Tuesday, November 15, 2016

आम्ही सुध्दा हिन्दुच आहोत..


स्मशाणात स्मशाण शांतता होती. मुख्य स्मशान मंडपाच्या बाहेर असलेल्यांमध्ये थोडी कुजबुज सुरु होती. मांमाच्या मुलाने उलटा हात करुन बोंब मारली. आणि  अंतविधीच्या जळणा-या सरणाशेजारीच उभ्या उभ्या एक जण बोलु लागला. मरणाच्या वाटेवर देखील लोक बोलतात हे माहीत होते व असे बोलणे ऐकण्याची व बोलणा-याची किव येते नेहमीच. पण आज हा जो माणुस बोलु लागला तस तसे कान अधिक सतर्क होत गेले व त्याचा शब्दनशब्द झेलण्याचा प्रयत्न करु लागले. वक्त्याने मामांविषयी बरीच माहीती सांगितली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय केले, किती त्याग केला, कशाप्रकारे "ह्या एकाम्ड्या शिलेदाराने" संघाचे काम तालुक्यात रुजवले व चांगली पीढी हाताशी येईपर्यंत ते टिकवले...सोबतच आणीवाणीच्या काळात कशापकारे मारुतराव वाल्हेकरांच्या ऐवजी "मला अटक करा" म्हणुन १९ महीने तुरुंगवास भोगला हे देखील या वक्त्याने सांगितले. पुढे तो जे बोलला ते मात्र अनपेक्षित व संघ कार्याची महत्ता, गौरव एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवणारे होते. शब्दशः नाही पण सार पुढील प्रमाणे आहे..ते असे , "आम्ही मुसलमान असलो तरीही आधी आम्ही हिन्दु आहोत, व मामांनी आम्हाला आमच्या हिन्दुत्वाची जाणीव करुन दिली"...  हा जो वक्ता होता त्याचे नाव त्याने सांगितले ते असे " मुनीरभाई मुलाणी"..
स्मशानभुमीतील अंत्यविधीच्या वेळी एका निष्टावंत संघकार्यकर्त्याच्या शोकसभेची सुरुवात मुनीरभाईंच्या भाषणाने झाली होती. मुनीर भाईंनंतर देखील बरेच वक्ते बोलले. सगळ्यांनी आपापल्या परीने मामांच्या जीवनाचा, आदर्शाचा गौरव केला, शेवटी संघाचे प्रांत प्रचारक अतुल लिमये हे देखील बोलले. पण बाकी कोण काय बोलले याकडे लक्ष गेलेच नाही, कारण मुनीरभाईंनी उच्चारलेले "आम्ही हिन्दुच आहो"  हे वाक्यच सतत घुमत राहीले.
अगदी घरी, नंतर ऑफीस, रात्री झोपेपर्यंत तेच वाक्य तेच शब्द..आणि प्रश्न की मामांनी हे कसे काय साधले?

