Friday, February 24, 2017

वणवा म्हणजे आपलेच नुकसान


ही भुमाता जिच्या पोटी आपण जन्म घेतला, तिची मनुष्याव्यतिरिक्त ही अनेक संताने आहेत. की जे आपले बांधव आहेत. म्हणजे वृक्ष, वेली, प्राणी,सरपटणारे प्राणी, किडे, मुंग्या, असे असंख्य जीव या भुमातेच्या अंगा खांद्यावर खेळत, बागडत असतात. त्याचप्बरोबर हे असंख्य जीव आपले निसर्गचक्र नीट राखण्याचे काम ही माणसापेक्षा जास्त चांगल्या पध्दतीने करीत असतात. मग माणुस का निसर्गचक्रामध्ये हस्तक्षेप करीत आहे?. डोंगराला आग लावल्यामुळे आपण आपल्याच पायावर कु-हाड मारीत आहोत. 
दरवर्षीच्या पावसाळ्यात उगवलेली लाखो रोपे माणसाच्या वणवा लावण्याच्या अविचारामुळे होरपळुन मरतात. परीणामी झाडाची संख्या वाढत नाही, हिरवे छत्र लुप्त होत आहे. 
दरवर्षी काही पर्यावरण प्रेमी मंडळी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतात. पण ह्या वणव्यामुळे जेवढी झाडे लावली जातात त्याच्यापेक्षा हजारपट जास्त झाडे मरतात. निसर्ग स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे, माणसाने फक्त वणवा लावण्यासारख्या गोष्टींपासुन स्वतःला परावृत्त करणे गरजेचे आहे.


आग लावणा-या माणसांकडे फेसबुक नसते, व्हॉट्सऍप नसते, ऍम्ड्रॉईड फोन नसतो, त्यामुळे तुमच्या माझ्या सारख्यांचे (म्हणजेच हा संदेश वाचणा-यांचे) काम आहे की आपाअपल्या गावात अशा प्रत्येक व्यक्ति पर्यत हा संदेश तोंडी पोहोचवावा, शेतकरी, गुराखी,कातकरी,आदी लोकांना याबाबत जागरुक करणे गरचे आहे. कारण ते लोक आपल्या पेक्षा जास्त जवळ असतात निसर्गाच्या, निसर्गाच्या कुशीत असतात, त्यामुळे जसे वृक्ष वेली, प्राणीमात्राम्चे सर्वाधिक नुकसान होते, तसेच शेतकरी, गुराखी, आदीवासी बांधवांचे देखील खुप नुकसान होते, व संपुर्ण पर्यावरणाचे होणारे नुकसान तर सगळ्या चराचर, प्राणीमात्रांना , इकोसिस्टमला भोगावे लागते आहे.

वणव्याविषयी एक गैरसमज आहे. तो काय आहे  व त्यांच्याविषयी सत्य माहीती जाणुन घेऊयात.

वणवा लावल्यामुळे पुढच्या वर्षी गवत चांगले येते - मुळात वणवा लावल्यामुळे जमीनीची सर्वाधिक धुप होती. गवत जळुन गेल्याने, त्या गवताच्या मुळांनी माती धरुन ठेवलेली मोकळी होते. तसेच पहील्या पावसात ही माती वाहुन जाते. म्हणुन आपणास पहील्या पावसात डोंगरद-यांतुन वाहणारे पाणी गढुळ असल्याचे दिसते. याचाच आणखी एक दुष्परीणाम असाही होतो आहे की काही वर्षांनी आपली सर्वच्या सर्व धरणे निम्मी मातीने व निम्मी पाण्याने भरतील. पाणी साठा कमी होईल, परीणामी नागरी लोकसंख्येला पर्यायाने धरणक्षेत्रातील लोकांना अधिक भुरदंड पडेल. कारण पाणी कमी पडले की आणखी जास्त धरणांची आवश्यकता निर्माण होईल व पर्यायाने नवीन धरणे पावसाच्या क्षेत्रातच बांधली जातील व तेथील लोकांस(वेल्हा, मुळशी, मावळ, भोर) संसार पाठीवर लावुन दुस-या भागात धरणग्रस्त म्हणुन जावे लागेल.

जर आपण वणवा लावण्याचे थांबवु शकलो, तर त्याचे फायदे खालील प्रमाणे होतील
१. पावसाचे प्रमाण वाढेल
२. पावसाची अनिश्चितता कमी होईल
३. झाडे झुडपे वाढल्याने, पावसाचे पाणी जमीनीत खोलवर मुरेल व त्यामुळे तुमच्या विहीरी, बोअरवेल ला पाण्याची कमतरता होणार नाही.
४. वनौषधी ची वाढ देखील होईल. आपल्या भागात, हिरडा, गेळा, बेहडा, आवळा, कुडा,कढीपत्ता, शिकेकाई, रिठा, वावडींगी आणखीही अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्या या डोंगरद-यात अमाप प्रमाणात वाढायच्या पुर्वी पण वणवा लावण्याच्या अविचाराने यातील कित्येक वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या वनस्पती म्हणजे आपल्या येथील लोकांस अर्थार्जनाचे एक वरदानच निसर्गाअने दिले आहे. आपण करंटे त्याला वणवा पेटवुन हे वरदानच झिडकारतो.
५. वनफळे व भाज्या -  करवंदा पासुन मे महीनाभर दररोज किमान ३०० ते ४०० रुपये आपल्याकडील स्त्रिया कमावताना आपण मागच्या वर्षीच पाहीले.(शेणवड/बालवडच्या महीला). विचार करा, जर वणवा पेटला नाही व करवंदीच्या नव नवीन जाळ्या तयार झाल्या तर येत्या काही वर्षात , करवंद हा एक संघटीत व्यवसाय या रुपाने नावारुपास येईल. आळु, तोरण , फणस, जांभळं यांचे पर्यायही आहेत आपल्याकडे.
वनभाज्या ..म्हणजे निसर्गाने आपल्याला दिलेली पार्टीच जणु...शेंडवेल, मुरुट आणखी ब-याच वन भाज्या आपणास जंगलात मिळतात. पण मित्रांनो जरा आपल्या आजी आजोबांस विचारुन पाहा बरे, की या भाज्यांचे प्रमाण पुर्वी किती होते व आता किती आहे? व या सा-यास कारणीभुत आहे हा वणवा..
६. वन-आधारीत अर्थव्यवस्था - लाकुड, गवत,फळे, औषधे, स्वतपुरती निसर्गाने घेणे ठिक आहे. पण योग्य नियोजन करुन यातुन एक पर्यायी व्यपार उदीम देखील उभा राहु शकेल.
७. पर्यटन वाढ - जरा विचार करा, सध्या, मढे घाट, लिंगाणा इत्यादी ठिकाणे शहरातील लोकाम्साठी आकर्षण आहे. पण ते केवळ पावसाळ्यात. जर आपण आपला परीसर हिरवागार करु शकलो, वनराई बहरु देऊ शकलो, तर बारा महीने , तेरा काळ चालेल असा पर्यटन व्यवसाय देखील वाढेल. शहरात ड्रायव्हर, आचारी, वेटर अशी कामे करण्यापेक्षा आपण आपल्याच भागात उद्योग व्यवसाय करु शकता. 

मित्रांनो, वणवा थांबवण्यात जर आपण यशस्वी झालो तर आपण स्तःतसोबतच निसर्गाचे देखील कल्याण करण्यात यशस्वी होऊ.

हेमंत ववले.

Sunday, February 19, 2017

काय महाराज सुफी पंथांचे होते?

जास्तीत जास्त लोकांपर्यन्त शेयर करा व शेवटी दिलेल्या लिंक वर जाऊन या लेखास "१" म्हणजे "एक" असे रेटींग देऊन आपापली नाराजी नोंदवा.

आज सकाळ वर्तमान पत्रातील सप्तरंग या पुरवणीमध्ये छापलेल्या भोकाटेच्या लेखास माझी प्रतिक्रिया...

काय महाराज सुफी पंथांचे होते?
भोकाटे पिसाळलाय आणि सकाळ वाले सुध्दा पिसाळले आहेत.

