Wednesday, October 24, 2018

कोजागरी पोर्णिमा - पुर्वार्ध

नमस्कार,


आज कोजागरी पोर्णिमा आहे. सकाळपासुन व्हॉट्सॲप फेसबुकवर असंख्य शुभेच्छा संदेश मिळाले. आपल्या समाजामध्ये अजुनही आपल्या प्राचीन चालीरीतींना, प्रथा, परंपरांना स्थान आहे याचेच हे लक्षण आहे.
अन्यथा, हे सगळे सणोत्सव सोडले तर आपण खरच आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपल्या संस्कृतीला आपण किती स्थान देतो? याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.
देवी आजच्या रात्री, पोर्णिमेच्या लख्ख प्रकाशामध्ये घरोघर दारोदार फिरुन को जागरती असे विचारते ! व जे कोणी जागे असेल त्यांच्या वर प्रसन्न होऊन त्यांना समृध्द करते. को जागरती या संस्कृत वचनाचा अर्थ आहे, कोण जागे आहे?
ही जी देवी आहे, ती लक्ष्मी देवी आहे अशा आख्यायिका वामन पुराण तसेच वात्सायन आदी ग्रंथांमध्ये आढळतात. या पोर्णिमेस विविध नावाने देखील ओळखले जाते. कौमुदी पोर्णिमा, शरद पोर्णिमा तसेच अश्विन पोर्णिमा अशी सर्रास वापरली जाणारी नावे आहेत.
भारताचे वैषिष्ट्य असे आहे की संपुर्ण भारतामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा सण म्हणुन साजरा केला जाणार दिवस आहे. गुजरातेत यास शरद पुनम असे म्हंटले जाते. रास व गरबा खेळुन हा सण तिकडे साजरा करतात. बंगाली लोक याला लोख्खी पुजो असे म्हणतात. लोख्खी म्हणजे लक्ष्मी. उत्तरेत कोजागरहा असे म्हणतात. पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, इतकेच काय तर ईशान्य भारतात देखील हा सण साजरा केला जातो.
ईशान्य भारतात वनवासी जनजातींमध्ये याच रात्री एक विशेष नृत्याविष्कार केला जातो. यास होजागरी नृत्य असे म्हणतात. या सामुहिक नृत्यातुन दोन देवतांची पुजा केली जाते. एक आहे मायलोमा तर दुसरी देवता आहे खोलोमा. मायलोमा भार पिकाची देवता तर खोलोमा कपाशीच्या पिकाची देवता.
संपुर्ण भारतात अशा प्रकारे हा सण साजरा करण्यामध्ये आपल्या पुर्वजांची काही विशेष योजना होती का?
कोण जागे आहे? असे देवी विचारते तेव्हा, तिचा कृपाप्रसाद मिळावा म्हणुन आपण ही जागे राहावयास हवे, अशी जनधारणा संपुर्ण राष्ट्रात कशी काय विकसीत केली असेल?
या सणाचे मुळ भारताच्या कृषिआधारीत संस्कृतीमध्ये आहे. विविध प्रांतांमध्ये शेतातुन नुकतेच्या घरी आलेल्या धनधान्यांच्या राशींच्या सात्विक आगमनाचा व आनंदाचा हा सण आहे. व देशभरात तितक्याच उत्साहात पुर्वी साजरा केला जायचा.
आपल्या कोकणात तर या पोर्णिमेस नवान्न पोर्णिमा असे ही म्हणतात. नवान्न म्हणजे नवीन म्हणजेच नुकतेच शेतातुन घरी आणलेले धनधान्य. या रात्री याच नवीन धनधान्याची, दुधातुन खीर तयार करुन तिचा नैवेद्य देवीस, इंद्रदेवास, तसेच खुद्द धनधान्यास देखील दाखवला जायचा. काही ठिकाणी कोकणात ही प्रथा अजुनही तग धरुन आहे. यातील देवी ख-या अर्थाने ही भुमाताच आहे.
मला वाटते की देवी ने वर्षभर सर्वांना हा प्रश्न विचारलेला असतोच. व या रात्री, देवी प्रत्यक्ष प्रसन्न होत असते. ज्यांनी सजग, सतर्कतेने पणे वर्षभर काम केले आहे, ज्यांनी शेतीची योग्य ती काळजी घेऊन नियोजन करुन शेत पिकवलेले असते ते जागे असतात. व या रात्री देवी प्रत्यक्ष फळ देऊन तिच्या या पुत्र-पुत्रींस आशिर्वाद देत असते.
त्यामुळे नुसते या रात्रीच जागे म्हणजे सतर्क राहणे हा या सणाचा हेतु नसुन सदैव सतर्क असणे, सदैव समाजास सजग ठेवणे या साठीच अशा प्रकारच्या सणाचे नियोजन आपल्या पुर्वजांनी केले असावे.
तुम्हा सर्वांना कोजागरीच्या तसेच नुसती आजची रात्रच नाही तर सदैव सतर्क, सजग राहण्यासाठी खुप शुभेच्छा!
हेमंत सिताराम ववले,
निसर्गशाळा, पुणे
(टिप- या लेखाचा उत्तरार्ध पुढील काही दिवसात येईल)

No comments:

Post a Comment