श्री गुरुजींचे "विचारधन" म्हणजे संघाची वैचारीक बैठक म्हणता येईल. किंबहुना संघाची विचारधारा गुरुजींनी त्यांच्याकाळात शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला तो या पुस्तकात. कालानुरुप संघसरीता वाहतेच आहे. सोबत अनेक चांगल्या गोष्टी घेत व कालबाह्य, अतार्कीक सोडुन देत, संघ अविरत कार्यरत आहे. कदाचित आता जर कुणी संघाची फिलोसॉफी लिहिण्यास सुरुवात केली तर "विचारधन" पेक्षा अनेक जास्त मुद्दे जे सामाजिक जीवनाच्या एकात्म विकासासाठी आवश्यक आहेत असे लिहिले जातील. म्हणजेच काय तर संघ परीवर्तनशील आहे व उत्क्रांतवादी आहे, काळानुरुप बदलास सदैव तत्पर आहे. असे असले तरी संघाचे मुळ कार्य , ध्येय, उद्दीष्ट जर कोणते असेल तर आहे, कार्यकर्ता घडवणे. व संघाने हे काम स्थापने पासुन अविरतपणे केले आहे. यात बदल नाही झाला व होणार देखील नाही. हिन्दुराष्ट्रवाद म्हणजे काय हे आजकाल च्या तथाकथित "रॅशनल" म्हणवुन घेणा-या पीढीला(त्यातही जन्माने हिन्दु असणा-यांना देखील) मोठे मोठे लेख, पुस्तके, लेक्चर्स देऊन समजणार नाही. स्वतःला हिन्दु म्हणवुन घेणे म्हणजे प्र्तिगामी वाटावे इतपत हिन्दुत्वाची लाज आजकाल तरुणांना वाटते. पण मामांनी जवळ जवळ ५० वर्षापुर्वी कोणत्या निष्टेने स्वतःस संघकार्यास वाहुन घेतले असेल की जेणे करुन "हिन्दुराष्ट्रवाद" ते एका मुसलमानास समजावु सांगु शकले.
मी मामांना १८ वर्षांपासुन ओळखतो आहे. वेगवेगळ्या वर्गांत, शिबिरांत मामा नेहमी उपस्थित असायचे. पण मामांनी कधी भाषण केलेले मला आठवत नाही. हो गप्पा खुप मारायचे. मागच्या एक दोन वर्षात मामांची गाठ घेता आली नाही. पुर्वी पौड ला गेलो की आवर्जुन मामांना भेटायला त्यांच्या घरी जाणे ठरलेलेच. मामांप्रमाणेच घरचे बाकी सदस्य देखील मायाळु व अगत्याने पाहुणचार करणारे आहेत. मामा नेहमीच्या त्यांच्या जागी काहीतरी लिहित असायचे किंवा काहीतरी कारीगरीचे काम करीत असायचे. मामांना मोडी लिपीचे ज्ञान होते, त्यामुळे दुरदुरुन लोक जुने कागदपत्र घेऊन त्यांचे कडे येत मराठीत भांषांतरासाठी. मामा देव सुध्दा बनवीत. देवाचे टाक मांमांच्या इतके सुबक, रेखीव तालुक्यात अन्य कुणीच बनवीत नाही. माझ्या घरचे टाक देखील मामांनीच बनवले आहेत. तर मामांकडे गेले की एकीकडे हातातील काम न थांबवता ते आल्या गेलेल्यांशी मनमोकळे पणाने गप्पा मारीत. मी अनेकदा गेलोय त्यांच्याकडे, पण त्यांनी कधी "संघाचे काम कर" असा उपदेश केला नाही. संघाचे काम ईश्वरी काम आहे असे त्यांना भेटुन, त्यांना पाहुन नेहमीच वाटले.

स्वच्छ वैयक्तिक जीवन, पारदर्शी सामाजिक जीवन, सत्य ,अस्तेय,  अपरीग्रह असे अनेक पैलु त्यांच्या व्यक्तित्वाचा अतुट भाग होते. "इदं न मम" या भावनेने जे जे अर्जित केले ते ते "राष्ट्राय स्वाहा" कसे करावे याचे उदाहरण म्हणजे आमचे कैलासवासी मामा शेरेकर. याच सदगुणाच्या जोडीने माझ्यासारख्या अनेकांवर कायमचा राष्ट्रभक्तीचा संस्कार करणारे मामा शेरेकर एका मुसलमान माणसास देखील भावतात हे सर्वात मोठे आश्चर्य. नुसतेच भावलेले नाही मामा, तर संघाचा जो राष्ट्रवाद आहे तो त्यांच्या आयुष्यात जसाच्या तसा अवतरीत झाले, प्रकट झालेला दिसतो. आजकाल जिथ भारतीयांना स्वतःला "हिन्दु" म्हणवुन घेण्याची लाज वाटते आहे, तिथे एका मुस्लीम व्यक्तिने दिवंगत मामांच्या शोकसभेत मामांविषयी व स्वतःया "हिन्दु" असण्याविषयी काढलेल्या उद्गाराने मामांच्या जीवनाचे सार्थक झाले हेच म्हणावेसे वाटते.

स्वतःच्या गुणकर्माने मामांनी नक्कीच परलोकी स्वतसाठी योग्य ती "गती" मिळवली असेलच. त्यामुळे ह्या पुण्यात्म्यासाठी माझ्यासारख्या पामराने प्रार्थना करावी इतका मी मोठा नक्कीच नाही. पण त्यांच्याकडुन , त्यांच्या जीवनाकडुन आमच्या सारख्या अनेकांना हा राष्ट्रभक्तीचा वारसा, प्रेरणा, स्फुर्ती सदोदीत मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

नतमस्तक
हेमंत सिताराम ववले


2 comments: