शनिवार रविवार नेहमीप्रमाणे कॅम्पिंग ट्रिप च्या नियोजनासाठी वेल्ह्याला जाणे झाले. अगदी अचानक ठरल्यामुळे एकट्यावरच सगळी जबाबदारी आली. एकटाच असल्यामुळे दुचाकी वर जाणेच पसंत केले. पुणे बेंगलोर महामार्ग सोडुन वेल्ह्याकडे निघालो. तस पाहता चेलाडी-वेल्हे-केळद(-महाड) हा देखील राज्य महामार्गच आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ होतीच. दुचाकी असल्याने वेग मर्यादीत होता. त्यातच आपल्याकडे रात्रीच्या वेळी वाहने चालवताना समोरच्या गाडीच्या हेडलाईट चा झोत डोळ्यावर आल्याने डोळे दिपुन जात होते. त्यातच हेल्मेट घातले होते, त्यामुळे रस्त्यावर किंवा आजुबाजुला फारसे पाहता येत नव्हते किंवा दिसत ही नव्हते. अनेक वाहन चालकांना हे माहीतच नाही की समोरुन दुसरी एखादी गाडी आली असता आपल्या गाडीचा दुय्यम प्रकाशझोत लावुन समोरच्या चालकास त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची असते. रात्रीच्या अंधारात अशाप्रकारे डोळे दिपल्यामुळे अनेक अपघात होत असतात. आपल्याकडे समस्या अनेक आहेत. रस्त्यांवर खड्डे असणे, रस्ते अरुंद असणे, रस्त्यावर लाईटस नसणे(ग्रामीण भागात), गतिरोधक नसणे किंवा असले तर त्यांची उंची एवढी जास्त असणे की गाडी सहीत चालकाची हाडे खिळखिळी होणे, अशा अनेक समस्या आहेत. या समस्या बहुंशी शासन यंत्रणेच्या कुचकामामुळे किंवा लोकप्रतिनिधींच्या अज्ञानामुळे आहेत. व त्यामुळे देखील अनेक अपघात होत असतात. नागरीक म्ह्णुन कदाचित या बाबतीत आपण निषेध, तक्रार, पाठपुरावा यापेक्षा अधिक काही करु शकत नाही. परंतु अप्पर आणि डीपर चा उपयोग आपण वाहन चालविताना केला तर आपण काही प्रमाणात तरी डोळे दिपण्यामुळे होणारे अपघातांचे प्रमाण काही प्रमाणात करु शकतो. २०११ मध्ये या अशाच डोळे दिपण्यामुळे मला एक अपघात झाला व माझा डावा हात कायमस्वरुपी अधु झाला.
मला शनिवारी रात्री देखील अशा डोळे दिपण्यामुळे नीटसे दिसत नव्हते. अंधार होता. समोरुन एकही गाडी येत नसेल तरच रस्ता आणि रस्त्यावरचे खड्डे दिसत. संपुर्ण ३० किमी च्या प्रवासात एक अनाकलनीय गोष्ट जाणवली. दर पाच दहा फुटांवर , रस्त्यात अनेक बेडुक, रस्त्यावर धावणा-या गाड्यांच्या चाकाखाली येऊन, चिरडुन मरुन पडलेले दिसले. हजारोंच्या संख्येने असतील हे बेडुक. कधी कधी माझ्या गाडीच्या समोरुन टुणुक उडी मारताना ही अनेक बेडुक दिसले. लहान, मोठे मध्यम आकाराचे असंख्य बेडुक. एक दोन साप ही रस्त्या ओलांडताना चिरडले गेल्याचे दिसले.
