"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
काही शास्त्रज्ञही अवैज्ञानिक का वागतात ?
वैज्ञानिक अथवा अवैज्ञानिक म्हणजे काय? हे विशद न करताच केवळ गृहीत धरुन केलेले विधान व शीर्षक.
अंमळ अपरिपक्व विचार जिथे आला आहे तिथे मी माझे मत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
___________
शास्त्रज्ञ हा शास्त्रीय विचारपद्धती वापरत असतो. तो त्याच्या जगण्याचा भाग असतो. स्वाभाविकच अशी अपेक्षा असते की या शास्त्रज्ञ स्वतःच्या जीवनात आपोआपच अंधश्रद्धांच्यापासून दूर राहावे, तसेच डोळसपणे जगावे. पण काही अनुभव विपरित व वेगळे येतात. आपल्या कार्यक्षेत्रात विज्ञानाची आराधना करणारा शास्त्रज्ञ प्रत्यक्ष वागताना त्याच्यापेक्षा अगदीच वेगळे वागतो. असे का घडते हे नीटपणे समजून घ्यावयास हवे.
//
शास्त्रज्ञच नव्हे तर जगातील प्रत्येक व्यक्ति नव्हे नव्हे प्राणी, सुक्ष्म, महाकाय असे सगळेच शास्त्रीय विचारपध्दती वापरीत असतात. शास्त्रीय हा शब्द हल्ली हल्ली अस्तित्वात आला आहे. किंवा हा शब्द अस्तित्वात नव्हता तेव्हा देखील हे असेच व्हायचे. तर्कबुध्दी, निरीक्षणे व निरीक्षणांवर आधारीत कर्मे असा मुळ स्वभाव चराचरातील प्रत्येक घटकामध्ये आहे. तुम्ही याला विज्ञान विज्ञान म्हणता आहात त्यामध्ये ही हेच आहे. माणसांचे सोडा, प्रत्येक सजीव आणि निर्जीव देखील अशाच पध्दतीने वर्तन करीत आहे. ते सारेच जण डोळसपणे जगतात. अगदी लहान बाळ देखील एखाद्या विस्तवाशी तोपर्यंतच खेळेल जोपर्यंत त्याला समजणार नाही की विस्तव अपायकारक आहे. निरीक्षण,अनुभव, प्रयोगातुनच मनुष्याला आणि समस्त चराचराला योग्य काय नी अयोग्य काय हे समजते.
//
त्यासाठी शास्त्रीय विचार पद्धती व वैज्ञानिक दृष्टिकोन यातील फरक समजून घ्यावयास हवा. शास्त्रीय पद्धती ही तर्कावर आधारित, निरीक्षणावर अधिष्ठित गणिती व्यवहार आहे.
//
शास्त्रीय विचारपद्धती व वैज्ञानिल दृष्टिकोन यामध्ये काय फरक आहे बरे? दोन्ही एकच तर नाहीत का?
//
शोधकतेपलीकडे या विचारपद्धतीची झेप जाऊ शकते. परंतु बहुधा ती जात नाही. तसा प्रयत्नही होत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन युरोपमध्ये ज्यावेळी निर्माण झाला, त्यावेळी लागलेल्या अनेक शोधांमुळे समाजाची प्रचंड घुसळण झाली. भारतात ही वेळ आलीच नाही. ब्रिटिशांच्या सत्तेमुळे भारतात विज्ञान उपरेपणाने आले. त्यामुळे सूर्य हा मध्यबिंदू असून त्याभोवती पृथ्वी फिरते अथवा माकडापासून आजचा मानव उत्क्रांत झाला या प्रतिपादनामुळे जी खळबळ युरोपमध्ये निर्माण झाली, भारतात झाली नाही.
//
शोधकतेलीकडे म्हणजे कुठे? किती पलीकडे? तर्काच्या आणि कल्पनेच्या पलीकडे? म्हणजेच जे अतर्क्य आहे, कल्पनातीत आहे तिथपर्यंत? एक कुणीतरी महान शास्त्रज्ञ म्हणुन गेला आहे की कल्पकपा ही विज्ञानाची सुपीक जमीन आहे. अतर्क्य गोष्टींची कल्पना करणे चुकीचे आहे का?
