अष्टावक्र गीता
राजा जनक - चरीत्र दर्शन
रामायण, महाभारत वेदांत आदी ग्रंथांतुन राजा जनकाचा उल्लेख आहेच, तसेच काही पुराणामध्येदेखील राजा जनकाच्या चरीत्राचा उल्लेख आढळतो. बालपणापासुन टिव्ही, सिनेमा आदींतुन आपण जनकास फक्त एकाच व्यक्तिरेखेत पाहीलेले आहे, ते म्हणजे जानकीचा पिता. महादेवी सीता ही जनकाचीच पुत्री आहे व "जनक" या नावावरुनच तिचे नाव जानकी असे ही ठेवले गेले. २० वर्षापुर्वी ज्यांनी महाभारत मालीका टिव्हीवर पाहीली असेल त्यांना जर आठवत असेल तर त्यात दाखवलेला जनक एक हतबल "पिता" आहे असेच आपण आजपर्यंत मानतो आहोत. मालिका व सिनेमे भारतीय महापुरुषांच्या जीवन चरीत्रांना कधीच न्याय देऊ शकणार नाहीत. याला कारण ही तसेच आहे. एका व्यक्तिरेखेवर आपण लक्ष केंद्रीत करावयास गेलो तर त्या व्यक्तिरेखेच्या अनुशंगाने शेकडो व्यक्तिरेखा दृष्टीगोचर होतात. त्यामुळे दुरदर्शन वरील रामानंद सागर यांची मालिका म्हणजे "मर्यादापुरुषोत्तम श्रीराम" या एका व्यक्तिरेखेवर लक्ष केंद्रीत करुन तयार केलेली असल्याने, त्यात इतर पात्रांना तितकास न्याय देता आलेला नाही. असो.
जनक राजाचे वर्णन करताना उपरोक्त ग्रंथ त्याचा उल्लेख करताना अनेकविध विशेषणे वापरतात.
उदा - विदेही. म्हणजे ज्यास देह अहंकारापासुन सुटका प्राप्त असा तो म्हणजे विदेही. खरतर अध्यात्मात या स्तरापर्यंत पोहोचणे म्हणजे खुप मोठी उपलब्धी मानली जाती. देहाभिमान विसरला असा "वि"देही. जो "देह" नाही असा विदेही. अद्वैत मता मध्ये द्वैत नसतेच. जनकास अद्वैत मताचा उपदेश अष्टावक्र मुनिकडुन झाला, पण जनकास "विदेही" हे विशेषन मात्र अष्टावक्र मुनिंची भेट होण्या आधीपासुनच लावले गेले आहे. सामान्य साधकास देहाभिमान, देहाहंकारापासुन सुटका करुन घेणे त्या अर्थाने सोपे आहे कारण त्याच्या मागे व्याप कमी असतात. पण एक प्रजाहित दक्ष राजा व तो देखील विदेही? हे समीकरण थोडे अजबच वाटते. असेच आश्चर्य व्यासपुत्र मुनि शुकास देखील वाटले व कुतुहलापोटी मेरु पर्वतापासुन म्हणजे त्याच्या निवासापासुन सलग तीन वर्षे पायी भ्रमण करीत मिथिला देशी पोहोचला होता. शुक आणि जनक हा देखील एक अभ्यासाचा स्वतंत्र विषय आहे. पुन्हा कधी तरी या विषयावर आपण चिंतन करुयात. तर एका राज्याचा कारभार पाहणारा एक व्यक्ति देखील "देहातीत" अवस्थेस पोहोचु शकतो. व हे केवळ भारतातच घडु शकते. बर त्याचे राज्य नुसते येरेगबाळे राज्य नव्हते, तर तेथील प्रजा अत्यंत सुखी व ज्ञानी देखील होती. रोजगार, रस्ते, पाणीव्यवस्थापन, संरक्षण, पर्यावरण आदी सर्वच अंगांनी राज्याची प्रगती इतकी झालेली की हजारो कोस दुरुन चिकित्सक(उदा -शुक मुनि) राज्य शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इथे येत. तर अशा राज्याचा राजा अध्यात्मात देखील प्रचंड गतिमान होता. इथे आवर्जुन एक उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे तथागत भगवान बुध्द देवांचा. भारतीय संस्कृतीने दिलेल्या अनगणित अनमोल नररत्नांपैकी ही दोन रत्ने आहेत. एकाने राजविलास, राजवैभव या सर्वांचा त्याग करुन सलग सहा वर्षे तप करुन , गरजा कमी करुन , कमी अन्न, कमी पाणी, कमी बोलण, तपाच्या शेवटी शेवटीतर बोलणे बंदच, आदी प्रकारे तप करुन "विदेहावस्था" प्राप्त केली. म्हणजे शरीर म्हणजे मी नाही असा साक्षात्कार होणे, अनुभव होणे म्हणजेच विदेहावस्था होय. तर दुसरीकडे राजा जनक आहे, ज्याने राजपाट सांभाळता सांभाळता विदेहावस्थेस प्राप्त झाला. त्याने राजकारभार देखील केला व नुसताच केला नाही तर तो आदर्श केला व परमार्थ ही केला व तो देखील आदर्शच केला.
असो.
जिज्ञासुंनी जनकाचे चरीत्राचे अनुशीलन आणखी ही भिन्न प्रकारे करावे. अनेकविध पैलुंनी युक्त असा हा राजा अलौकिक होता. राजा असुनही योगी होता. राजा असुनही भक्त होता. राजा असुनही तर्कपंडीत होता. राजा असुनही कुशल योध्दा व परम प्रतापी होता. त्याच्या जीवनप्रवासात तो टप्प्याटप्प्याने उर्ध्वगामी गतीस प्राप्त होत होता.
त्यामुळेच भगवान श्रीकृष्णाच्या भगवदगीतेत ज्याप्रमाणे गुरु-शिष्य प्रश्नोत्तरे पाहायला मिळतात त्याप्रमाणे अष्टावक्रगीतेत प्रश्नोत्तरे नाहीत. अष्टावक्र गीतेत "संवाद" पाहावयास मिळतो. दोन अत्यंत बुध्दीमान, अधिकारी पुरुषांचा संवाद अष्टावक्र गीतेत अनुभवास येतो. अष्टावक्र गीता अद्वैत मतातील एक महान ग्रंथ आहे, मग त्या ग्रंथात वर्णन केलेला अद्वैतवाद या दोन व्यक्तिंच्या संवादात झळकणार नाही तरच नवल. इथे गुरु-शिष्य असे द्वैत नाही, हीच या अष्टावक्र गीतेची खुप मोठी उपलब्धी आहे.
टिप - अजुन ही इथे प्रत्यक्ष अष्टावक्र गीतेतील श्लोकांचा अर्थ , त्यावर विश्लेषण करण्याचे मी जाणीवपुर्वक टाळले आहे. जिज्ञासुंनी मुळातुनच या महान ग्रंथाचा अभ्यास करावा यासाठी असे केले आहे. परंतु, जर अष्टावक्र व जनक यांच्या चरीत्राचा अभ्यास असेल तर या गीतोपनिषदात शब्दबध्द केलेला "अद्वैतवाद" समजण्यास सुलभ होईल , अशा कारणाने त्रोटक रुपात जनकाच्या चरीत्राचा व त्याच्या व्यासंगाचा उल्लेख इथे केला आहे.
हेमंत सिताराम ववले.