Tuesday, November 15, 2016

आम्ही सुध्दा हिन्दुच आहोत..


स्मशाणात स्मशाण शांतता होती. मुख्य स्मशान मंडपाच्या बाहेर असलेल्यांमध्ये थोडी कुजबुज सुरु होती. मांमाच्या मुलाने उलटा हात करुन बोंब मारली. आणि  अंतविधीच्या जळणा-या सरणाशेजारीच उभ्या उभ्या एक जण बोलु लागला. मरणाच्या वाटेवर देखील लोक बोलतात हे माहीत होते व असे बोलणे ऐकण्याची व बोलणा-याची किव येते नेहमीच. पण आज हा जो माणुस बोलु लागला तस तसे कान अधिक सतर्क होत गेले व त्याचा शब्दनशब्द झेलण्याचा प्रयत्न करु लागले. वक्त्याने मामांविषयी बरीच माहीती सांगितली. त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय केले, किती त्याग केला, कशाप्रकारे "ह्या एकाम्ड्या शिलेदाराने" संघाचे काम तालुक्यात रुजवले व चांगली पीढी हाताशी येईपर्यंत ते टिकवले...सोबतच आणीवाणीच्या काळात कशापकारे मारुतराव वाल्हेकरांच्या ऐवजी "मला अटक करा" म्हणुन १९ महीने तुरुंगवास भोगला हे देखील या वक्त्याने सांगितले. पुढे तो जे बोलला ते मात्र अनपेक्षित व संघ कार्याची महत्ता, गौरव एका अनोख्या उंचीवर नेऊन ठेवणारे होते. शब्दशः नाही पण सार पुढील प्रमाणे आहे..ते असे , "आम्ही मुसलमान असलो तरीही आधी आम्ही हिन्दु आहोत, व मामांनी आम्हाला आमच्या हिन्दुत्वाची जाणीव करुन दिली"...  हा जो वक्ता होता त्याचे नाव त्याने सांगितले ते असे " मुनीरभाई मुलाणी"..
स्मशानभुमीतील अंत्यविधीच्या वेळी एका निष्टावंत संघकार्यकर्त्याच्या शोकसभेची सुरुवात मुनीरभाईंच्या भाषणाने झाली होती. मुनीर भाईंनंतर देखील बरेच वक्ते बोलले. सगळ्यांनी आपापल्या परीने मामांच्या जीवनाचा, आदर्शाचा गौरव केला, शेवटी संघाचे प्रांत प्रचारक अतुल लिमये हे देखील बोलले. पण बाकी कोण काय बोलले याकडे लक्ष गेलेच नाही, कारण मुनीरभाईंनी उच्चारलेले "आम्ही हिन्दुच आहो"  हे वाक्यच सतत घुमत राहीले.
अगदी घरी, नंतर ऑफीस, रात्री झोपेपर्यंत तेच वाक्य तेच शब्द..आणि प्रश्न की मामांनी हे कसे काय साधले?