युरोपात नक्कीच घुसळण झाली. वैज्ञानिकांना आजन्म कारावास भोगावे लागले. हत्या केल्या गेल्या. मात्र भारतात असे काही झाले नाही. काही वैज्ञानिकांना गुरुजन अशी, आचार्य अशा उपाध्या दिल्या गेल्या. सुर्य मध्यबिंदु आहे ही भारतासाठी काही नवीन कल्पना नव्हती. युरोपात घुसळण झाली याचा व भारतात झाली नाही याचा अर्थ भारत मागासलेला होता असा नाही तर भारत अधिक प्रगत होता व वैज्ञानिक शोधांस अधिक मोकळ्या मनाने स्वीकारणारा होता व आज ही आहेच. याचाच परिणाम कोरोना सारख्या संकटांत देखील जिथे तबलिगी, मुस्लीम समाज नमाज साठी एकत्र येऊन सामाजिक आरोग्या धोका निर्माण करीत आहेत तिथे अगदी एक दोन घटना वगळता धार्मिक कार्यक्रमांसाठी भारतीय माणसे अजिबात एकत्र आली नाहीत. यात काय अवैज्ञानिकता , अंधश्रध्दाळुपणा आहे? की धर्मपिपासु पणा आहे?
राहिला प्रश्न माकडापासुन मानव बनण्याचा तर ही कल्पना निव्वळ एक गृहितक आहे व याबाबतीत ठोस प्रयोगावर निरीक्षणे नाहीत. त्यामुळे यालाच सत्य मानणे वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अगदीच विरुध्द आहे. माकडापासुन माणुस ही एक शक्यता असु शकते, पण तीच एकमेव आहे व तीच तेवढी खरी आहे असे मानणे देखील वैज्ञानिक कट्टरतावाद आहे.
//
स्वाभाविकपणेच शास्त्रीय विचारपद्धती हा जीवन दृष्टिकोन न बनता विकासाचे एक सोयीस्कर अवजार बनले. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होताना युरोपमध्ये निर्माण झालेली वैचारिक घुसळण ही तो विचार मांडणाऱ्याला स्वतःला पणाला लावायला भाग पाडत होती. भारतात शास्त्रीय विचारपद्धतीद्वारे सोयीस्कर असलेली शोधकता आली. पण निर्भयता आलीच नाही.
//
खुपच व्हेग म्हणजे वरवरचे विधान आहे हे! स्वतःला पणाला लावायला भाग पाडत होती असे म्हणताना हे श्रेय त्या व्यक्तिच्या शास्त्रीय विचार करण्याच्या पध्दतीला न देता ते दिले पाहिजे त्या त्या समाजातील अशास्त्रीय, मुलतत्ववादी विचारसरणीला. त्या त्या मुलतत्ववादी विचारसरणीने शास्त्रीय दृष्टिकोन असणा-यांना ठार केले, शिक्षा केली. अवैज्ञानिक वृत्ती होत्या म्हणुनच वैज्ञानिक वृत्तीला विरोध झाला व वैज्ञानिकांना त्रास झाला. नवसाने कन्या पुत्र (अवैज्ञानिक विचार) होत नाहीत. संतती होण्यासाठी पती-पत्नी (स्त्री-पुरुष – शास्त्रीय विचार) दोहोंची आवश्यकता असते. असा वैज्ञानिक विचार देखील इथे मांडला गेला होताच की. असे अनेक विचार आहेत की आपल्या समाजात मुळ धरुन होतेच. यथार्थ जीवन धर्म अर्थ काम व मोक्ष या गोष्टींबोवती दाखवले आहे. धर्म म्हणजे रीलीजन असा अर्थ घेऊ नये. धर्म म्हणजे नक्की काय हे समजणे अवघड. पण थोडक्यात सांगायचे म्हणजे आजचा धर्म आहे संविधान. व अर्थ म्हणजे काय? तर अर्थार्जन. यात काय आहे बरे अवैज्ञानिक? काम म्हणजे संभोग की प्रत्येक सजीवाची सुप्त कामना असते. त्याविषयी देखील भारंभार लिहिले, वाचले, रचले, शिल्पिले आहे भारतात. मोक्ष म्हणजे अनुसंधान. स्वत्वाचा अनुसंधान. को अहम? चा शोध. अशा शोधामध्ये काय अवैज्ञानिक आहे बरे? की यामध्ये काही विध्वंसक आहे? तर नक्कीच नाही. अपायकारक जसे सो कॉल्ड विज्ञानाच्या बाबतीत आहे तद्वतच अध्यत्माच्या बाबतीत आहे. अणु उर्जेचा शोध मानवाच्या कल्याणासाठी होऊ शकतो. पण त्याच्या विरुध्द होतानाच आपण पाहतो आहोत.
