठुन उभे राहीले. आरती लाअ सुरुवात होणार होती.  आरती म्हणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांच्या हातात माईक होता ते सर्व ट्रस्ट चे कार्यकर्तेच होते. ज्ञानेश्वर पवळे, संदीप सातव, सचिन पवळे, पखवाज वादक येनपुरे (ढोल घेऊन), रामदास पवळे, संदीप पवळे(ताशा) आणि सर्वात आकर्षक वाद्य जर कोणते होते तर ते होते संबळ. एरवी आरती म्हणण्यासाठी नेहमीचे गाणारेच पुढे असतात. इथे तसे नव्हते. ट्रस्ट चे मुख्य कार्यकर्तेच हातात माईक, वाद्ये घेऊन आरती म्हणणार होते. एखाद्या मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष यांना नियोजन, व्यवस्था करण्यातुनच वेळ मिळत नाही तर आरती स्वत कसे म्हणतील. म्हणजेच काय तर देवीच्याअ ज्या मुख्य आराधनेसाठी , उपासने साठी हा सगळा अट्टाहास सुरु होता त्या मध्ये ट्रस्टचे मुख्य कार्यकर्ते सर्वांच्या पुढे होते. संबळ, घंटानाद, ताशाचा तर्रर्र ताल, ढोलाचा ठेका आणि डोळेबंद करुन कार्यकर्त्यांच्या सर्वांगातुन आरतीच्या रुपात बाहेर पडणारा आवाज सभामंडपाला अवकाशामध्ये उंच घेऊन जातो आहे की काय असा भास व्हायला लागला. हे सगळे आवाज एकत्र येऊन एक वेगळाच नादब्रम्ह जन्म घेत होता.व या नादब्रम्हामध्ये सर्व भाविक, गायक, वाद्य वाजवणारे, आरतीचे ताट हातात घेतलेले पाहुणे, स्वयंसेवक अगदी देहभान हरवुन गेले होते. हातात माईक घेऊन महाआरती गाणारे ट्रस्ट चे कार्यकर्ते आरती प्रत्येक शब्दाशी एकरुप झाले होते. देहभान हरवणे काय असते ते या आरती म्हणणा-या कार्यकर्त्यांना पाहील्यावर समजते. ह्या आरती मध्ये संगीताच्या भाषेतला सुर ताल फारसा नव्हता. पण महादेवीच्या रौद्र रुपाची उपासना करण्यासाठीचा रौद्रभाव नक्कीच होता. साक्षात शिव शंकर प्रकट होऊन तांडव करु लागतील असा वीर रस ह्या आरती मध्ये होता. जसे माईक हातात घेऊन आरती म्हणणारे देहभान हरवले होते तसेच सर्व भक्त भाविक देखील देहभान हरवुन गेले होते. इथे मी प्रकर्षाने अनुभव घेत होतो माझ्यातील समष्टीचा. मी समष्टी आहे असा अनुभव मला येतो होता. सर्वांची विभक्त भिन्न भिन्न मने एका सामुदायिक मनामध्ये विलीन झाली. एकत्वाचा हा अनुभव म्हणजे देवत्वाची अनुभुतीच आहे. व ही अवस्था अशीच राहावी असे वाटु लागले तर नवल ते काय, पण यथावकाश आरतीचे १०-१५ मिनिटे मंत्रमुग्ध होऊन सरले. संबळाचा ध्वनी थांबला, ताशाचा तांडव थांबला, घंटेचा नाद थांबला, माईक मधुन  आरती गाणा-यांचा सुर थांबला व शिल्लक राहीला तो फक्त भक्तिभाव. शिल्लक राहीली एकत्वाची अनुभुती.
एकंदरीत असा अनुभव मिळणे म्हणजे भाग्याचे आहे. काही मंदीरांमध्ये भक्तिभाव जागृत आपोआप होतो, जसे तुळजाभवानी चे तुळजापुरचे मंदीर, कानड्या विठ्ठलाचे पंढरपुर येथील मंदीर. पण तपश्चर्येच्या जोरावर, स्वच्छ चारीत्र्याच्या जोरावर , पारदर्शक कारभाराच्या जोरावर, पिरंगुट मधील तरुणांनी भवानी टेकडीवरील तुळजाभवानी मंदीर देखील एक जागृत देवस्थान बनविले असे म्हंटल्यास वावगे होणार नाही.
बजरंग दलाच्या तालुक्यातील कार्यास ह्या जागृत तुळजाभवानी मातेने आशीर्वाद दिलाय. बजरंग दलाचे तालुक्यातील धर्मरक्षण व संवर्धनाचे काम भवानी मातेच्या आशीर्वादाने यशस्वी होईल यात देखील शंका नाही.