श्री गुरुजींचे "विचारधन" म्हणजे संघाची वैचारीक बैठक म्हणता येईल. किंबहुना संघाची विचारधारा गुरुजींनी त्यांच्याकाळात शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला तो या पुस्तकात. कालानुरुप संघसरीता वाहतेच आहे. सोबत अनेक चांगल्या गोष्टी घेत व कालबाह्य, अतार्कीक सोडुन देत, संघ अविरत कार्यरत आहे. कदाचित आता जर कुणी संघाची फिलोसॉफी लिहिण्यास सुरुवात केली तर "विचारधन" पेक्षा अनेक जास्त मुद्दे जे सामाजिक जीवनाच्या एकात्म विकासासाठी आवश्यक आहेत असे लिहिले जातील. म्हणजेच काय तर संघ परीवर्तनशील आहे व उत्क्रांतवादी आहे, काळानुरुप बदलास सदैव तत्पर आहे. असे असले तरी संघाचे मुळ कार्य , ध्येय, उद्दीष्ट जर कोणते असेल तर आहे, कार्यकर्ता घडवणे. व संघाने हे काम स्थापने पासुन अविरतपणे केले आहे. यात बदल नाही झाला व होणार देखील नाही. हिन्दुराष्ट्रवाद म्हणजे काय हे आजकाल च्या तथाकथित "रॅशनल" म्हणवुन घेणा-या पीढीला(त्यातही जन्माने हिन्दु असणा-यांना देखील) मोठे मोठे लेख, पुस्तके, लेक्चर्स देऊन समजणार नाही. स्वतःला हिन्दु म्हणवुन घेणे म्हणजे प्र्तिगामी वाटावे इतपत हिन्दुत्वाची लाज आजकाल तरुणांना वाटते. पण मामांनी जवळ जवळ ५० वर्षापुर्वी कोणत्या निष्टेने स्वतःस संघकार्यास वाहुन घेतले असेल की जेणे करुन "हिन्दुराष्ट्रवाद" ते एका मुसलमानास समजावु सांगु शकले.
मी मामांना १८ वर्षांपासुन ओळखतो आहे. वेगवेगळ्या वर्गांत, शिबिरांत मामा नेहमी उपस्थित असायचे. पण मामांनी कधी भाषण केलेले मला आठवत नाही. हो गप्पा खुप मारायचे. मागच्या एक दोन वर्षात मामांची गाठ घेता आली नाही. पुर्वी पौड ला गेलो की आवर्जुन मामांना भेटायला त्यांच्या घरी जाणे ठरलेलेच. मामांप्रमाणेच घरचे बाकी सदस्य देखील मायाळु व अगत्याने पाहुणचार करणारे आहेत. मामा नेहमीच्या त्यांच्या जागी काहीतरी लिहित असायचे किंवा काहीतरी कारीगरीचे काम करीत असायचे. मामांना मोडी लिपीचे ज्ञान होते, त्यामुळे दुरदुरुन लोक जुने कागदपत्र घेऊन त्यांचे कडे येत मराठीत भांषांतरासाठी. मामा देव सुध्दा बनवीत. देवाचे टाक मांमांच्या इतके सुबक, रेखीव तालुक्यात अन्य कुणीच बनवीत नाही. माझ्या घरचे टाक देखील मामांनीच बनवले आहेत. तर मामांकडे गेले की एकीकडे हातातील काम न थांबवता ते आल्या गेलेल्यांशी मनमोकळे पणाने गप्पा मारीत. मी अनेकदा गेलोय त्यांच्याकडे, पण त्यांनी कधी "संघाचे काम कर" असा उपदेश केला नाही. संघाचे काम ईश्वरी काम आहे असे त्यांना भेटुन, त्यांना पाहुन नेहमीच वाटले.

स्वच्छ वैयक्तिक जीवन, पारदर्शी सामाजिक जीवन, सत्य ,अस्तेय,  अपरीग्रह असे अनेक पैलु त्यांच्या व्यक्तित्वाचा अतुट भाग होते. "इदं न मम" या भावनेने जे जे अर्जित केले ते ते "राष्ट्राय स्वाहा" कसे करावे याचे उदाहरण म्हणजे आमचे कैलासवासी मामा शेरेकर. याच सदगुणाच्या जोडीने माझ्यासारख्या अनेकांवर कायमचा राष्ट्रभक्तीचा संस्कार करणारे मामा शेरेकर एका मुसलमान माणसास देखील भावतात हे सर्वात मोठे आश्चर्य. नुसतेच भावलेले नाही मामा, तर संघाचा जो राष्ट्रवाद आहे तो त्यांच्या आयुष्यात जसाच्या तसा अवतरीत झाले, प्रकट झालेला दिसतो. आजकाल जिथ भारतीयांना स्वतःला "हिन्दु" म्हणवुन घेण्याची लाज वाटते आहे, तिथे एका मुस्लीम व्यक्तिने दिवंगत मामांच्या शोकसभेत मामांविषयी व स्वतःया "हिन्दु" असण्याविषयी काढलेल्या उद्गाराने मामांच्या जीवनाचे सार्थक झाले हेच म्हणावेसे वाटते.