//
याबरोबरच ही कोस्टर लक्षात घ्यावयास हवी की माणूस हा मुळातच केवळ बुद्धीने वागणारा प्राणी नाही. त्याचे व्यक्तिमत्त्व बुद्धी आणि भावना यातून बनलेले आहे. वरील दोन्ही बाबी लक्षात घेतल्या की शास्त्रज्ञाच्या अशास्त्रीय वागण्याचा पाया स्पष्ट होतो. एक उदाहरण ही बाब अधिक स्पष्ट करेल. एखाद्या शास्त्रज्ञाचे मूल आजारी पडले असेल तर तो सर्व आधुनिक वैद्यकीय उपचार नक्कीच करेल. परंतु त्याबरोबर देवाचा अंगारा मुलाला लावण्यात त्याला चूक वाटत नाही. त्यापुढे जाऊन मुलाला बरे वाटावे म्हणून मृत्यूंजय मंत्राचा जप करणे, देवाला नवस करणे, अनुष्ठान घालणे या बाबतीत बाबी करतानाही तो शास्त्रज्ञ संकोचत नाही. मुलावर कोणी शेजाऱ्याने करणी केली आहे व मुलाच्या आजाराचे खरे कारण ते आहे असे सांगितल्यास एखादा ताईत, तोडगा, उतारा करून दुष्ट करणीचा प्रभाव दूर करण्याचीही त्या शास्त्रज्ञांची तयारी असते. समजा असाच आणखी एक शास्त्रज्ञ स्वतःचे घर बांधत आहे, तर बांधणीचे अत्याधुनिक विज्ञान तो वापरतोच, पण जागेचे भूमिपूजन करणे, चौकटी पर्यंत काम आल्यावर चौकटीला काळी बाहुली बांधणे, मुहूर्तावर गृहप्रवेश करणे, त्याआधी वास्तुशांती विधी करणे हे सर्व करताना त्याचे शास्त्रज्ञ असणे त्याला आडवे येत नाही. याचा अर्थ कसा लावायचा असा प्रश्न नेहमी विचारला जातो. हे वर्तन योग्य नव्हेच, परंतु ते का घडते आणि कसे बदलता येईल, हा आपल्यापुढचा खरा प्रश्न आहे.
//
वैज्ञानिक दृष्टीकोन व अवैज्ञानिक दृष्टीकोन असे भेद आपण सहजच करुन टाकले आहेत. मुळात असे भेद करण्याचे कारणच नाही किंवा हे दोन विचार एकमेकांच्या विरुध्द दिशेला ठेवण्याने जास्तच नुकसान झाले आहे. विज्ञान म्हणजे नक्की काय बरे? तर चिकित्सक बुध्दीद्वारे निरीक्षण, आकलन, तर्क याद्वारे झालेले ज्ञान होय. यात बुध्दी हा मुलभुत घटक आहे. भावना अजुनही कुठेच नाहीये. तर तर्क-बुद्धीजनीत ज्ञान नसणे व ज्ञान असणे या दोन भिन्न टोकांच्या गोष्टी नाहीतच मुळात. ज्ञान नसणे इथे सुरु होऊन ज्ञानाच्या कक्षा विस्तारत जाऊन उत्तरोत्तर हे ज्ञान अधिक ठोस होत जाणे , असा खरतर विचारांचा पाया असायला पाहिजे. असे न होता स्वतःस वैज्ञानिक दृष्टीचे म्हणविणारे नकळतच समाजात वैचारिक दरी वाढवण्याचे काम अधिक जोमाने करीत आहेत. तर अवैज्ञानिक वृत्तीचा शास्त्रज्ञ असे खरेच कधी असु शकेल का? वैज्ञानिक व अवैज्ञानिक असे भाग तुम्ही पाडलेत. तर त्यालाच आधार मानुन मी ठामपणे म्हणतो की असे लोक जे ताईत, गंडा, दोरा, पुजा पाठ, शांतीपाठ आदी करतात त्यांन तुम्ही शास्त्रज्ञ म्हणताच कसे काय? तुमची बुध्दी कुठे गहाण ठेवली आहे काय तुम्ही? तो वैज्ञानिक नाहीच मुळी. इहलोकीच्या कल्याणासाठी कर्म करणे हाच एकमेव मार्ग असताना, पुजा विधी गंडे दोरे आदी जो कुणी करतो तो शास्त्रज्ञ कसा काय बरे? आणि तुम्ही त्याला शास्त्रज्ञ केवळ त्याच्या हुद्यामुळे, शिक्षणामुळे म्हणत असाल तर तुम्ही ज्ञान-विज्ञानाच्या मार्गावर अजुन पहिल्या इयत्तेत देखील नाही असे मी ठामपणे म्हणतो. आणि मी जर चुकीचा असेल तर तुम्ही असे म्हणुच कसे शकता हा आपल्या पुढचा खरा प्रश्न आहे.