श्री. हेमंत ववले,
भरे गाव

Sunday, September 24, 2017

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं ।

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥
तसा मी रोमॅंटीक वगैरे नाही, आणि नाही कधी वरील गाणे मन लावुन ऐकले किंवा पाहीले आहे. पण नभातुन वाहणारे मेघ जेव्हा माझ्या अंगावर आले तेव्हा ह्या गाण्याच्या ओळी उस्फुर्त पणे आठवल्या. काळ कितीही पुढारलेला असला तरी सार्वजनिक जीवनात प्रेमास्पद आणि प्रेमिका (पती पत्नी देखील) प्रेमभावनेची अभिव्यक्ति करणे जड जाते, हे आपल्या अंगवळणी नाहीये अजुन. हा सहज प्रेम भाव म्हणजे नुसत प्रेमीका आणि प्रेमास्पद यांच्यापुरताच मर्यादीत आहे का?
खरतर प्रेम या विषयावर लिहिण्याचा माझा अधिकार कितपत आहे हे ,मला ठाऊक नाही. तरीही निसर्गाच्या सदोदीत सानिध्याने , पुर्वी केलेल्या थोड्याफार वाचनाने आणि जगतानाच्या कडुगोड अनुभवाची शिदोरी संगतीला घेऊन, धाडसाने इथे या अगम्य विषयावर लिहिण्याचे धाडस करीत आहे.
१४०० वर्षे तपश्चर्या करणारा वटेश्वराचा सुत, चांगदेव अंहकाराने ग्रासला, व मीच श्रेष्ठ आहे हे सिध्द करण्याच्या लालसेने ज्ञानेश्वरांना आव्हान करता झाला. कथा सर्वांना माहीत आहेच. कथेच्या तपशीलामध्ये आपणास जाण्याची आवश्यकता नाही, माऊलींनी चांगदेवास उपदेशपर केलेल्या लिखाणात अद्वैत मताचे अतिशय सुलभ आणि बालबोध उदाहरणाद्वारे विवेचन केले आहे. त्या अभंगांमध्ये अद्वैत वेदांत ठासुन भरलेला आहे. प्रत्येक अभंग आपणास द्वैताच्या पल्याड नेण्यासाठी समर्थ आहे. वाचकांनी अवश्य अभ्यासावा असा हा श्लोक संग्रह आहे. त्यातील एक अर्धी ओवी इथे मुद्दाम मांडतो.
तेंवि तूंतें मी गिवसी तेथें तूंपण मीपणेंसी उखते पडे ग्रासीं भेटीचि उरे
उरीभेट, म्हणजे गळाभेट झाल्यास “मी”पण आणि “तु”पण ग्रासले जाऊन गळुन पडते थोड्याशा या आशयाची ही ओवी आहे. उभय म्हणजे दोन, म्हणजेच द्वैत. हे द्वैत जर गळुन पडत असेल तर आपण ही खुशाल समजावे की आपण माउंलीच्या उपदेशाचे पाईक आहोत.
प्रसंग असा होता की आम्ही पुन्हा एकदा सह्याद्रीच्या अप्रतिम अद्वीतीय अवर्णनीय अशा ठिकाणी नुकतेच पदभ्रमण करुन पोहोचणार होतो. तशी ट्रेकींग करताना पायाखालची वाट तुडवत आपण जात असतो. पण यावेळी असे नव्हते. पायाखालची वाट असंख्य अशा नाजुक, लोभस, सुंदर छोट्या छोट्या निसर्गाविष्काराने भरलेली होती. नुसती पायवाटच नाही तर, जिथवर नजर जात होती तिथवर नजाकत निसर्गाच्या प्रत्येक घटकामधुन ओथंबुन वाहात होती. लव लव कणारी गवताची पाती, कधी त्या गवताच्या पात्यांवर अलगद अडकुन पडलेला एकच पाण्याचा थेंब, कधी कधी त्याच गवताच्या पात्यांवर इवलीशी गोगलगायी चिकटुन आणखी उंची गाठण्याच्या यत्नात , कधी एखादा गांडुळ पायवाट मध्ये आडवा पडलेला दिसतो व सरपट तो पायवाटेच्या पलीकडे जाण्याचा प्रयतन करीत असताना दिसतो. कधी पायवाटेच्या बाजुच्या हिरवाईतुन एखादे फुल पायवाटेवर डोके वर काढुन , हसुन आमचे स्वागत करताना दिसते. बर फुल एक  न दोन , असंख्य प्रकारची असंख्य म्हणजे मिजता येणार नाही एवढी फुले, नव्हे नव्हे फुलांचे गालिचेच सर्वदुर पसरलेले. कधीही पाहीले नसतील असे छोटे छोटे बेडुक, मधमाश्या, सापसुरळ्या, सरडे आणि हे सगळे होत असताना, नभातील ढग तरी का नभातच राहतील. नभ देखील उतरले होते. क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे? नक्कीच नाही. अगदी हळुवारपणे आम्ही एक एक पाऊल आमच्या ध्येयाकडे टाकीत होतो. शेवटच्या वळणावर समोरचा दांड हळु लहान होत होता. एका क्षणी त्या दांडाच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारे एक डोंगराचे टोक दिसु लागले. प्रत्येक पावलागणिक त्या डोंगराची उंची देखील वाढु लागली. आम्ही त्या डोंगराच्या, नव्हे सुळक्याच्या दिशेने त्याच्या जवळ जवळ जात होतो. हा एक किल्ला आहे. लिंगाणा नाव आहे ह्या किल्ल्याचे. जसे जसे आम्ही लिंगाण्याच्या अलीकडच्या पठाराच्या कड्याकडे पोहोचत होतो तस तशी ही धुंदी आणखी वरच्या पातळीवर जात होती. क्षणात वा-याचे झोत येऊन समोरच्या तसेच डाव्या आणि उजव्या बाजुच्या द-यांचे ओघवते दर्शन घडत होते. आणि दुस-याच क्षणात तीच धुंदी पुन्हा सर्व चराचर व्यापुन टाकीत होती. समोर जे काही घडत होते ते सर्व नाट्यमय आणि प्रचंड उर्जा प्रदान करणारे होते. नभ उतरलेले होते, ते म्हणजे नभ आणि सभोवार चिंब ओले झालेले होते, आणि अंग झिम्माड झाले होते रायलिंगाच्या हिरव्या बहरात.
मी जे काही अनुभवत होतो ते स्वर्गीय होते, अलौकीक होते. आम्ही अंदाजे एक ते सव्वा तास रायलिंगावर घालवला. वा-याच्या झोतांसोबत मध्येच ढग नाहीशे होत आणि समोर, पश्चिमेकडे बा रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादाची गगनचुंबी शिखरे दिसत. अजुन उजवी कडे पाहिल्यावर सह्यगिरीची असंख्य शिखरे, आकाशात झेपावताना दिसत, त्यामध्ये प्रकर्षाने दिसले ते कोकणदिवा, रायलिंग माची. लिंगाणाच्या कधी डावीकडुन ढगांचे लोट येत तर कधी उजवीकडुन व अर्धा अधिक लिंगाणा, शिखर सोडुन, ढगात जाई. व लिंगाण्याचे शिखर म्हणजे टोक मात्र तसेच अधांतरी तंरगताना दिसे. हे दृश्य काही फार लांब नव्हते. एक दोन पावले पुढे जाऊन लिंगाण्या च्या टोकाला हात लागेल की काय इतका जवळ होता लिंगाणा आमच्या समोर.
कॅम्पसाईटवर माघारी वेळेत, अंधारण्यापुर्वी जाणे गरजेचे होते. आमच्यापैकी अनेकांना तर इथुन माघारी जाण्याची इच्छाच होईना, अगदी मला ही. कित्येकांनी मला परतीच्या प्रवासात विचारले की आपण रायलिंग पठारावरच टेंट लाऊन मुक्काम का करीत नाही. त्यांना समजावुन सांगावे लागले की, मुक्कामामुळे आपण निसर्गातील “त्या” सौहार्दामध्ये (धुंदी मध्ये) व्यत्यय निर्माण करण्याचा धोका जास्त आहे. मंडळींना हा विचार पटला देखील व आवडला देखील.
कॅम्पसाईटकडे परतताना, त्या धुंदीचा, नभाचा, झिमाड अंगाचा आणि हिरवाईचा  विचार डोक्यात डोक्यात आला. माझ्यासाठी माझ्या सोईने मी या सा-या विचारांना एका सुत्रात बाधण्याचा प्रयत्न करु लागलो.
हा हिरवा बहर खरच इतका मोहीत करतो की इथे आल्यावर माझे अंग झिम्माड होते म्हणजे माझे मीपण गळुन पडते. माझ्यातील देहबोध नाहीसा होत जातो. व मी एक आणखी उच्च अशा अनुभुतीच्या पातळीवर जातो जिथे द्वैत राहत नाही. माझ्यातील मी एका खुप मोठ्या प्रवासास निघतो. तो दृश्य अदृश्य अशा अनेक वस्तुंना स्वतमध्ये सामावुन घ्यायला सुरुवात करतो. माझ्यातील मी मोठा व्हायला सुरुवात झालेली असते. समोर दिसणा-याअ सर्व चल अचल चराचरास तो सामावुन घ्यायला सुरवात करतो. आधी मला अनुभुती होते की हे ह सभोवातीदिसणा-या निखळ सुंदर अशा निसर्गाच्या मधुन पावले टाकत टाकत चालणारा हा देह, हे शरीर म्हणजे मी आहे, नतर, ती लवलवणारी गवताची पाती म्हणजे “मी” आहे अशी अनुभुती होऊ लागते, नंतर ती पान, फुल, फुलपाखर, प्राणी, हवा पाणी, ढग, ढगांमधील तुषारविंदु, डोंगर, द-या, दगड हे सगळे एकसंध, एकजीव एकात्म असल्याची अनुभुती होते.
आणि हा एकात्मभाव जेव्हा अनुभवास येतो तेव्हा “मी” पण संपते. आणि मग ती धुंदी, एकतानता, सौहार्द अनुभवास येते. या अनुभुतीच्या उच्च पातळीवर मी नसतो. तिथे तु नसतो. तिथे “असणे” च नसते. आणि “नसणे” देखील नसते.  तिथे असते फक्त सौहार्द, सामंजस्य. हे सामंजस्य उस्फुर्त, निसर्गदत्त असते. ओढुन ताणुन आणलेले नसते. आणि जिथे असे सौहार्द असेल तिथे अपाय होईलच कसा? आणि म्हणुनच आमच्याकडुन पायाखालची वाट तुडवली गेली नाही. आम्ही स्वतच वाट झालो होतो. लिंगाण्याला मिठी मारुन आलेले ढंगामधील तुषार आमच्या रंध्रा रंध्रात अविरत आरपार जात होते, बाहेर येत होते. “मी” राहीलोच नाही. फक्त निसर्ग होता. फक्त निसर्ग.
तेंवि तूंतें मी गिवसी तेथें तूंपण मीपणेंसी उखते पडे ग्रासीं भेटीचि उरे
माऊलींनी यापेक्षा आणखी वेगळा उपदेश केलाय असे मला तरी वाटत नाहीये. दैनंदीन जीवनात ह्या एकात्मभावाचा अनुभव घेता येणे शक्य आहे का? दैनंदीन जीवनात अनुभुतीच्या अशा उच्च पातळीवर आपणास जाता येईल का? दररोज माझे ज्या व्यक्तिशी व्यवहार (बोलणे चालणे देणे घेणे)  होतात काय ती व्यक्ति निसर्गाचा घटक नाहीये का? मी देखील निसर्ग आहे व ती व्यक्तिदेखील निसर्ग आहे. आम्हा दोघांमधील दोघेपण लोप पावुन एकपण जर आले, तादात्म्य जर आले, सौहार्द जर आले तर कुणासही अपाय कसा होईल? प्रेमी(म्हणजे प्रेम करणारा किंवा करणारी) आणि प्रेमास्पद (ज्या व्यक्तिवर प्रेम करतो ती व्यक्ति) या दोघांमध्ये अभेद निर्माण होणे, एकात्म भाव निर्माण होणे म्हणजे खरी प्रेमाची फलशॄती होय. अध्यात्म यापेक्षा वेगळे ते काय आहे. लौकीकात ज्या प्रेम हा शब्द वापरला जातो, तो अर्थ जरी गृहीत धरला तरी आज प्रत्येक स्वतःच “मी” आपल्या प्रेमास्पदाच्या “तु” मध्ये विलीन करुन, स्वतःच “मी” मोठा करण्याची संधी आहे. व हा मी उत्तरोत्तर वृध्दींगत होऊन त्याने समष्टीमध्ये विलीन झाले पाहीजे, त्यानंतर सृष्टी , नंतर परमेष्टी मध्ये रुपांतरीत झाले पाहीजे. थोडक्यात काय तर प्रेम म्हणजे प्रेम असत वाल प्रेम ही अध्यात्माची पहीली व शेवटची पायरी आहे. व सगळा प्रवास होतो निसर्गामधुन. आपणास फक्त एकच भान ठेवायचे असते, ते म्हणजे पायाखालची वाट तुडवायची नाही. अलगद, हळुवार, मृदुल पावले टाकीत आपल्या सहचरांची काळजी घेत त्या गगनचुंबी ध्येयावरील नजर न हलवता  , धुंद होऊन मार्गक्रमण करीत राहायचे असते.
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