स्वतःच्या गुणकर्माने मामांनी नक्कीच परलोकी स्वतसाठी योग्य ती "गती" मिळवली असेलच. त्यामुळे ह्या पुण्यात्म्यासाठी माझ्यासारख्या पामराने प्रार्थना करावी इतका मी मोठा नक्कीच नाही. पण त्यांच्याकडुन , त्यांच्या जीवनाकडुन आमच्या सारख्या अनेकांना हा राष्ट्रभक्तीचा वारसा, प्रेरणा, स्फुर्ती सदोदीत मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

नतमस्तक
हेमंत सिताराम ववले


Friday, November 11, 2016

हिन्दुत्व पुन्हा एकदा

हिन्दु , हिन्दुत्व पुन्हा एकदा.


नुकत्याच लंडन मध्ये झालेल्या हिन्दु स्वयंसेवक संघाच्या महाशिबिरात, संघाचे सरसंघचालक, मोहन जी भागवत, यांनी केलेल्या विधानाचा विपर्यास करुन, अर्थाची ओढाताण करुन प्रसिध्दी माध्यमांनी चुकीच्या मथळ्याखाली बातम्या दिल्या..त्या पार्श्वभुमीवर, हिन्दु, हिन्दुत्व म्हणजे नेमके काय याचा मागोवा थोडक्यात घेण्याचा हा प्रयत्न. आशा आहे खालील विवेचन वाचुन हिन्दु, हिन्दुत्वा विषयी असलेले गैरसमज दुर होतील..फक्त वाचकाने पुर्वग्रह बाजुला ठेवुन वाचावे हि विनंती...