//
विचार व भावना यांनी माणसाचे व्यक्तिमत्त्व बनलेले असते. यांपैकी भावनांचे संचालन करणारा मेंदूचा भाग व्यक्तीला, पाणीसृष्टीपासून मानव म्हणून त्याची जी उत्क्रांती झाली, त्यातून लाभलेला असतो. विचार करायला माणूस शिकला ही उत्क्रांतीमधील अगदी अलीकडची बाब आहे. भावना जोमदार असतात. त्या जणू मालक असतात आणि विचार त्या भावनांचा जणू सेवक असतो. त्यामुळे भावनेच्या प्रभावाखाली वर्तन केले जातेच. भावनाविश्वात अदृष्टाची भीती व अतृप्त कामनांची पूर्ती या दोन बाबी फार प्रभावीपणे अस्तित्वात असतात.
//
विचार करायला माणुस शिकला ही उत्क्रांतीमधील अगदी अलीकडची गोष्ट आहे, असे म्हणताना किती अलीकडची गोष्ट आहे हे सुध्दा लिहायला हवे होते? मुळातच उत्क्रांतीवाद हे केवळ एक गृहीतक आहे व त्यामध्ये देखील अनेक कच्चे दुवे आहेत की ज्यांची अद्याप समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीयेत. व निरीक्षण व प्रयोग यांचा तर त्यात हा विचार सपशेल नापास होतो. तर तुमच्या सर्व विचारांचा आधारच प्रयोगातुन सिद्ध झालेला विचार नसेल तर तुम्ही पुढे काय म्हणुन बोलावे बरे?
तर विचार करण्याची क्षमता कधी निर्माण झाली यापेक्षा ही क्षमता आपल्याकडे आहे हे सत्य हातातील बांगंड्यासारखे आहे की जे स्वयंसिध्द आहे. त्याच प्रमाणे भावना देखील सत्य व स्वयंसिद्ध आहेत. यापैकी नेमके कोण श्रेष्ठ व कोण कनिष्ठ याचा देखील तुलनात्मक अभ्यास तुम्ही करताय ते उत्तमच. पण यात मला सांगावेसे वाटते थोडक्यात. स्वामी विवेकानंदांच्या एका उक्तिचा मी इथे उल्लेख करतो. हे माझे अगदी आवडते वाक्य आहे. ‘ मनुष्य प्रकृतीपर विजय प्राप्त करने के लिये उत्पन्न हुआ है, उसका अनुसरण करने के लिये नही’ इथे प्रकृती या शब्दाचा अर्थ स्वभाव असा घ्यायचा आहे. प्रकृती-निसर्ग-मुलभुत-मुलभाव-बेसिक इंस्टिक्ट्स अशा अर्थाने प्रकृती हा शब्द घ्यायचा आहे. भावनांवर विजय मिळवणे म्हणजे काय? तर बुध्दीचा देखील वापर आपल्या जीवनात करीत राहणे असा होय. स्वामीजींनी वरील वाक्य एका उपनिषदावरील व्याख्यानादरम्यान उच्चारले होते , ते सुमारे सव्वाशे वर्षांपुर्वी.
//
आजारी पडलेल्या मुलाचा पिता असलेला शास्त्रज्ञ विचारपूर्वक वैद्यकीय उपचार करतो आणि अदृष्टाच्या भीतीपोटी अंधश्रद्धेचा आचार करतो. घर बांधणारा शास्त्रज्ञ बांधकामशास्त्राप्रमाणे चोख बांधकाम करतोच करतो. परंतु त्या घरात त्याच्या मनातील अनेक अतृप्त कामनांची पूर्ती व्हावी असे त्याला मनोमन वाटत असते. स्वतःला बढती मिळावी; मुलाला इच्छित शैक्षणिक क्षेत्रात सरकारी खर्चाने प्रवेश मिळावा; मुलीचे लग्न अनुरूप ठिकाणी कमी खर्चात जमावे; घरात चार चाकी गाडी यावी, परदेशगमनाची संधी लाभावी - अशा एक ना दोन, अनेक अतृप्त कामनांची पूर्ती होण्याची आकांक्षा शास्त्रज्ञ असलेली घर बांधणारा व्यक्ती करत असते. त्यासाठी भूमिपूजन ते वास्तुशांती हा प्रवास त्याला चूक वाटत नाही. या वर्तनात चूक काहीच नाही, आपापल्या ठिकाणी दोन्ही बरोबरच आहेत
//
पहा म्हणजे अतृप्त कामनांच्या तृप्तीसाठी गंडेदोरे करणे, पुजा बांधणे इत्यादी करणे म्हणजे अंधश्रध्दा असे तुम्ही म्हणताय. बरोबर ना? मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतो. काय अतृत्प कामनांच्या पुर्तीसाठी वैज्ञानिक प्रयोग करणे योग्य आहे? वैज्ञानिक प्रयोग करुन घर, गाडी, बंगला, पैसा मिळावा अशी कामने धरणे म्हणजे अंधश्रध्दा नव्हे काय? श्रध्दा किंवा अंधश्रध्दा ही तुम्ही काय करताय त्यावर कमी ठरते पण तुम्ही कशासाठी करयात यावर जास्त ठरते.