बेडुक म्हणा किंवा साप म्हणा, ह्यांना काय गरज आहे रस्त्यावर येण्याची. इथे स्वतच्या गाडीच्या हेडलाईट मुळे समोरुन गाडी चलवत येणा-या माणसाचे काय हाल होतात याची तमा न बाळगणारा माणुस का म्हनुन ह्या तुच्छ बेडकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतील बरे? रस्ते माणसांनी बनवलेत. माणसांचा अधिकार आहे रस्त्यांवर. त्या रस्त्यांवर बिनधास्त उड्या मारण्याचे धाडस बेडकांनी का करावे. चुक बेडकांचीच आहे. आणि त्या सापांची सुध्दा. रस्ते नसतील तर आमची प्रगती कशी होईल? आमच्या प्रगती साठी आम्ही रस्ते बनवुच आणि जर तुम्ही तुच्छ बेडुक किंवा साप, ससे, हरण भेकर आमच्या रस्त्यावर आले तर आम्ही तुमचा क्षुद्र जीव वाचवण्यासाठी गाडीचे ब्रेक दाबण्याचे कष्ट आम्ही माणसे का बरे घेऊ? ब्रेक दाबला व आमचा वेग कमी झाला तर आमची प्रगती कशी काय होणार बरे?
पण चुक बेडकांची हे नक्की. त्यांना समजत नाही का की ह्या सगळ्या डांबरी रस्त्यांवर आले नाही पाहीजे. का बरे एवढ्या मोठ्या संख्येने हे बेडुक रस्त्यावर येऊन जीव गमावत असतील? मला काहीही सुचत नव्हते. मन सुन्न, खिन्न झाले होते. माझ्या वेळ कमी होता. मला कॅम्पसाईटवर आमचे ग्राहक येण्या आधी पोहोचायचे होते. तरी देखील मी जाताना माझ्या गाडीच्या चाकाखाली कुणी ही बेडुक मरणार नाही याची दक्षता घेत गाडी चालवीत गेलो. सोबतच मी एक पट्टेरी मण्यार, म्हणजे अतिविषारी साप, कि जो रस्त्यावर आडवा होता व हळु हळु हालचाल करीत होता असा पाहीला. माझे लक्षात आल्यावर गाडी वळवुन माघारी आलो व गाडीचा प्रकाशझोत त्याच्यावर सोडुन आणि पाय आपटुन त्याला हळु हळु रस्त्याच्या कडेला झाडीत जाण्यास भाग पाडले. आणि दुसरा गवत्या साप. अगदी गवताच्या काडी सारखाच पातळ साप. रस्त्यात जर हा दिसला तर क्वचित असे वाटेल की गवताची काडीच पडली आहे. मी अशा प्रकारे दोन्ही दिसलेल्या सापांना रस्त्याबाहेर हाकलुन लावले. रस्ता काय त्यांच्या बापाचा आहे काय? आले मोठे आमच्या रस्त्यावर.
शनिवार रविवार आमचा निसर्गपर्यटनाचा कार्यक्र्म नेहमीप्रमाणेच अमेझींग, ऑसम असा झाला. माघारी निघताना रविवारी पुन्हा अंधारले. संध्याकाळची सांजवेळ. सुर्य पश्चिमेला सिंगापुर रोडच्या पल्याड, क्षितिजाला स्पर्श करता झाला. वेल्ह्याला पोहोचेपर्यंत मी मुद्दामहुन हेल्मेटची काच लावली नव्हती. वेल्हे सोडल्यावर मात्र रस्ता थोडा सुस्थितीत असल्याने, वेग वाढवण्याची संधी मिळते. त्यामुळे हेल्मेटची काच लावुन थोडा वेग वाढवला. आणि पुन्हा दिसायला लागले त्या राज्य मार्ग क्र. ६५ वर मृतुचे तांडव. फुटाफुटवर बेडुक उड्या मारुन मारुन रस्ता ओलाम्डण्याच्या प्रयत्नात वाहनांच्या चाकाखाली जीव देत होते. पुन्हा तेच प्र्श्न कशासाठी हे बेडुक मरणाला मिठी मारण्यासाठी रस्त्यावर येत होते? तीच खिन्नता. गाडी खड्ड्यांमध्ये आदळत होती, त्यामुळे गाडीच्या वेगवेगळ्या भागांचा आवाज येत होता. हेल्मेटच्या काचेच्या बेचंगळीतुन वा-याचा आवाज येत होता, मध्ये फटाक्यांचा आवाज, मध्येच एखाद्या गाडीच्या कर्णकर्कश्श हॉर्नचा आवाज. इतके सगळे आवाज असताना देखील स्मशान शांततेचा अनुभव येत होता. जीवे जीवस्य जीवनम असे आपण म्हणतो. त्यामुळे एखाद्या प्राण्याला दुस-या प्राण्याने भुक भागवण्यासाठी मारणे हे ठिक आहे. पण ह्या असंख्य बेडकांच्या मरणाने कुणाची भुक भागतेय? कुणाला काय फायदा होतोय? विशेषतः माणसाला काय उपयोग होतोय का?
आणखी एक गोष्ट मला जाणवली ह्या ३० किमी च्या राइड मध्ये. वेल्ह्याकडुन पुणे बेंगलोर हाय वे कडे येताना, गुंजवणी नदी रस्त्याला काहीशी समांतर, एखाद्या किमी च्या अंतरावर वाहते. म्हणजे पुण्याकडे येताना माझ्या डावीकडे नदी आणि उजवी कडे डोंगररांग. हा क्रम थोडा नीट पाहु. माझ्या डावीकडे सर्वात आध डोंगररांग आहे. ही डोंगररांग देखील रस्त्याला समांतरच आहे. डोंगर , मग डोंगर उतार, मग सखल भाग. ह्या सखल भागात भात खाचरे, काही गावे आणि मग रस्ता आणि उजवीकडे पुन्हा भातशेती आणि नदी.
बेडकांच्या उड्यामारण्या मध्ये एक साधर्म होते. सर्व बेडुक रस्त्याच्या डावीकडुन उजवी जाण्याच्या प्रयत्नात असताना उड्या मारीत रस्त्यावर येऊन चिरडले जात होते. काल रात्री हे माझ्या लक्षात आले नव्हते. निसर्गचक्राच्या अनेकविध आ-यांपैकीच ही एक आरी असावी असे मला तरी वाटते. पावसाळा संपलाय. डोंगर, डोंगर उतार व नंतरच्या सखल भागातील पाणी हळु हळु कमी कमी होत जाणार. बेडुक जरी उभयचर असला तरी पाणी व जमीन एकत्रित म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. नैसर्गिक बदलांची चाहुल ह्या बेडकांना लागली नसेल कशावरुन? कदाचित त्यामुळे हे बेडुक भविष्यात जिथे मुबलक पाणी असेल अशा ठिकाणी स्थलांतर करीत असतील. त्या बिचा-यांना काय माहीत रस्ता म्हणजे काय? ते पाण्याच्या दिशेने प्रवासास निघाले आणि माणसाच्य प्रगतीच्या वाटेने त्यांना रस्त्यावरच निष्ठुरपणे मारले.
प्रत्येक जीव निसर्गाची अप्रतिम अशी कलाकृती आहे. प्रत्येक जीवामध्ये वैश्विक चैतन्याच्या आविष्कार होत असतो. प्रत्येक जीव निसर्गातील महान अशा सामंजस्याचा (हार्मनी) एक महत्वाचा घटक आहे. असे असताना आपण, म्हणजे मनुष्याने, अशा निष्पाप बेडकांना विनाकारण का बरे मारावे? विकास प्रगती साधताना रस्ते बनणारच. पण आपण हे का विसरतोय की रस्त्यावर चालणा-या गाडीचे स्टीयरींग आपल्या हातात आहे. ब्रेक लावणे, मर्यादीत वेग ठेवणे आपल्या हातात आहे. आपण निसर्गातील आपल्या सहचरांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करुन देखील एखाद दुसरा प्राणी अनावधाने मारला जाणे आपण समजु शकतो. पण बेदरकार होऊन बेभान होऊन आपल्या सहचरांना चिरडणे म्हणजे माणुसकी नव्हे.
एरवी, अशी बेडक आपल्या गाडी खाली मरतात याची जाणीव देखील आम्हास नसते. असो. प्रगती होणार, रस्ते होणार, गाड्या धावणार, बेडुक आदी प्राणी रस्त्या ओलांडण्याचा प्रयत्न करणार. आपण त्यांच्या असण्याचा आदर करीत त्यांचा जीव वाचवण्याच्या प्रयत्न करावा. आणि तरीही कुणी आपल्यामुळे कुणी गतप्राण झाले असेल तर किमान आपल्यातील अमानुषपणाची व या प्राण्यांच्या हकनाक मृत्युची जबाबदारी स्वीकारुन क्षणभर का होईना अंतर्मुख व्हावे व माणसातील निसर्ग जागा व्हावा..
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे
No comments:
Post a Comment