(टिप - आमच्या या स्वर्गीय सहलीची शब्दसफर आवडली असेल तर अवश्य फोटोसफर खालील लिंकवर क्लिक करुन करा. फोटोग्राफी – यशदीप माळवदे )

Saturday, September 2, 2017

जीडीपी आणि नोटबंदी



२०१७-१८ च्या दुस-या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.४ % इतका म्हणजे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा होता. तोच २०१६च्या दुस-या तिमाहीमध्ये हा दर ९.२ % इतका होता. २०१४ ला तो ८.३ % इतका होता. म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला हा दर कमी झाला व नंतर २०१६ पर्यंत तो ९.२ % इथवर पोहोचला. आणि अर्थ शास्त्रींच्या मते २०१७ च्या ४थ्या तिमाहीपर्यंत हा दर ७.१ % पर्यंत पोहोचेल. चालु तिमाहीमध्ये उत्पादन क्षेत्र, खाणकाम आणि बाम्धकाम क्षेत्रामध्ये मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत जास्त घट झाली आहे. त्याच वेळी आर्थिक सेवा, संरक्षण, दुरसंचार, हॉटेलींग, वाहतुक, व्यापार आदी क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता नोटबंदीमुळे उत्पादन क्षेत्रात वाढ कमी झाली असे मानायचे का? बांधकाम क्षेत्राचे एकवेळ मान्य करता येईल कारण ते क्षेत्र त्या मानाने खुपच असंघटीत व व्यवस्थेला बगल देणारे आहे. त्यामुळे नोटबंदीचा फटका बांधकाम क्षेत्रास झाला हे एकवेळ मान्य करावे लागेल. राहीला प्रश्न खनिज खाणकाम. भारतील बहुतांश खनिजे खाणी सरकारी लिलाव पध्दतीने खाणकामासाठी विकल्या जातात. यातुन मिळणारे खनिज मुख्यत्वे करुन भारतातीलच उत्पादन क्षेत्रासाठी व थोड्या प्रमाणात निर्यात केले जाते. उत्पादन क्षेत्रातच मंदी असल्याने स्वाभाविकच खनिज उत्पादनावर त्याचा परीणाम होणारच. आता आपण उत्पादन क्षेत्रात मंदीचे कारण नोटबंदी असु शकते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करु. 2013 मध्ये हाच दर ४.१ % इतक्या नीचांकी पातळीवर गेला होता व पुन्हा २०१६ मध्ये ९.२% इतक्या उंचीवर जाऊन आला. सोबतदिलेला चार्ट पाहिल्यावर आपणास हे नक्की समजेल की जीडीपी मध्ये चढ उतार हा मागणी आणि पुरवठा या साध्या तत्वावर अवलंबुन आहे. उत्पादन क्षेत्रातील घटता दर नोटबंदीमुळे झालेला नाही हे समजण्यासाठी काही मुद्दे पाहु यात.