याउलट एखादा व्यक्ति डोळे बंद करुन त्याच्या कल्पनेतील परमेश्वराचे नामस्मरण करीत असताना तो कशाचीही अभिलाषा बाळगीत नाही, कशाचीही इच्छा बाळगीत नाही असा व्यक्ति; कामनांच्या पुर्तीसाठी वैज्ञानिक झालेल्या व्यक्तिपेक्षा अधिक श्रेष्ठ नाही काय?
तुम्ही जे म्हणताय त्यात चुकच आहे. मी तुमच्या सारखा स्वतःस विज्ञानवादी म्हणुन घेत नाही. तरीही मी हे सत्य बिनधास्त पणे स्वीकारतो व सांगु शकतो. दोन्ही आपापल्या ठिकाणी बरोबर कसे काय असु शकतील बरे? हे दोन भिन्न व्यक्ति असतील तरच ते बरोबर आहे असे म्हणता येईल. जर ही एकच व्यक्ति असेल तर याला दंभ असे म्हणतात.
//
अशा संस्कार घरीदारी, शाळेत म्हणजे सर्वच ठिकाणी अगदी लहानपणापासून होतो. तो अंतर्मनात दृढ होतो. शास्त्रज्ञ होताना कोणीही त्या व्यक्तीला सांगितलेले नसते की जे विज्ञान वापरले जाणार आहे, त्याच्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे आणि या दृष्टिकोनाचा फायदा प्रश्नाचे अचूक उत्तर मिळवणे, म्हणजेच या उदाहरणात मुलाच्या आजाराचा योग्य उपचार करणे व निर्दोष बांधकाम करणे हा तर आहेच, परंतु तेवढाच नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा खरा फायदा हा आहे की त्यातून अचेतन सृष्टीच्या गुणधर्मांची ओळख होते, त्याद्वारे आत्मविश्वास वाढतो, मनोव्यापार निर्भर होत निर्भय होतो, मानसिक दहशत संपुष्टात येते आणि त्यामुळे आयुष्याची बौद्धिक व भावनिक प्रत वाढते. आपल्या कार्यक्षेत्रात विज्ञानाची आराधना करणारा शास्त्रज्ञ प्रत्यक्ष वागताना त्याच्यापेक्षा अगदीच वेगळे वागतो. असे का घडते हे नीटपणे समजून घ्यावयास हवे. हे आज शिक्षणात व समाजात अथवा घरात दिसत नाही व संस्कारित होत नाही. त्यामुळे शास्त्रज्ञांच्या अशा वर्तनाचे अंतर्विरोध निर्माण होतात. त्यापासून जर सुटका हवी असेल तर एक नवी व्युहरचना करावी लागेल.
//
अचेतन सृष्टीच्या गुणधर्माची ओळख प्रत्येकास कमी अधिक फरकाने अगदी जन्म झाल्यापासुन होत असते. ही ओळख होण्यासाठी त्याला कोणत्याही विज्ञान अभ्यासक्रमाची गरज नाहीये. अचेतनच नव्हे तर सचेतन सुध्दा, अशा अनेक गोष्टींविषयी कुतुहल प्रत्येकास उपजतच असते. आणि हे कुतुहल केवळ मनुष्यालाच असते असेही नाही. आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात आपण अनेक प्राणी, जीव यांचे विडीयो पाहतो की ज्यामध्ये हे कुतुहल त्या प्राण्यांमध्ये देखील स्प्ष्टपणे दिसते आहे. त्यामुळे तुम्ही जे काही म्हणत आहात त्यात नवीन असे काहीच नाहीये. हे तुम्ही प्रयोगाने तपासुन पाहु शकता किंवा युट्युब वरील विडीयो पाहुन शंका समाधान करुन घेऊ शकता. एका मताशी मात्र मी सहमत आहे ते म्हणजे शिक्षण व्यवस्था , मनुष्य प्राण्याच्या या मुलभुत चिकित्सक प्रवृतीला पोषक नाहीये. व ती मध्ये आमुलाग्र बदल करण्याची आवश्यकता आहे.
//
शास्त्रज्ञांच्या काही वर्तनाचे अंतर्विरोध निर्माण होतात. त्यापासून जर सुटका हवी असेल तर एक नवी व्यूहरचना करावी लागेल. तिची रूपरेषा पुढीलप्रमाणे :-
१) तर्कशुद्ध विचार करणे हे माणूस असण्याचे प्रमुख लक्षण आहे. अतार्किक विचार व त्या प्रमाणेच केलेले वर्तन हा व्यक्तीने केलेला स्वतःचा मोठा पराभव ठरेल, याचे भान आणून द्यावयास हवे. त्याबरोबरच हा रस्ता योग्य असला, प्रगतीचा असला तरी एकाकी आहे याचे भानही राखावयास हवे.