मुळात हिन्दुत्वाला इतर सांप्रदायांच्या चष्म्यातुन पाहील्यामुळे (म्हणजेच इतर "त्व" शी तुलना केल्यने ) हिन्दुत्वामध्ये दोष दिसत आहेत. व स्वाभाविक ही आहे. कारण कोणत्याही विचारसरणीचा मुळातुन अभ्यास न केल्याने व ऐकीव व पुर्वग्रह दुषित माहीती च्या आधारे हिन्दुत्वा कडे पाहिल्यास हिन्दुत्व म्हणजे "विरोध" असेच वाटते. व असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी हिन्दु म्हणजे काय हे समजले तरच हिन्दुत्व म्हणजे काय हे समजेल. मुळात हिन्दु म्हणजे जो अर्थ संघाला अभिप्रेत आहे तोच सांप्रदायिक नाही. तर हिन्दु हे संबोधन आसेतु हिमाचल पर्यन्त राहणा-या, या भुमीतील थोर पुरुर्षांना राष्ट्रपुरुष मानणा-या, या भुमीस वत्सला "मातृभुमी" मानणा-या, येथील समस्त लोकांचे राष्ट्रीय मानक आहे. राष्ट्रीय मानक म्हणताना मला हे ही स्पष्ट करावे लागेल की राष्ट्र म्हणजे राज्य नव्हे. राष्ट्र हे राज्यांच्या सीमांच्या ही पलीकडे असु शकते, नव्हे आहे. राष्ट्र भावने मुळे "राज्यात" एकात्म भाव निर्माण होतो व सद्भाव वाढीस लागुन लोकांचा , राज्याचा पर्यायाने राष्ट्राचा अभ्युदय होतो. त्यामुळे "हिन्दु" हा शब्द जाती, पंथ वाचक नसुन तो भारतीय उपखंडातील बहुसंख्य नव्हे सर्वच लोकांसाठी वापरलेला भुगोलीय तसेच संस्कृतीवाचक शब्द आहे...या संस्कृतीमध्ये भुमीला माता, नदीला माता मानले , तसेच सृष्टीतील चराचरास "सहचर" असे शिकविले. याच संस्कृतीने "वसुधैव कुटुंबकम" चे ब्रीद दिले., याच संस्कृतीने वेद दिले, उपनिषदे दिली. याच संस्कृतीने राम कृष्ण दिले, तसेच १९ व्य शतकापर्यन्त जगातील सर्वात जास्त अनुसरला जाणारे बौध्द मत की ज्याने शतकापुर्वी पर्यन्त जगाच्या लोकसंख्येचा २/३ भाग व्यापला होता, व तो ही कसल्याही बलाचा किंवा छलाचा वापर न करता दिला. याच संस्कृतीने गणित,खगोलशास्र्त,बीजगणितात मोलाचे योगदान दिले, अजुनही बरेच आहे लिहिण्यासारखे..तर ही आहे हिन्दु संस्कृती. या हिन्दु संस्कृती चे पाईक अगदी सगळेच आहे, तिचे अनुसरण करणारे आहेत, ती कालौघात नीट न समजावली गेल्यामुळे "सृष्टीचे दोहन" ऐवजी आजकाल सृष्टीचे "शोषण" करणारे "हिन्दु" सुध्दा आहेत. एकाच घरात वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे व्यक्ति आहेत, कुणी देवीची, कुणी पांडुरंगाची, कुणी शिवा ची, तर कुणी मारुतीची पुजा करतात. पण असे वेगवेगळ्या देवांची पुजा करणारे एकाच घरातील लोक कधी भांडत नाहीत, की मी ज्या देवतेची पुजा करतो ती देवताच श्रेष्ट व तुझी कनिष्ट असा अट्टाहास करीत नाहीत. तरीही ते हिन्दु आहेत. जे एका घराचे हे तसे एका राष्ट्राचे ही होते व पुन्ह तसे घडवता देखील येईल. नुसते तेच नाही, तर "देव" नावाची कल्पनाच न माणणारे चार्वाक सुध्दा महर्षीच आहेत. आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे, किंवा निश्रेयसाची प्राप्ती कशी करुन घ्यावी हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत निर्णय असावा, त्यानुसार प्र्त्येकास हे "उपासना" स्वातंत्र्य याच संस्कृतीने दिले. कालौघात यात काही अनिष्ट प्रथा केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी घुसल्या , घुसवल्या गेल्या, तसेच काही प्रथांचा पाश्चात्यांनी केवळ राज्यकांक्षेने "फोडा व राज्य करा" गवगवा केला. त्यामुळे साहजिकच या प्रथांविषयी तिरस्कार निर्माण होण्याऐवजी "हिन्दु" संस्कृती विषयीच तिरस्कार निर्माण झाला. तसेच इंग्रजांनी केलेल्या "रीलीजन" या शब्दाच्या हिन्दी भाषांतराने देखील आणखी जास्त फुट पडली. रीलीजन शब्दा्चा समानार्थी किंवा जवळच्या अर्थाचा शब्द "धर्म" नसुन "पंथ" आहे. भारतीय दर्शन शास्त्राप्रमाणे जैन एक पंथ आहे पण रीलीजन च्या चुकीच्या भाषांतरामुळे तो एक "धर्म" झाला. पंथ अनेक आहेत. व प्रत्येक पंथ व्यक्तिस पारलौकीक तसेच इहलौकीक सुखासाठी मार्गदर्शन करतो. यात कोणता तरी एक पंथ परीपुर्ण आहे असे नाही, हे पंथ कोण्या एका व्यक्तिच्या आध्यात्मिक अनुभवातुन निर्माण झालेले असल्याने त्यात भेद असु शकतात. त्यामुळे ज्याप्रमाणे सर्व पंथ कुणी ना कुणी तयार केले किंवा कुणाच्या ना कुणाच्या प्रेरणेने रचले गेले, तसे "हिन्दु" हा पंथ नसल्याने यास कुणीतरी "एक" व्यक्ति निर्माणकर्ता नाही. म्हणजेच हिन्दु हा पंथ नाही, तर हिन्दु ही एक संस्कृती असुन ती हजारो लाखो करोडों लोकांच्या योगदानातुन निर्माण झाली आहे...तर ही जी हिन्दु संस्कृती आहे तिच्या विषयी कुणालाच काहीही वावडे नाही. सर्वांना ती आवडते, महान वाटते, तिलाच "भारतीय" संस्कृती" असेही म्हणुन आजही जगभारातील अभ्यासु, आपल्या कडे आकर्शित होत आहेत. कारण ही संस्कृती "सर्वेषाम अविरोधेन" आहे. 