सकाळ समुहा सारख्या प्रतिष्टीत व निष्पक्ष माध्यमाने अशा प्रकारच्या लेखास प्रसिध्द करणे "सकाळ" च्या प्रतिमेस धक्का आहे. लेखक एकीकडे म्हणतो आहे की महाराजांनी सर्व जातीधर्मातील लोकांना सामावुन घेतले व या म्हणण्यास आधार देण्यासाठी काही उदाहरणे देखील दिली आहेत. ही उदाहरणे देताना लेखकाने त्या त्या जातीच उल्लेख न विसरता केला आहे. मुळात जात पाहुन कुणाची नेमणुक केली असेल असे म्हणने महाराजांचा एक प्रकारे केलेला अपमानच आहे. महाराज जात व्यवस्थेला थारा देत नव्हते तर मग जात पाहुन त्यांनी नेमणुका केल्या असतील असे मानणे व सकाळ सारख्या प्रगल्भ वृत्तपत्राने असा सुमास लेख प्रसिध्द करावा हे हास्यास्पदच आहे. "व्यक्तिच्या गुणवत्तेच्या आधारावर महाराजांनी नेमणुका केल्या" हे सर्वात महत्वाचे आहे. व अधोरेखीत करणे आवश्यक आहे.
पुढे .... दौलत खान, इब्राहिम खान आदींचा जो उल्लेख लेखकाने केला आहे, तो अर्धवट आहे. हे लोक स्वराज्य निर्मीतीचे ध्येय घेऊन महाराजांसोबत आलेले नव्हते. नंतरच्या काळात ह्या लोकांनी स्वराज्याच्या गनिमांना सामील होऊन साथ दिल्याचे पुरावे उपलब्ध आहेत.
जातीच्या नावांचा उल्लेख करताना लेखक "ब्राम्हण" जातीचा उल्लेख करण्याचे टाळतो हा देखील पक्षपातच आहे. "जानवे" शब्दाचा अर्थ प्रतिष्टा असा घेताना जाणीवपुर्वक तेथेही ब्राम्हण जातीचा उल्लेख टाळतो. स्वराज्याच्या यज्ञात सर्व समाजाचे योगदान होते मग काय ब्राम्हण समाजाचे काहीच योगदान नव्हते?
पुढे जाऊन लेखक असे अकले चे तारे तोडतो की महाराज सुफी पंथ मानणारे होते. उद्या म्हणतील महाराज मुस्लीम होते. व अरबस्थानात शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे व महाराजांचे पुर्वज देखील अरबस्थानातुनच आल्याचे पुरावे ही देतील.
माझे म्हणने आहे की महाराजच काय तर यच्चयावत हिंदु समाज सहिष्णु असल्याने आपणास पर-पंथाविषयी आदर नेहमी आहेच. शिवरायांना देखील होता. पण फक्त तेवढीच गोष्ट अधोरेखीत करुन लिहिणे म्हणजे पुनश्च पक्षपात आहे. महाराजांनी सनातन वैदीक पध्दतीने राज्याभिषेक करवुन घेतला. त्याच्या मोहीमा दस-याच्या (सीमोल्लंघन) मुहुर्तावर म्हणजेच वैदीक परंपरेला साजेशा निघत. रामायण महाभारत वाचुन महाराजांचे शिक्षण झाले. लिहिण्यासारखे खुप काही आहे. महाराजांनी सुल्तानी आणि अस्मानी अशा दोन्ही संकटांपासुन येथील प्रजेला संरक्षण देऊन , मग्रुर, धर्मांध,अत्याचारी, बलात्कारी, चारीत्र्यहीन अशा हिंदुस्थानात ज्याकाळी चहु दिशांना इस्लामी राजे, बादशाह व राज्ये होती व हिन्दु केवळ गुलाम होते, अशा वेळी "एक हिन्दु राजा होऊ शकतो" व राज्य ही करु शकतो हे महाराजांनी सिध्द करुन दाखवले.
त्यामुले अधोरेखीत काही करायचे असेल तर "महाराज एक अभिषिक्त हिन्दु राजे होते" हे वाक्य अधोरेखीत करा.
मुळात मावळ्या-मराठ्यांचे जाती-जातीत विभाजन करणारे असे लेखन समाजासाठी घातक आहे. त्यातही समाजमनातुन जाणीवपुर्वक विशिष्ट जातीला विस्मरणात ढकलण्याचे मोठ्या षडयंत्रामध्ये लेखकासोबतच "सकाळ माध्यम समुह" देखील सामील आहे असा दर्प या लेखातुन व त्याच्या सकाळ मधील प्रसिध्दीतुन येत आहे.

http://beta1.esakal.com/saptarang/chatrapati-shivaji-maharaj-jayanti-31165

Saturday, February 18, 2017

मत कोणाला द्यायचे?

मत कोणाला द्यायचे?



निवडणुकांची रणधुमाळी गर्जते आहे गेले अनेक दिवस. उद्या प्रचाराची सांगता होईल. मग हे सगळे भोंगे, पॅंपलेट बॅनर्स होर्डींग लावणे बंद.
उमेदवारांनी स्वतस अधिक मते मिळावी यासाठी जो प्रचार केला त्या प्रचाराचे परीणाम खरच का मतदाराच्या निर्णय प्रक्रियेवर होईल?
प्रत्येक उमेदवाराचे पत्रक घरात येऊन पडले. प्रत्येक उमेदवाराचे भोंगा असलेले वाहन घराजवळुन गेले. अनेक उमेदवारांचे समर्थक सोशल मीडीया वर भरभरुन पोस्ट टाकीत आहेत. अनेक उमेदवारांचे मेसेज  ही आले मोबाईल वर. या सर्वातुन एक ॲनालॉगी सुचली...