१. उत्पादन क्षेत्रात कोणताही कच्चा माल रोखीने घेतला जात नाही
२. उत्पादन क्षेत्रात कोणत्याही कामगाराचे वेतन रोखीने दिले जात नाही
३. उत्पादन क्षेत्रात पंजीकृत कंपन्याचे उत्पादन आणि विक्री ही देखील मुळात कागदोपत्री होणार अशी अपेक्षा आसते, त्यानुसार कंपनीचे व्यवहार पध्दती रुढ झालेली असते. त्यामुळे नोटा नाहीत म्हणुन उत्पादन रखडले जाणे हे शक्यच नाही.
४. आपल्या भागात अनेक छोटे मोठे कारखाने आहेत. त्या कारखान्यांमध्ये आपल्या भागातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक काही ना काही सेवा पुरवतात. जसे गाडी भाड्याने देणे, जेवण डबे, चहा, सब वेंडर, इत्यादी सर्व खर्च ह्या कंपन्या बॅकेतुनच करायच्या. सेवा पुअरवणा-यांना चेक ने पैसे चुकते केले जायचे(अजुन ही तसेच होत आहे)

एवढे सगळे व्यवहार जर नोटाशिवाय वर्षानुवर्षे सुरु आहेत तर नोटबंदीमुळे जीडीपी दर कमी झाला असे म्हणणे म्हणजे दुधखुळे पणा आणि नुसता आकस आहे यात शंका नाही.
नोटबंदीमुळे सामान्य नागरीकांस त्रास झाला यात शंकाच नाही. पण मुळात सामान्य माणसाकडे खुप मोठ्या प्रमाणात काळा पैसा (कर चुकवुन कमावलेला किंवा साठवलेला पैसा, म्हणजे रोखीने केलेले व कर चुकविलेले व्यवहार) इतका जास्त नव्हता की त्यास अगदी दररोजच रांगेत जावे लागले. जे काही थोडे फार पैसे सामान्य माणसाकडे होते ते बॅंकेत जमा करण्यासाठी एक किंवा दोन वेळाच जावे लागणे अपेक्षित होते. त्यापेक्षा जास्त वेळा बॅम्केत जावे लागले असेल, व अस्वस्थता शिगेला पोहोचली असेल तर काळा पैसा पांढरा करायचा कसा ? या एकाच चिंतेने असामान्यांचे हाल झाले. कर नाही तर डर कशाला, याप्रमाणे सामान्य जनतेने आनंदाने होणारा त्रास सहन केला. आधीच्या एका पोस्ट मधील ते श्रीमान क्ष़. होते की ज्यांना खुपच त्रास झाला. तरीही त्रास झाला हे नाकारता येत नाही. पण हा त्रास झाला म्हणुन नोटबंदीच चुकीची होती असे मानने सर्वथा अयोग्य आहे. काही लोकांचा रांगामध्ये मृत्यु देखील झाला. दुर्दैव. पण खरच नोटबंदीमुळे लोक मृत्युमुखी पडले का? तुमच्या माझ्या सारखा धडधाकट माणुस नाही मरण पावला. जे जर्जर झाले होते किंवा व्याधी होत्या , अती रक्तदाब किंवा हृद्यरोग आदी असणारेच मृत्युमुखी पडले. यात नोटबंदीचा दोष कसा काय? रांगा आम्हाला माहीत नव्व्हत्या का? , वीज बिल भरण्यासाठी रांग, फोन बिल भरण्यासाठी रांग, घरगुती गॅस टाकी मिळवण्यासाठी ४-५ तासाची रांग, राशन साठी रांग, रेल्वे तिकीटासाठी रांग, दाखले काढण्यासाठी रांग, दगडुशेठ, पंढरपुर, आळंंदी मध्ये दर्शनासाठी रांग, चितळ्यांकडे रांग, दारुच्या दुकानांमध्ये रांग, ॲडमिशन साठी रांग, रांग काय नवीन आहे आपल्याला? आणि रांगेत अपघात देखील होऊ शकतात. पण विरोधी पक्षातील लोकांनी या रांगेचा बागुलबुआ केला नोटबंदीच्या काळात. व , राई का पहाड केला. वरील पैकी ब-याच रांगा नोटबंदीच्या अनुषंगाने आलेल्या डीजीटल क्रांतीने कमी केल्या आहेत. व गॅससठीच्या रांगा नोटबंदीच्या आधीच्या जनधन व आधार जोडणी मुळे संपल्या आहेत.
सामान्य जनतेला त्रास झाला हे खरे असले तरी हा त्रास जनतेने आनंदाने स्वीकारला. दुख झाले ते त्यांनाच ज्यांच्या कडे काळा पैसा होता व तो रद्द बातल होण्याची त्यांना भिती होती.
आता मुळ मुद्द्याकडे वळु नोटबंदी यशस्वी झाली की नाही हा या लेखाचा विषय नाही. नोटबंदीचा 'क्ष' रीपोर्ट मध्ये नोटबंदी ची फलस्रुती वाचता येईल. याअ लेखाचा विषय आहे जीडीपी आणि नोटबंदीचा परीणाम. वर सविस्तर लिहिल्याप्रमाणे , नोटबंदीचा उत्पादन क्षेत्रावर अजिबात परीणाम झालेला नाही. मागणी आणि पुरवठा या साध्या तत्वावर उत्पादन क्षेत्र कार्य करते त्यानुसार उत्पादन दर वर खाली जाणे स्वाभाविक आहे. किंवा आणखी ही इतर घटक आहेत जे उत्पादन क्षेत्रावर प्रभाव टाकु शकतात. जसे प्रशासकीय सपोर्ट. निर्यात क्षमता वाढवण्यासाठीची धोरणे, गुणवत्ता धोरणे अमलबजावणी, इत्यादी. यातील कदाचित धोरणांच्या बाबतील सरकार ला दोष देता येऊ शकेल कारण ७० वर्षाची रुढ पध्दती त्यांनी ३ वर्षात बदलली नाही. असो हा वेगळा विषय आहे.
त्यामुळे जीडीपी दर घटणे आणि नोटबंदी यांचा दुर दुर पर्यंत संबंध नाही हे नक्की समजावे.

Monday, July 31, 2017

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती



माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते.
सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा. पायथ्याची गावे, गावागावातील विविध इतिहास, कथा, दंतकथा काही ज्ञात तर काही अज्ञात. आपणास एकच हिरकणी माहीत आहे. पण अशा अनेक हिरकण्या ह्या सह्याद्रीने पाहील्या असतील. अनेक बहादुर मर्द मावळे गावागावात, वस्त्यावस्त्यांमध्ये असतील.
सदोदीत उन वारा पाऊस यांचा मारा अंगावर झेलत सह्याद्री एखाद्या तपस्व्याप्रमाणे अढळपणे उभा आहे. तो अविचल आहे. तो निर्विकार आहे. कसल्याही बाह्य व्यवधानांचा परीणाम त्याच्या तपश्चर्येवर होत नाही.  म्हणुनच की काय सह्याद्रीची विरक्ती त्याच्या विविध  बौध्द लेण्यांतुन कोरली गेली आहे.