पण मग प्रश्न येतो की काही लोकांना "हिन्दुत्व" म्हंटले की सांप्रदायिक,संकुचित, जातीयवादी असे का वाटावे? नुकतेच एका मित्राने फेसबुक वर नेमके स्टेट्स लिहिले होते..Hindutva is Hinduism with resistance...हिन्दुत्व म्हणजे हिन्दु व प्रतिकार यांची बेरीज. प्रतिकार ? कुणाचा? कशाचा? कशाप्रकारे? हिन्दुत्व प्रतिकाराच्या गरजेतुन जन्माला आले आहे...आपल्या धारणांवर झालेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, सांस्कृतिक हल्ल्यांचा प्रतिकार, वैचारिक हल्ल्यांचा प्रतिकार, हिन्दुंच्या सुरु असलेल्या बुध्दीभेदाचा प्रतिकार, इतर पंथांच्या छल आणिअ बल पुर्वक सुरु असलेल्या विस्तारवादाचा प्रतिकार, या भुमी तील पुजनीय , गर्हनीय अशा सांस्कृतिक प्रतीकांवर सुरु असलेल्या हल्ल्यांचा प्रतिकार, पंथीय कट्टरतेचा प्रतिकार...हिन्दुत्व म्हणजे प्रतिकार.....त्यामुळे प्रतिकार करण्यासाठी कारणीभुत असलेल्या वर नमुद केलेल्या गोष्टी, षडयंत्रे थांबली म्हणजे "हिन्दुत्व" सुध्दा संपेल... माझ्या मर्यादीत बुध्दीला शोभेल असच लिहिण्याचा बाष्कळ प्रयत्न केला आहे...त्रुटी असतील तर त्या माझ्या..योग्य जे असेल ते या संस्कृतीचे. सुधारणेला अजुनही जागा आहे असे मी मानतो, तर्क, बुध्दी, विज्ञान यांच्यावर आधारीत आपली सभ्यता आपण आणखी महान करु शकतो. 
अस्तु.
हेमंत ववले.

सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे


"सिंहगड जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा म्हणजे गरुडाचे घरटे आहे",

..ब्रिटीश वकील, जेम्स डगलस ने तोरण्याविषयी काढलेले उदगार 

परवा २१ वर्षांनी तोरण्यावर पुन्हा जाण्याची संधी मिळाली. २१ वर्षापुर्वी सपकाळ सर, आनंद पाळंदे काका, धावडे सर, घावरे सर, प्रमोद मांडे काका आदी जाणकार मंडळींसोबत वयाच्या १६ व्या वर्षी तोरण्यावर गेलो होतो. या ज्येष्ट लोकांसोबत आणखीही बसेच किल्ले , डोंगर द-या भटकण्याचे भाग्य मिळाले. यांनी नुसतेच किल्ले दाखवले नाहीत तर किल्ल्यांकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन सुध्दा दिला.
पाळंदे काकांचे पुस्तकातील एका वाक्याने मनात कायचे घर केले आहे. निसर्गातुन चालताना पावलाच्या ठश्याशिवाय मागे काही ठेवु नका व सुखद आठवणी वाचुन काही नेऊ नका"
आपल्या ऐतिहासिक वास्तु म्हणजे आपली साम्स्कृतिक धरोहर आहेत. त्यांचे जतन झाले पाहीजे. त्यांचा अभ्यास झाला पाहीजे. नवनवीन पिढ्यांना या वारश्याविषयी नीट माहीती करुन दिली गेली पाहीजे. व आणखी महत्वाचे म्हणजे या वास्तुंविषयी गर्हनीय भाव जनलोकांत निर्माण केला पाहीजे. हे आणि असे ही बरेच संस्कार वरील मंडळींनी बोलुन नव्हे तर त्यांच्या कृतीतुन आमच्या सारख्या अनेकांच्या मनावर केले आहेत.