बाजारात एकाच प्रकारचे पण अनेक उत्पादकांनी बनवलेले उत्पादन विक्री साठी आहे. ह्या उत्पादनाची जाहीरात गेले बरेच दिवस जोमात सुरु आहे. बर, जाहीरात का करावी लागते हे सर्वांना ठाउक असेलच. आपापले उत्पादनाची माहीती जास्तीत जास्त ग्राहकांपर्यन्त पोहोचवणे, जेणे करुन हे उत्पादन कसे दिसते?, त्याचे फायदे काय? ते अन्य उत्पादनांपेक्षा(प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा) कसे सरस आहे? किमंत कशी कमी आहे? वगैरे वगैरे.. 
ग्राहकापुढे अशा प्रकारे प्रत्येक उत्पादनाची माहीती असते. ग्राहक तुलना करु शकतो. जाहीरातीचे काम एवढेच होते की उत्पादन विषयी माहीती जसे आहे तसे (शक्यतोखोटी कोण देत नाही) जास्तीत जास्त लोकांपर्यन्त पोहोचवणे.
मग ग्राहक स्वतच्या बुध्दीमत्तेचा वापर करुन  निर्णय घेतो. हा निर्णय घेताना तो अनेक गोष्टी पाहतो जसे
१. उत्पादन काय आहे?
२. उत्पादनाची श्रेणी काय आहे?
३. उत्पादनाचा उत्पादक कोण आहे?
४. उत्पादन स्थानिक पातळीवर निर्मित आहे का?
५. उत्पादनात कच्चा माल काय काय वापरला आहे?
६. उत्पादनाची एक्सापायरी तारीख काय आहे?
७. लेबल लिहिले आहे, तेवढेच वजन  आहे की नाही?
८. हेच उत्पादन पुर्वी कधी वापरले आहे का?
९. पुर्वी वापरले असेल तर पुर्वीचा अनुभव कसा होता?
१०. त्याच उत्पादकाचे आणखी एखादे उत्पादन आपण पुर्वी वापरलेआहे का? असल्यास जाहीरात व प्रत्यक्ष सेवा यामध्ये फरक अनुभवास आला का?
११. सगळीच उत्पादने सुमार दर्जाची असतील तर काय ब्रॅंड पाहुन ठरविता येईल का?

तर आता वरील यादी मध्ये 
उत्पादन ऐवजी उमेदवार हा शब्द टाका..
उत्पादक ऐवजी राजकीय पक्ष किंवा विद्यमान उमेदवाराचा पती किंवा पत्नी असे वाचा.
म्हणजेच काय तर या झालेया प्रचारातुन खरच का मतदाराला वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत?

काही निकष पाहु आता..

गुणवत्ता हीन पण पैशेवाले उमेदवार 

कुणी जर आपणास म्हणेल की अरे माझी वस्तु घे , मी तुला वरुन पैसे ही देतो. मटण दारु पार्टी ही देतो.
तर याचा अर्थ काय की आज वस्तु फुकट मिळणार, वरुन पैसे, पार्टी मिलणार...पण निकृष्ट दर्जाची वस्तु खाल्ल्याने मी आजारी पडुन त्याच विक्रेत्याचा भाऊ असलेल्या डॉक्टरकडे जाऊन पैसे घालवील.व  आरोग्य ही गमावेल.
त्यामुळे मित्रहो, पार्ट्या-पैसे देऊ करणा-या (ब-याच जणांनी पार्ट्या खाल्ल्या ही असतील )उमेदवारांना मत देऊ नका. कारण आज हे पैसे खर्च करताहेत तर उद्या निवडुण आल्यावर आपल्यालाच लुटतील.

स्त्री उमेदवार ? की नव-याच्या राजकीय महत्वकांक्षेचे बाहुले?

आणखी एक गंभीर प्रश्न या निवडनुकीच्या निमित्ताने समोर आला..तो म्हणजे सर्व अपेक्षित उमेदवारांच्या पत्न्या, ह्या आरक्षण पडल्यावर रातोरात कशा काय योग्य उमेदवार झाल्या? ज्या स्त्री उमेदवार फक्त आणि फक्त नवरोबांच्या नावावर किंवा नवरोबाच्या अहंकारापोटी रिंगणात उतरल्या आहेत (नव्हे त्यांना त्यांच्या नवरोबांनी वापरुन घेतले आहे), अशा स्त्री उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेबद्दल अभ्यास केल्याशिवाय मत देउ नका.