// तर्कशुध्द विचार करणे केवळ हेच मनुष्य असण्याचे प्रमुख लक्षण आहे. असा हार्ड कोडेड विचार पसरवुन आपण वैज्ञानिक विचार पध्दतीलाच गळा आवळुन मारुन टाकणार नाही काय? अतार्किक विचार म्हणजे नक्की काय? तर प्रयोगातुन सिध्द होऊ शकत नाहीत असे विचार ना? तर त्या वि्चारांना विरोध करण्याऐवजी का नको आपण त्यांना प्रयोगासाठी उद्युक्त करावे. आणि हा रस्ता एकाकी असेक अशी भीती तरी कशी काय आपण निर्माण करु शकतो बरे? म्हणजे ज्यापध्दतीने पाप-भीरु तयार झालेत तसेच विज्ञान-भीरु देखील तयार करायचे का? …..---------म्हणुन अमान्य.
//
२) अशास्त्रीय पद्धतीने विचार करून वर्तन करणे अयोग्य असले तरी तो स्वतःचा हक्क आहे असे व्यक्ती म्हणू शकते. परंतु असे अंधश्रद्धवर्तन जेथे उघड शोषणाला आधार देते तेथे कायद्याची गरज आहे. निवडणुकीला उभे राहावे का राहू नये याचा निर्णय देवाला कौल लावून मागणे हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे. पण कोणी त्याला व्यक्तिगत स्वातंत्र्यही म्हणून शकेल. मात्र एखाद्या व्यक्तीने चोरी केली की नाही, यासाठी जागृत देवस्थानासमोर उकळत्या तेलात हात घालावयास लावणे हे निश्चितच शोषण आहे. अशा वेळी या समाजातील शास्त्रज्ञ अंधश्रद्धेचे वर्तन करणार यात नवल नाही. अंधश्रद्धांच्या विरोधात सतत थेट प्रभावी प्रबोधन परिणामकारकपणे करावयास हवे. घरात, शाळेत व समाजात सर्वत्र करावयास हवे. हे प्रबोधन म्हणजे विज्ञान प्रसार नाही याचे स्पष्ट भान हवे. _या प्रबोधनात बहुतेक वेळा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष धर्माची चिकित्सा होते; म्हणून या प्रबोधनाला विरोध होतो ही मर्यादाही समजून घ्यावयास हवी.
//
धर्म चिकित्सा होते म्हणुन प्रबोधनाला विरोध होतो असे मुळीच नाहीये. एखाद्याने चोरी केली आहे की नाही हे ठरविण्यासाठी कौल मागणे हे जितके अवैज्ञानिक आहे तितकेच अवैज्ञानिक आहे सर्रस सर्वच गोष्टींना विरोध करणे. एखादा रुग्ण ज्याप्रमाणे गंडा दोरा बांधुन निरोगी होत नाही त्याप्रमाणेच बिनचुकपणे आजार कोणता आहे (डायग्नोसिस) याच्या मुळाशी न जाताच केवळ लक्षणांवरुन त्याला उपचार देणे ही देखील अंधश्रध्दाच आहे. यामुळे प्रसंगी रुग्णाचे हीत होण्याऐवजी अहीतच होते. तसेच एखाद्या आजाराविषयी आवई (हाईप) उठवुन, मनुष्याची प्रतिकारशक्तिवर काम करण्याऐवजी मनुष्यांना फक्त आणि फक्त रोगनिवारण लसीच्या शोधाच्या प्रतिक्षेत घरातच प्रतिक्षा पहायला लावणे ही देखील अंधश्रध्दाच नव्हे काय? काही कंपन्या केवळ आर्थिक नफ्या साठी औषधांची पेटंट घेतात, पेटंटचा कालावधी संपल्यावर त्याच औषधाची नावे बदलुन नव्याने पेटंत घेऊन तीच औषधे निव्वळ नफेखोरीसाठी विकत राहतात. काय ही अंधश्रध्दा नाहीये? मित्रांनो, हा तर अपराध आहे. व असा अपराध करणा-यांमध्ये स्वतःस वैज्ञानिक वृत्तीचे म्हणवुन घेणारे देखील सहभागी होताहेत.