परवाच्या तोरणा भेटीत वरील "दुर्गसंस्काराचा" -हास होत असलेला प्रकर्षाने जाणवला. सलग तीन दिवस सुट्ट्या, वाहनांच्या सुविधा, इत्यादी गोष्टींमुळे किल्ले पाहणे हा संस्कार न राहता तो आता फक्त "सहल", "मजा" व विरंगुळा राहीलेला आहे असेच खेदाने म्हणावे लागते. काही गोष्टी जाणवल्या त्यावर जाणकारांनी, दुर्ग प्रेमींनी, दुर्ग संवर्धकांनी अवश्य चिंतन करावे...

आम्ही किल्यावर जाण्यासाठी निघालो खरे पण वेल्हे गावात, पोहोचल्यावर समजले की किल्याच्या अर्ध्याअधिक चढाईपर्यन्त डांबरी व कॉम्क्रीट चा रस्ता झाला आहे. असेच मुळशीतील घनगडावर देखील झाले आहे. अशाप्रकारे रस्ते करण्यामुळे अनेकांची सुविधा होते हे खरे पण श्रम कमी झाल्याने, ज्यांना इतिहासातील "ती" ला पहीली वेलांटी की दुसरी वेलांटी हे देखील माहीत नाही अशा अनेक हवश्या, गवश्या व नवश्यांना किल्ल्यावर पोहोचणे सुलभ झालेले आहे. ज्यांना निसर्ग शिष्टाचार, नेचर इटीकेट्स माहीत नाहीत अशा हजारो लोकांना सहज पणे इथे पोहोचता येते. किल्ले सर्वांनीच पहावेत, पण जर किल्ल्यांचे किल्लेपण , पावित्र्य जर अशा लोकांच्या येण्याने नष्ट होणार असेल तर अशा लोकांनी किल्ल्यावर न आलेलेच बरे. अगदी साध्या गोष्टींचे दुर्ग संस्कार, निसर्गसंस्कार यांवर झालेले नसतात हे या ट्रेक वेळी जाणवले.

उदा - किल्ला किंवा कोणताही डोंगरावर चढताना किंवा उतरताना आपले दोन्ही हात मोकळे असावयास हवेत. त्यामुळे नैसर्गिक रीत्या शरीराचे संतुलन होण्यास मदत होते. कित्येक लोक किल्ला चढताना किंवा उतरताना एका हातात पाण्याची बाटली व दुस-या हातात "जीव गेलेली काठी" घेऊन दिसले. ब-याच लोकांना मी समजावुन सांगण्याचा प्रयत्न केला पण माझ्यासारख्याचे ऐकेल तो धाडसी तरूण कसला, ह्या आविर्भावात हे लोक चढत किंवा उतरत होते. (त्यात तोरणा तर गरुडाचे घरटे आहे, पुण्यातील सर्वात उंच किल्ला व पर्वत सुध्दा)...

किल्ला चढताना एका हातात ज्या पाण्याने भरलेल्या प्लास्टीकच्या बाटल्या असतात त्या, बाटलीतील पाणी संपल्यावर वाटेवरच टाकणे, किंवा किल्ल्यावर कुठे ही टाकणे ही कृती इतकी सामान्य झाली आहे की लोक हे देखील विसरले आहेत की ही विकृती आहे. असेच प्लास्टीक पिशव्यांच्या बाबतीत. बिन्नीच्या दरवाज्याने आत जातान, देवळीतच पडलेला प्लास्टीकच्या बाटल्यांचा खच/ढिग च स्वागत करतो, त्यातच वर चढुन आलेला बहादराच्या हाती जर मोकळी बाटली असेल तर त्याला कुणीही न सांगता तो निर्लज्ज पणे तिथेच हातातील बाटली टाकुन मोकळा होतो. प्लास्टीक च्या पिशव्या, थर्माकोलच्या जेवणाच्या खरकाट्या पत्रवाळ्या, तंबाखुच्या मोकळ्या पुड्या, प्लास्टीकचे ग्लास...अरे काय हा कर्म दरीद्रीपणा. शिवाजी महाराजांच्या इतक्या महान ऐतिहासिक वारश्यास ह्या लोकांनी कचराकुंडी करुन टाकावे यास कर्मदरीद्री पणा नाही म्हणायचे तर आणखी काय?