उमेदवार स्थानिक आहे का?

स्थानिकच का असावा? म्हणजे काय तर, उमेदवार राहतो पुण्यात, त्याची पोर शाळा शिकत्यात पुण्यातल्या एखाद्या इंग्लिश मीडीयम शाळेत, त्याचे वयस्कर आई वडील इलाज घेतात खासगी इस्पितळात, अवस-पुनव ला भारीतल्या कार ने गावाला आल्यवर त्याला गावाकडच्या रस्त्यांची दुरवस्था कशी कळेल बरे? गावाकडे वीज, पाणी याची काय अवस्था आहे हे शहरात राहणा-या उमेदवारास कसे कळेल? गावातील शाळांमध्ये काय प्रश्न आहेत हे ज्याची मुले खासजी शाळांत शिकतात त्या उमेदवारास कसे बरे कळेल?
कसे कळेल? असे म्हणताना मला हे सांगायचे आहे की, जनसामान्यांना ज्या सोई सुविधा आहेत, त्यांचाच उपभोग घेत, असणारास समस्यांविषयी लवकर समजेल.

उमेदवाराचे अर्थार्जनाची साधने काय आहेत?

काय उमेदवाराचे दारु चे बीयरचे (अधिकृत का असेना) दुकान आहे? किंवा होते काय? काय त्याचे परमिट रुम आहे? काय उमेदवार अरेरावी, हफ्तेखोरी अशा प्रकारे पैसे कमावतो? काय उमेदवारास वडीलोपार्जित भरपुर संपत्ती मिळालेली आहे? काय उमेदवाराने जमीनी खरीदी विक्री करुन पैसा कमावला आहे? 
जर चुकुन ही असा उमेदवार निवडुन येत असेल तर नतभ्रष्ट तो उमेदवार नाही तर नतभ्रष्ट व नैतिकता हरवलेले आपण असु , हे लक्षात ठेवा. 

उमेदवार नातेवाईक आहे का?

असु द्या मित्रांनो. कर्तबगार व योग्य उमेदवार असेल व तो तुमचा नातेवाईक, भावकीतला असेल तर करा मतदान त्याला/तिला.
पण मतदान करताना उमेदवार माझ्या भावकीतला आहे, नातेवाईक आहे या एकाच निकषावर मतदान करु नका. 

उमेदवाराचे शिक्षण काय आहे?

मुलभुत प्रश्न हा नाही. त्या ही पेक्षा आपण प्रश्न असा विचारला पाहीजे की, उमेदवाराचे जे काही शिक्षण आहे, त्या शिक्षणाचा उपयोग उमेदवाराने  स्वतच्या आयुष्य बदलण्यासाठी तसेच  समाजासाठी काय केला आहे हे पाहावे.

तुम्ही ज्या उमेदवारास मत देणार तो

१. पोटभरण्यासाठी, कुटुंब चालवण्यासाठी रोज किमान ८ तास काम करतो का? 
(या कामात नोकरी-धंदा-शेती हे अपेक्षित आहे. जमीनी खरेदी विक्री ची दलाली हे काम अथवा धंदा करणारा आधीच "बाद उमेदवार" आहे.)
२. उमेदवाराने प्रचारादरम्यान तुमच्या भागातील समस्यांचे आकलन अभ्यास करुन समस्या समाजासमोर मांडल्या का? व त्या समस्यांचे मुळ शोधण्याचा प्रयत्न करुन त्यावर उपाय योजना काय करता येईल या विषयी काही मुद्दे मांडले का?
३. उमेदवार सभ्य-सुसंस्कृत आहे का ? 
सुशिक्षित असला म्हणजे सुसंस्कृत असतोच असे नाही हे लक्षात असु द्या.
अरेरावी, दादागिरी अशा कुठले प्रसंग उमेदवाराच्या बाबतीत ऐकले असतील तरी अशा प्रसंगाची सत्यता पडताळुन घ्यावी, कसलाही पुर्वग्रह न ठेवता, उमेदवार वरील सर्व निकषांवर(१,२,३ प्रश्नांच्या वरील परीच्छेदातील निकष) खरा उतरतो का? हे पाहावे व मगच मतदान करावे...तर 

सध्यातरी किमान वरील तीन प्रश्नाची उत्तरे जर "हो" असतील तर तुमचा निर्णय योग्य आहे व समाजाच्या हिताचा आहे असे अभिमानपुर्वक समजा.