असंख्य प्राणीमात्रांस अभय देणा-या सह्याद्रीची एकात्मता त्याच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या जैवविविधतेमध्ये आहे. सह्याद्रीचा रुद्रावतार त्याच्या काळ्याकभिन्न कातळकड्यांमध्ये आहे.
सह्याद्रीचे मातृत्व त्याच्या कड्या कपा-यांतुन उगम घेणा-या शेकडो नद्यांमध्ये आहे, ज्या पुढे जाऊन फक्त जलवाहीन्या न राहता जीवनवाहीन्या बनतात. किमान हजारेक नद्यांचा उगम सह्य रांगामध्ये होतो. काही पुर्व वाहीन्या तर काही पश्चिम वाहीन्या आहेत. शहरांना पिण्यासाठी पाणी, पाणी साठे, जलविद्युत प्रकल्प, शेतीसाठी धरणे, बंधारे, कालवे हे सर्व सह्याद्रीच्याच जीवावर आहे.
सह्याद्रीचे पितृत्व त्याच्या अंगाखांद्यावर हजारो लाखो वर्षे आनंदाने खेळणा-या बागडणा-या असंख्य प्राणीमात्रांच्या पालनपोषणामध्ये आहे. मागे एका लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्रीमध्ये आढळणा-या एका बेडकाची जात साडे आठशे लाख वर्षापुर्वीची मानली जाते. व ही जात फक्त सह्याद्रीमध्येच आहे. आणि हा पुरातन काळ म्हणजे या पृथ्वीतलावर मानव नावाच्या प्राण्याची उत्पत्ती होण्याआधीचा काळ आहे. संशोधकांचा कयास जर प्रमाण मानला तर, आपणास माहीत असलेल्या या ज्ञात जीवास सह्याद्रीने कित्येक लाखो वर्षे सांभाळले आहे हे स्पष्ट दिसते.
ह्यासोबतच सह्याद्रीच्या कुशीत भारतीय संस्कृतीची छाप अगदी डोंगर द-यात असणा-या वाड्या-पाड्यावर देखील पहावयास मिळते. आपल्याकडे एक म्हण आहे, की भाषा दर पाच मैलांवर बदलते. भाषा बदल म्हणजे सांस्कृतिक वेगवेगळेपण हे नक्कीच. असे हे वेगळेपण आपणास बारा मावळांत पहावयास मिळते. ही बारा ही मावळे सह्याद्रीच्या कुशीतच आहेत. हे वेगळेपण विशिष्ट प्रसंगी पहावयास मिळते. एक उदाहरण सांगतो इथे. आमचे कडे एखाद्या व्यक्तिच्या और्ध्वदैहीक आचारांमध्ये एका दगडास( खडा ) विशेष स्थान आहे. याला जीवखडा असे म्हणतात. आता जीवखडा नावाची संकल्पना बाराच्या बारा मावळांत म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री मध्ये वसलेल्या डोंगरद-यात राहणा-या लोकांत आहे. पण त्यात थोडे थोडे भेद आहेत. जसे काही ठिकाणी हा खडा मरणोपरांत दहा दिवस घराच्या बाहेर टांगुन ठेवतात तर काही ठिकाणी तेरा दिवस. काही ठिकाणी हा खडा घराच्या आढ्याला आतुन टांगतात तर काही ठिकाणी हा खडा भिंतीला असेलेल्या खुंटीला टांगतात. तर सांगायचा मुद्दा असा की वेगळेपण असले तरी जीवखडा संकल्पना मात्र सगळीकडे दिसते. कुणी शिकवले असेल बरे ह्या मावळ भागातल्या म्हणजेच डोंगरद-यात वाड्यावस्त्यांमध्ये लोकांस हे कर्मकांड? हे कर्मकांड योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. पण हे एकसुत्रता सर्वत्र दिसुन येते. नुसतीच सह्याद्रीमध्येच आहे असे नाही तर संपुर्ण भारतात ही सांस्कृतिक एकसुत्रता दिसते आपणास.
विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीनही संकल्पना तशा एकाच मुल तत्वावर आधारीत आहेत. व ते मुल तत्व म्हणजे निसर्गनियम होय. वेगवेगळ्या संदर्भात ह्या संकल्पनांची उकल करता येईल. दोन तीन वर्षापुर्वी आमच्या घरच्या झाडाचे आंबे उतरवायचे काम सुरु होते. मी झाडावर चढलो होतो व टिपुन एकेक आंबा काढत होतो. झाडाच्या एका फांदीला आता शंभरेक आंबे शिल्लक होते. इतक्यात आई म्हणाली आता बास झाले. राहीलेले आंबे झाडाला तसेच राहुदे. मी का असे न विचारताच झाडावरुन खाली उतरलो. व आंबे पिकवण्याची आढी लावुन झाल्यावर आईला विचारले झाडाला आंबे ठेवायला का सांगितलेस तु मला? त्यावर आई म्हणाली की आपण सगळेच्या सगळे आंबे काढायचे नसतात.झाडावर येणा-या पक्षांना प्रसंगी प्राण्यांना खाण्यासाठी हे आंबे असेच ठेवायची पध्दत पुर्वापार असेल खेड्यापाड्यात. यात संस्कृती पाहायला मिळते. सर्वच्या सर्व आंबे काढणे व ते खाणे किंवा विकणे ही विकृती आहे. व जेवढी भुक आहे तेवढेच आंबे काढुन खाणे ही प्रकृती आहे. पण या एका प्रसंगात संस्कृतीची खुण दिसते. ही संस्कृती देखील सह्याद्रीचे अंगभुत वैशिष्ट्य आहे. एखादा समाज किती सुसंस्स्कृत आहे हे पाहण्यासाठी त्या समाजात कोणत्या चालीरीती आहेत, कोणत्या कला कौशल्यांना त्या समाजात स्थान आहे , समाजात  कोणते छंद जोपासले जातात , त्या त्या समाजात संगीत, लेखण वाचन आदी विषयी कितपत ज्ञान आहे , या सर्वांवर त्या त्या समाजाचा सुसंस्कृतपणा किती उच्च दर्जाचा आहे हे समजते. भुमीस माता म्हणणारा आपला हा मावळातला समाज सांस्कृतिक दृष्ट्या अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या विविध चालीरीतींच्या मागे एक विज्ञान आहे. मी दहावी मध्ये असताना माझे इंग्रजीचे शिक्षक श्री गुलाबराव सपकाळ सरांनी मला एक अप्रतिम पुस्तक वाचण्यासाठी दिले. प्रा. सौ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव ही भारी्च आहे. “आपले वृक्ष आपली संस्कृती”. यात आपल्या विविध सणवारांमध्ये चालीरीती प्रथांमध्ये वापरल्या जाणा-या विविध वृक्ष वेलींचे सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक महत्व त्यांनी सण व वृक्ष वार सविस्तर लिहिले आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीला वैज्ञानिक आधार आहे व तो अगदी दुरदुर्गम अशा डोंगरद-यात राहणा-या आमच्या सह्याद्रीवासीयांना माहीत देखील होता. कोणत्याही संस्कृतीचे आणखी एक महत्वाचे अंग असते. ते म्हणजे सहजीवन. आधुनिक पाश्चात्य लेखक स्टीफन कॉव्हे याने त्याच्या एका सुपसिध्द पुस्तकात Interdependence is higher value than Independence असे तत्व मांडुन त्या तत्वास कॉर्पोरेट जीवनात यशाची गुरुकिल्ली असे म्हंटले. जाती पाती आणि उच्चनीच असा ओंगळवाणा वाटणारा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर म्हंटलेल्या परस्परालंबित्वाचे एक विकृत रुप आहे. जात हा शब्दास कारकुनी महत्व येण्याआधी आपल्याकडे बलुतेदार नावाची व्यवस्था कित्येक हजारोवर्षे वृध्दींगत होत गेली. त्याचे एक उदाहरण मला अगदी दोन तीन वर्षापुर्वी मोसे मावळ खो-यात फिरताना दिसले. बलुतेदारी संपली. पण काही ठिकाणी ती अजुन आहे. मी एकदा, पानशेत वरसगाव हुन मोटारीतुन मुठा खो-याकडे येत होतो. तसा हा भाग ही दुर्गमच. अजुन ही तासनतास ह्या रस्त्यावर एखाददुस-या वाहनापेक्षा जास्त काही दिसत नाही. तर या प्रवासात, कोंढुर गावाजवळ, एक व्यक्तिने माझ्या गाडीला हात केला व लिफ्ट मागीतली. उंचीने साडेचार ते पाच फुट उंच थोडासा जाड, गव्हाळ, पायजमा आणि टोपी घातलेला हा माणुस या गावातीलच असणार असे मला वाटले व माझा तर्क बरोबर निघाला. गाडीत बसल्यावर त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यात त्यांच्या मुलांचे इंजिनियरींग वगेरे शिक्षणाविषयी समजले. ते कुटुंब सध्या पुणे शहरात राहते. मी त्यांना विचारले की इतक्या उशीरा कसे काय निघालात पुण्याकडे तर ते म्हणाले की ते ज्ञाती ने न्हावी आहेत व गावात जोंधळे घ्यायला आले होते. दर शनिवारी व रविवारी ते गावी येतात व गावातील लोकांची दाढी डोकी (हजामत) करतात. त्यांच्याकडे स्वतची शेती नाही. पण ह्या बलुतेदारीतुन त्यांना त्या वर्षी २८ अठ्ठावीस पोती भात, तेवढीच ज्वारी मिळाले. व त्यांच्या जन्मापासुन त्यांना व त्यापुर्वी त्यांच्या वाड वडीलांना देखील ही बलुतेदारी होती. पुर्वी त्यातीलच काही विकुण मसाले,तेल, कपडे आदी विकत घेत. म्हणजे गावातील गावकी मध्ये प्रत्येक घटकास सामावुन घेण्याची क्षमता होती व त्या प्रत्येक घटकाच्या पालनपोषणाची जबाबदारी समाज घेत होता. असेच पुर्वी इतर बलुतेदारांचे ही असायचे. व संस्कृतीच्या ह्या खाणा खुणा सह्याद्रीच्या कानाकोप-यात आज ही पहावयास मिळतील.
अंदाजे सहा सात वर्षापुर्वी मी हिरडस मावळात काही कामानिमित्त गेलो होतो. तिथे मला आश्चर्य चकीत करणारा असा सह्याद्रीच्या प्रगल्भ व अतीश्रीमंत संस्कृतीचा पुरावाच मिळाला. तिथे एक गोपाळ भेटला. गोपाळ हे त्याचे नाव नव्हते तर त्याच्या कामावरुन त्याला व त्याच्या सारख्या अनेकांना पडलेले नाव होते. हा गोपाळ गायीं पाळणाराच होता. व त्याही पुढे जाऊन गोपाळकृष्णासारखा एक पावा म्हणजे बासरी देखील घेऊन डोंगरावर गायींना चारत होता. वीसएक गायी, काही बैल, वासरे, गो-हे असा पन्नास एक जनावरांचा कळप त्याच्या मागेपुढे चरत फिरत होता. त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी होती . अंगावर साधी मळकी कपडे होती. व आणखी एक विशेष घोंगडी की जिला जागोजाग घुंगरांनी सजवले होते अशी घेउन स्वतला पाउस व थंडीपासुन वाचवुन गायींना चारत होता. त्याच्या पाव्याला देखील घुंगरं लावली होती. त्याचे नाव गाव विचारले नाही. पण त्याच्याकडुन हे समजले की मावळात अशा प्रकारचे गोपाळ गावोगाव असत. यावरुन सह्याद्रीच्या कुशीतील एकेकाळच्या श्रीमंत संस्कृतीचे पुसटशे दर्शनच आम्हाला घडले. निसर्गात गायींना चारण्यासाठी घेऊन जाणे व बासरी वाजवणे, संगीत साधना करणे, निसर्ग व स्वतच्या गायी यांच्याशी एकात्मभाव स्थापित करणे हा तर हेतु नसेल ह्या गोपाळांचा?
लेखाच्या शेवटी दिलेल्या पेजवर जाऊन या गोपाळाचा पावा वाजवतानाचा व्हिडीयो अवश्य पहा.