//
३) घरात लहानपणापासून परंपरेचे विचार, आचार मुलगा ग्रहण करतो. समाजात सर्वत्र धार्मिकतेचे वातावरण पसरवले जात आहे. त्याचा प्रभाव पडतो. दृकश्राव्य माध्यमे अत्यंत अर्थहीन अवैज्ञानिक मालिकांचा रतीब घालतात आणि शाळेत सर्वधर्मसमभावाच्या नावाने कोणत्याही धर्माची कसलीही चिकित्सा टाळली जाते. शास्त्रज्ञाने अवैज्ञानिक न वागण्यासाठी एका बहुआयामी प्रबोधनाची गरज आहे आणि आजचे कटू वास्तव असे आहे की या प्रबोधनाचा सर्व प्रमुख जागा या अंधश्रद्धेने व्यापल्या आहेत.
//
हे जर खरे असते तर भारतात जगदीशचंद्र बसु जन्मला आले नसतेच. मिसाईल मॅन घडलेच नसते. मिशन मंगल, चांद्रयान घडलेच नसते. प्रबोधनाची आवश्यकता आहेच. त्याबाबतीत मी सहमत आहेच पण त्यासाठी जी कारणे सांगितली आहेत या लेखात त्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही. मनुष्याच्या उपजत कौतुहलाला हळुवार फुंकर घालणारे, त्याला उमलु देणारे असे प्रबोधन व्हावे. नाही की त्याच्या कल्पनाशक्तिला छाटणारे.
//
४) अवैज्ञानिक विचारांचे संस्कार लहानपणापासून अंतर्मनात खोलवर झालेले असतात. या अंतर्मनात प्रवेश करण्यासाठी केवळ वैचारिक प्रबोधन पुरत नाही, तर कृतिशील प्रबोधन लागते. निर्भयपणे आचार करून हे दाखवावे लागते, की त्या वर्तनातून काहीही विपरीत घडत नाही. आजची शिक्षण व्यवस्था तर अशा गोष्टींचा साधा सर्व्हेही करत नाही. गाडीला अपघात होऊ नये म्हणून तिला लिंबूमिरची बांधतात. असे करणाऱ्या व न करणाऱ्या वाहनांचे सर्वेक्षण करून त्यांच्या अपघातांच्या टक्केवारीत काहीही फरक पडत नाही हे पटवून देता येईल. ३६ गुणांची पत्रिका जमून झालेली लग्ने आणि त्याशिवायची लग्ने यांची पाहणी करून फलज्योतिषाची निरर्थकता पटवता येईल. काळ्या बाहुल्या बांधण्याचे प्रमाण वाढत आहे, त्या जमवून त्यांची होळी पेटवण्याचे कृती करता येईल. अमावस्येच्या दिवशी रात्री १२ वाजता स्मशानात सहल नेऊन भूताच्या कल्पनेला सुरुंग लावता येईल. गरोदर स्त्रीने ग्रहण पाहिल्यास जन्माला येणाऱ्या मुलाचे ओठ फाटलेले असतात, हा समज दूर होण्यासाठी समितीमधील काही लढाऊ महिलांनी स्वतःच्या गरोदरपणात ग्रहणकाळात जाहीर ठिकाणी भाजी चिरली होती आणि या समजामागील खोटेपणा प्रत्यक्षात सिद्ध करून दिला होता. अशा अनेक कृती सुचविता येतील. संतोषीमातेच्या नावाने अनेक पत्रके गावोगाव वाटली जातात. त्या पत्रकांच्या ५०० प्रती, ज्यांना ते पत्रक मिळाले असेल त्या सर्वांनी छापून इतरांना वाटाव्यात अशी सूचना त्यात असते. तसे न केल्यास गंभीर आपत्ती ओढवेल व केल्यास फायदाच फायदा होईल असा वायदा पत्रकात केलेला असतो. उगीच रिस्क नको म्हणून अनेकजण त्याप्रमाणे वागतात, तर काही जण आपल्यापुरते पत्रक निकाली काढतात. एका गावात अशीच पत्रके विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मिळाली. शिक्षक अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते होते. स्वाभाविकच शिक्षक काय सल्ला देतात या कुतूहलापोटी विद्यार्थी शाळेत पत्रके घेऊन आले. शिक्षकांनी पत्रके बाहेर काढले वाचून दाखवले. नंतर म्हणाले, 'आता काळजीपूर्वक पाहा मी काय करतो ते.' मुलांच्या समोर पत्रक फाडून त्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले. नंतर विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणाले 'या पत्रकात १५ दिवसांत या स्वरूपाची पत्रके छापून न वाटल्यास गंभीर परिणाम होतील अशी धमकी आहे. मी तर तुमच्या समोर पत्रक फाडले आहे. आता पहा १५ दिवसांत मला किंवा माझ्या कुटुंबीयांना काही होते का !' १५ दिवस गेले अर्थातच काही घडले नाही. विद्यार्थ्यांच्या दप्तरातून आपोआपच पत्रके बाहेर आली आणि त्यांच्या हातांनीच त्याचे तुकडे झाले. ही कृती ज्या हातांनी घडली ते मन दैवी दहशतवादाच्या धमकावणीला भावी जीवनात बळी पडणे सहजासहजी होणार नाही. मात्र या सर्व कृतीशीलतेचा मागमूसही वैज्ञानिक संस्कार देण्याचे मान्य असलेल्या कुटुंबात व समाजात वा शिक्षणात दिसत नाही.
//
वर उल्लेख केल्याप्रमाणे अंधश्रध्दा ही एक सापेक्ष संकल्पना आहे. मी शास्त्रज्ञ झालो तर मला गाडी बंगला सुंडर स्त्री, नोकर चाकर मिळेल , या कामनांच्या पुर्तीसाठी जर कुणी शास्त्रज्ञ होत असेल तर ती अंधश्रध्दाच होय. त्याच प्रमाणे फसव्या डॉक्टर कडुन नसलेल्याच आजारावर निव्वळ त्याची कमाई व्हावी म्हणुन उपचार घेत राहणे ही देखील अंधश्रध्दाच होय. अनेकदा तर सर्दी खोकल्या सारखे आजार मनुष्याच्या स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तिनेच बरे होतात, तरीही डॉक्टर औषधे देतात, फी आकारतात, व लोक ती औषधे घेतात, इंजेक्शने घेतात. कालांतराने बरे होतात. व त्यांना वाटते डॉक्टरांनी बरे केले. ही देखील अंधश्रध्दाच की. मी यापुढे जाऊन असे म्ह्णतो की ही अंधश्रध्दा नाही तर ही फसवणुक आहे. जशी इथे आहे तशीच ती धर्माच्या नावाखाली सुध्दा होत आहे. त्यामुळे अंधश्रध्देचा संबंध केवळ धर्माशी जोडणे सर्वथा अयोग्य आहे. यात फसवणुक करणारा आहे व फसवणुक करवुन घेणारा देखील आहे. दोघे ही आहेत. अमावस्येच्या दिवशी स्मशानात सहल नेऊन काय हशिल होईल बरे? त्यापेक्षा अमावस्येच्या रात्री चमचम करणारे लाखो करोडो तारे दाखवा मुलांना! विरोधी भावनेने तुम्ही किंवा कुणीही काहीही करायला जाल तर विरोधच होणार. आधी म्हंटल्याप्रमाणे अवैज्ञानिक विरुध्द वैज्ञानिक असे समीकरण मांडण्यापेक्षा उत्तरोतर वैज्ञानिक , अधिक वैज्ञानिक अशा संज्ञा वापरल्या तर भेद नाहीसा होईल.
//
५) वरील सर्व मर्यादा खऱ्या आहेत. त्या ज्या प्रमाणात ओलांडल्या जातील, त्या प्रमाणात शास्त्रज्ञ हे जीवनाच्या सर्व क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाने वागण्याची शक्यता वाढेल. हीच बाब कोणत्याही सुशिक्षित अथवा अशिक्षित व्यक्तींच्या बद्दलही खरी आहे. मात्र या सर्वांसह एक जैवशास्त्रीय कारण आहे. ते असे की, माणूस हा देखील एक प्राणीच आहे. माणसाच्या मेंदूचा मोठा भाग आजही प्राण्याच्या मेंदू सारखाच आहे. उत्क्रांतीच्या अगदी अलीकडच्या काही हजार वर्षांत विचार करणारा माणसाचा मेंदू (Neocortex) विकसित झाला ही उत्क्रांती पूर्वीच्या तुलनेने फारच झपाट्याने झाली. माणसाला परंपरेने लाभलेला प्राणीमेंदू व हा उत्क्रांत झालेला विवेकी मेंदू यांची अंतर्गत सुसंगती नीट निर्माण झाली नाही. कारण नव्या मेंदूची उत्क्रांती तुलनेने खूप झपाट्याने झाली. स्वाभाविकच अनेक बाबतीत व्यक्ती ही विचाराच्या ऐवजी भावनेच्या आधारे निर्णय घेते, म्हणजेच कार्यकारणभाव डावलून भावनेच्या प्रभावाखाली निर्णय घेते.
//
पाचवा मुद्दा तर निव्वळ भंपकपणा आहे. नवीन रुपरेषा वाचताना पाचव्या मुद्द्यामध्ये काहीच रुपरेषा दिसत नाही. यात तुमच्याच लेखातील तोच तो पणा आहे. ते उत्क्रांतीवादाचे सदोष गृहितक व बुध्दी व भावना यांच्या तील तुम्हालाच न उलगडलेले द्वंद्व.
//
संदर्भ: तिमिरातुनी तेजाकडे या पुस्तकातून....
//
संदर्भ – माझी तर्कबुध्दी
//
No comments:
Post a Comment