Friday, July 14, 2017

धर्म म्हणजे काय?

(मूळ: धरणे किंवा बंधून राहणे, सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे): सामाजिक रित्या संघटित मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व वितर्कीय कल्पनांचा संग्रह जोपर्यंत त्याचा निसर्गातअस्तित्वात असलेल्या गोष्टींशी (उदा. व्यक्ती, वस्तू, विश्वे, इत्यादि) निगडित असण्याचा दावा असतो. –


महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी तो धर्म. '
धर्म ही एकच संकल्पना अशी आहे की जिने आजपावेतो जगात सुख व शांतता व समाधान, करोडो लोकांस दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म म्हणजे काय हे जाणुन घ्यायचे असेल तर आधी या शब्दाच्या उगमाकडे जावे लागेल. आपण धर्म म्हणजे काय हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्वात आधी एक मिथक आपण तोडले पाहीजे , ते म्हणजे, धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्य भाषेत समानार्थी शब्द नाही. धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा आंल्ग शब्द basic instict हा आहे.तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णु शकत नाही. त्यामुळे पुढे वाचण्यापुर्वी हे पक्के लक्षात असुद्या की धर्म या शब्दाविषयी जाणुन घेताना भारतीय दृष्टीकोनातुनच पाहीले पाहीजे. दुसरे एक मिथक आपण समुळ नष्ट केले पाहीजे. ते म्हणजे धर्म म्हणजे रीलीजन. रीलीजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. रीलीजन हा शब्द कोणत्या भारतीय शब्दाचा समानार्थी शब्द आहे हा ह्या लेखाचा विषय नाही. असो, तर मग आपण दोन गोष्टी नीट समजुण घेतल्या असतील तर धर्म म्हणाजे काय याकडे आपणास पाहता येईल व्व समजुन घेता येईल. तर पुन्हा एकदा ह्या दोन खुळचट समजुती आपण पाहु...खूळचट समजुत १.- रीलीजन म्हणजे धर्म ....खुळचट समजुत २.- सर्व धर्म समान असतात (ही एक खुळचट समजुत आहे असे म्हणण्याचे कारण असे की अधिकांश लोकांना धर्म म्हणजे हे माहीत नसताना ते धर्म या विषयावर काथ्याकुट करण्यात अग्रेसर असतात)
आता धर्म म्हणजे काय याकडे पाहु.
वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. ज्या विशिष्ट गुण विशेषा मुळे एखाद्या वस्तु, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झालेले असते त्या गुण विशेषास धर्म असे म्हणता येईल. याचे कारण धृ म्हणजे धारण करणे या संस्कृत धातुचा आधार जरी घेतला वस्तु, जीवाने धारण केलेल्या गुणविशेषास धर्म म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मुळ अर्थ काय आहे? व हा अर्थ सहज समजेल अशा बोली भाषेत सांगता येईल का? तर याचे उत्तर आहे, हो! सहज सोप्या भाषेत या शब्दाचा अर्थ सांगता येईल व समजुन देखील घेता येईल. तर काय आहे हा अर्थ?
सह्ज समजेल अशा भाषेत सांगायचे तर धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती. धर्म म्हणजे उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभुत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभुत गुणविशेष हे बाहेरुन आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. याची काही उदाहरणे पाहील्यावर आपणास याचा नेमका अर्थ काय आहे हे समजेल.
उदा १ - वस्तु - पाणी व या वस्तुचा अंगभुत गुण - शीतलता
उदा २- वस्तु - हवा व या वस्तुचा अंगभुत गुण - चंचलता
उदा ३ - वस्तु - अग्नि व या वस्तुचा अंगभुत गुण - दाहकता
उदा ४ - वस्तु- पाषाण - व या वस्तुचा अंगभुत गुण - जडता
वरील उदाहरणे निर्जीव एककांची आहेत. आता सजीवांची काही उदाहरणे पाहुयात
उदा १ - वाघ - भुक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासुन संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे.(भुक भागवण्यासाठी , अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)
उदा २ - वाघ - जीवाच्या आकांताची, कितीही भुक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजलेजरी असेल तरीही वाघ गवत खात नाही.(अखाद्य न खाणे)
उदा ३ - गाय वासरु - वात्सल्य
उदा ४ - गरुड - विहंगम करणे
उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे
वरील काही उदाहरणे प्राण्यांची पाहीली , आता आपण मनुष्याशी निगडीत काही उदाहरणे पाहुयात
उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारीके मध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थे मध्ये असतो. पण एकदा का ती कुमारीका प्रसुता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरीक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. पण जोपर्यंत ममत्वाचा आविर्भाव होत नाही तोपर्यंत त्या कुमारीकेस ममत्व म्हणजे काय हे कितीही निबंध लिहुन कुणी समजावु जाईल तरीही तिला समजणास नाही. ममत्व , मातृत्व ही स्त्री मधील उपजत सहज अंगभुत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याची उस्फुर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय.
उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, वडील झाल्यावर(म्हणजे त्याला अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागलेली असते, त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतच्या दिनचर्या तसेच सामाजिक चरीत्रामध्ये एक विशिष्ट बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मुलभुत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी उस्फुर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास जो कर्तव्यबोध होत असतो त्यास पितृ धर्म असे म्हणतात.
उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म
उदा ४- मित्र - मित्र-धर्म
उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म
वरील उदाहरणे मनुष्याशी निगडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्माचे आचरण करु शकतो. तो मनुष्य कोणत्या भुमिके मध्ये आहे यावर अबलंबुन आहे तो त्या प्रसंगी कोणत्या धर्माचे पालन करील. उदाहरण दाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवी घेऊ. एक शासक म्हणुन तिला राजधर्म पाळायचा होता व भल्लाल ची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडुन राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते? तर राजधर्माचे नीट पालन. कोणत्या ही पुर्वग्रहाशिवाय तिने बाहुबली व त्याची पत्नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी, एक शासक या नात्याने द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरुन आहे ते करणे म्हणजे त्या त्या परीस्थीतील धर्म होय.
वरील सर्व विवेचनावरुन किमान एक संभ्रम्म तरी दुर व्हावा. की धर्म म्हणजे रीलीजन नाही. धर्म व रीलीजन, अगदीच काय तर सांप्रदाय यांचा दुर दुर पर्यंत संबध नाहीये. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभुत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदीत सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.

Monday, July 10, 2017

नाच्या बेडुक


नाच्या बेडका विषयी दोन तीन वर्षापुर्वी वाचले होते. परवा आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट परीसरात हा बेडुक प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. यशदिप आणि जेवण आटोपुन पसायदाना विषयी एक ऑडीयो ऐकत झोप येण्याची वाट बघत होते. कॅम्पिगला आलेले लोक देखील कॅम्पफायर भोवती गराडा करुन गप्पा टप्पा मध्ये मग्न होते. आमच्या किचन शेड वर नळीचा पत्रा आहे. अचानकच पावसाची एखादी सर यायची आणि आमच्या डोक्यावर (पत्र्यावर) ताशा वाजवुन जायची. असा हा ताशाचा आवाज थोडा कमी झाला की मग मात्र एक विशिष्ट आवाज दुरवरुन कानावर येत होता. चालबध्द, लयबध्द उच्च स्वरात म्हणजे अगदी खर्जातला वाटावा असा हा आवाज लक्ष वेधुन घेत होता. सोबतीलाच अनेक वेगवेगळे आवाज येत होते. पण त्यात एकतानता होती. साद होती, तर प्रतिसाद देखील होती. आम्ही दोघांनी या आवाजांच्या दिशेने जायचे ठरवले व फोन आणि टॉर्च घेऊन त्या आवाजाच्या दिशेने निघालो. आमचा शोध कॅम्पसाईट शेजारच्या भाताच्य खाचरात संपला. त्या खाचरात शेकडो बेडुन होते. वेगवेगळ्या जातींचे. (प्रजातींचे योग्य शब्द आहे.) त्यातल्या त्यात ज्या आवाजाचा पाठलाग करत आम्ही आलो तो आवाज व त्या आवाजाचा उदगाता तो बेडुक देखील दिसला. याला नाच्या बेडुक म्हणतात. सोबत दिलेल्या वेबसाईटच्या पेज वर जाऊन त्याचा व्हिडीयो पाहता येईल. नाच्या बेडुक हे त्याच्या द डान्सींग फ्रॉग या इंग्रजी नावाचे स्वैर भाषांतर आहे. अंदाजे दोन तीन वर्षापुर्वीच शास्त्रज्ञांना अशा प्रजातीचा बेडुक असतो हे समजले. त्याच्या विशिष्ट प्रकारे पाय हलवण्याच्या व आपटण्याच्या सवयी मुळे त्या प्रजातीस सर्रास डान्सींग फ्रॉग असे बोली भाषेतले नाव पडले. तर हा नाच्या बेडुक दिसला आणि त्याचे ते खर्जातले गाणे गाताना त्याचे आविर्भाव व त्याचा नाच देखील दिसला. सोबतच्या लिंकवर क्लिक करुन अवश्य हा व्हिडीयो पहावा.


त्यानंतर ह्या बेडकाविषयी जरा अधिक माहीती शोधण्याचा प्रयत्न केला व आणखी एक अचंबित करणारी माहीती पुढे आली. बेडकाची ही विशिष्ट जात ८५० लक्ष वर्षापुर्वी अस्तित्वात आली असा अभ्यासकांचा दावा आहे. म्हणजे माणुस नावाचा प्राणी अस्तित्वात येण्याच्या कित्येक लाखो वर्षे आधी ही बेडकाची प्रजात अस्तित्वात आली.  प्रियराधनासाठी हा बेडुक पायाच्या हालचाली करतो असे अभ्यासकांना सुरुवातीस वाटले. नतर च्या अभ्यासातुन हे समजले की समागमासाठी तो नाचत नाही तर, मादीपासुन इतर अन्य नर बेडकांना हाकलुन लावण्यासाठी हा पायाचा उपयोग करतो. अगदी पैलवानाने षडडु ठोकावा तसा काहीसा प्रकार आहे. षड्डु ठोकुन ही प्रतिस्पर्धी नर ऐकत नसेल तर मग लत्ताप्रहार (म्हणजे लाथ मारणे) हा प्रयोग करावा लागतो. समागमानंतर, हा बेडुक नर आणि मादी दोघे ही पुन्हा भुमिगत होतात. व पुन्हा पुढच्या वर्षी फक्त दोन आठवड्यांसाठी जमीनीच्या पृष्टभागाच्या वर येतात. म्हणजे जवळजवळ १२ ही महीने हे झोपतात. यांचे जीवनमान किमान ८ ते १६ वर्षांचे असु शकते.

सध्याची स्थिती अशी आहे की, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ह्या जातीचे तसेच बेडकाच्या अन्य ही अनेक जातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मला ज्ञात असलेला एकच देव आहे. तो म्हणजे निसर्ग. ह्या देवाची लिला अपरंपार आहे. किती विविधता आहे पहा या विश्वाच्या पसा-यात. कुणी शाकाहारी तर कुणी मांसाहारी. कुणी पाण्यात राहणारे तर कुणी पाण्या बाहेर राहणारे. तर कुणी कुणी पाण्यातही आणि पाण्याबाहेर ही राहु शकणारे. निसर्गाचे चक्र अव्याहतपणे फिरते आहे. निसर्गातील अन्न साखळी स्वयंचलीत आहे. किमान अजुन तरी आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपाने ह्या अन्नसाखळीतील काही कड्या तुटावयास आलेल्या आहेत. वाढत्या अन्नाची गरज, नवनवीन शेतजमीन तयार करण्याची गरज,  पाण्याचे प्रवाह बदलण्याची गरज, फार्महाऊस साठी जमीन सपाटीकरण करीत पर्यावरण परीस्थितीकीला बदलण्याची गरज, उत्पादन वाढीसाठी व किटनियंत्रणासाठी विषारी खते व औषधांची गरज, या अशा अनेक कारणांमुळे नाच्या बेडकासारख्या असंख्य जीवांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

देवाने मानवास पृथ्वीवरील एक सहचर म्हणुन बनविला, पण माणुस स्वतःस या पृथ्वीचा स्वामी समजु लागला आहे. व याच्याच परीणामी, स्वतच्या फायद्यासाठी सृष्टीचे अव्याहत पणे शोषण मनुष्य करतो आहे.  नाच्या बेडकासारख्या असंख्य प्रजाती असतील. इतर अनेक प्राण्यांच्या देखील असतील. व काही संपुष्टात देखील आल्या असतील. व सांप्रत या सर्वास जबाबदार मनुष्यच आहे. चंगळवाद व उपभोगवादाच्या दुष्टचक्रात अडलेल्या आधुनिक माणसाला हे समजत देखील नाही की त्याचा निसर्गातील आततायी हस्तक्षेप एक दिवस त्यालाच संपुष्टात आणेल.

ह्या दुष्टचक्रातुन सुटका करुन घ्यायची असेल तर मुल्यांची पुर्नस्थापना करणे गरजेचे आहे. "इदं न मम" ह्या व अशा अनेक प्राचीन मुल्यांना प्रतिष्टा प्राप्त करुन देणे गरजेचे आहे. "मी" चा म्हणजे "अहं"चा उत्तरोत्तर विकास होत गेला पाहीजे. हा देहाधारी मी (अहं ब्रम्हास्मी), कालौघात व संस्कारांत व्यक्ति, व्यष्टीच्या पुढे गेला पाहीजे. व्यष्टीकडुन त्याने समष्टी(समाज) झाले पाहीजे व समष्टीकडुन सृष्टीमध्ये त्याचा अहंकार विलीन झाला पाहीजे. ही सृष्टी म्हणजेच मी आहे असा अनुभव मनुष्यास आला पाहीजे. याला आपल्या संस्कृतीमध्ये एक सुंदर वाक्य वापरलेले आहे. "सर्व खल्विदं ब्रम्ह"...हे सर्व जगच ब्रम्ह आहे.  असा अनुभव म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन एकाच जाणिवांच्या पातळीवर किंवा हवे तेव्हा हवे तसे हव्या त्या जाणिवेच्या पातळीवर जाऊन हव्या त्या प्राणीमात्राच्या जाणिवा जाणता येणे व सहवेदना सहन करणे, असे तर नसेल?  आपण सगळे एकच आहोत. माझ्यात , तुझ्यात, सर्वांच्या अंतरी, सर्व प्राणीमात्रांत तीच एक चेतना विद्यमान आहे. हा समान धागा पकडुन आपण म्हणजे मनुष्य स्वामी नसुन सृष्टीतील इतर सर्व जीवांचा(प्राणी आणि वनस्पती) एक सहचर आहे हा संस्कार माणसामाणसावर करता येईल का?. त्यातुन मग शोषणाची वृत्ती नाहीसी होऊन आवश्यक तेवढेच व इतरांस कमीतकमी अपाय  होऊन मिळेल तेवढेच निसर्गाकडुन घेण्याची सहज, उपजत प्रवृत्ती (म्हणजे धर्म) रुढ होईल.

खरच हे अवघड आहे का?

असो, विषयांतर झाल्यासारखे वाटले असेल कदाचित आपणास हे सर्व वाचताना. सुरुवातीस पर्यावरण, निसर्ग आणि शेवटास अध्यात्म. जर आपणास असे वाटले असेल की विषयांतर झाले तर आज किमान हे नक्की शिका की निसर्ग आणि अध्यात्म वेगळे नाही. निसर्गाच्या कणाकणात अध्यात्म आहे. प्रत्येक जीव (मनुष्य देखील) एका अज्ञात, निनावी , अनाकलनीय अशा सुप्त जिज्ञासेने पछाडलेला आहे. प्रत्येकास काही ना काही मिळवायचे आहे. कशाची तरी कमतरता आहे. प्रत्येक सजीव अविरत जीवंत राहण्याचा अटोकात प्रयत्न करताना दिसतो. जीवंत राहण्यासाठी खटाटोप सुरु आहे. अहोरात्र सुरु आहे. पण जीवंत का राहायचे? ह्याची उकल काही कुणालाच झालेली नाही. व ती याची देही याची डोळा होईल असे वाटत ही नाही कारण जीवंत काअ राहायचे? हा प्रश्नच जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याचे उत्तर शोधण्याची किंवा मिळवण्याची सुतराम शक्यता नाहीये. संघर्ष, अपार कष्ट, प्रेम, मैथुन , निद्रा व कारण माहीत नसताना जीवंत राहण्याचा आग्रह व त्यासाठीचे कष्ट, ही सगळी लक्षणे त्या नाच्या बेडकाची आहे. आणि मनुष्याची देखील आणि चराचरातील सर्व प्राणीमात्रांची देखील आहेत. आणि हा बेडुक तर माणसापेक्षा कित्येक शेकडो वर्षे आधी पृथ्वीवर अस्तित्वात आला आहे. त्याच्याकडे जास्त अनुभव आहे व तो अनुभव पुढच्या पिढ्यांकडे सोपवला जात आहे. व ह्या सर्व क्रियाकलापाचा हेतु जर त्या न पडलेल्या प्रश्नाची उकल करणे हा असेल तर हा बेडुक माणसापेक्षा नक्कीच जास्त जवळ पोहोचला असेल त्या उत्तराच्या.  त्यामुळे विषयांतर अजिबात नाही. आपल्यातील चिकित्सक वृत्ती जागी व्हावी. पर्यावरण, निसर्ग हे काही आपल्यापेक्षा वेगळे काही नाहीये. आपण स्वतःच निसर्ग आहोत. इतर सर्व प्राणीमात्रांचे सहचर आहोत स्वामी हा संस्कार आपण पुढच्या पीढ्यांना देऊया.
माऊलींच्या पसायदानामध्ये परवाच एक ओवी ऐकली. त्याप्रमाणे होवो.


॥जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात...॥

विसरु नका - वेबपेज वर जाऊन नाच्या बेडकाचा नाच आणि सुरेल गाणे जरुर ऐका.

http://nisargshala.in/amazing-kick-boxer-nisargshala/