किल्ला चढताना, किंवा उतरताना, अति उत्साहाच्या भरात, हे नवशे, गवशे, हवशे इतक्या मोठमोठ्या आवाजात किंचाळतात की जणु असे किंचाळल्याने त्यांना कुणीतरी शाबासकी देणार आहे. निसर्गाच्या अविरत अशा शांततेमध्ये देखील एक संगीत आहे. पक्षांची किलकील, उन्मत्त वा-याचा गोंगावणारा आवाज, अधुन मधुन येणारे प्राण्याचे, माकडांचे, भेकरांचे , मोरांचे आवाज.. वा-यामुळे सळसळणा-या गवताचा, झाडांच्या पानांचा आवाज, हे सगळे आपणास निसर्गातील सांमजस्य, हार्मनी चे दर्शन घडवतात. आणि आपण निसर्गात जाऊन काय करतो तर या सगळ्या हार्मनी मध्ये विरजन घालुन ही हार्मनी नासवतो. आपण एक दिवस तिकडे जातो व आरडाओरड करुन तेथील परीस्थितीकीस उध्द्वस्त करतो. कुणी दिला आपणास अधिकार निसर्गातील , तिथे वास्तव्यास असणा-या प्राणीमात्रांच्या , निसर्गघटकांच्या एकतानतेस नष्ट करण्याचा?

किल्ल्यावर जाणे म्हणजे जत्रा आहे काय?
साधारणतः कोणताही किल्ला पाहायचाअसेल तर जास्तीत जास्त किती सदस्य असावेत तुमच्या समुहामध्ये? ५, १० जास्तीत जास्त १५..त्यापुढे जर सदस्य संख्या गेली तर तुमचे दुर्गदर्शन होणार नाही, ती जत्रा होईल. परवा असाच एक १५० लोकांचा ग्रुप किल्ला पाहायला आला. या ग्रुपचे काही सदस्य किल्ला चढत असतानाच काही सदस्य किल्ला उतरत होते. कुठे आहे "टीम वर्क". सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा देखील संस्कार निसर्ग पर्यटनामधुन झाला पाहीजे. सदस्य मागे पुढे होणे म्हणजे फार गंभीर बाब आहे. जी निसर्गाच्या रौद्र रुपाच्या दर्शना्साठी आपणास वाट मोकळी करुन देते. अवघड, अपरीचीत वाटा, तीन चारशे फुट खोल अशा द-या, यात जर तुमच्या ग्रुप मधील कुणी भोवळ येऊन, चक्कर येऊन, किंवा हाता पायाला जखम होऊन पडला तर, त्याचे परीणाम अति भयंकर होतात. प्रसंगी जीव ही गेले आहेत, तेही तोरणा किल्ल्यावरच.
एवढ्या मोठ्या संख्येने किल्ल्यावर जाणे म्हणजे सोबत तेवढाच कचरा घेऊन जाणे होय. पायथ्याशी असलेल्या गावातुन हॉटेल वाल्याला या १५० लोकांच्या जेवणाची ऑर्डर होती. यासाठी तयार जेवण किल्ल्यावर घेऊन जाणारे काही लोक ही दिसले, की जे जेवणाची पोती, अक्षरक्षः पोती, डोक्यावर घेऊन चढत होती. या लोकांनी किल्ल्यावर बराच कचरा केला. आरडाओरड, बीभत्स गाणी, नाच...अरेरे..अशोभनीय असे हे वर्तन पाहुन खरच राग येत होता, पण नाइलाज होता..कुणी ही ऐकण्यच्या मनस्थितीते नव्हते. अगतिकता.

नोकरी धंद्या निमित्त पुण्याअत आलेले काही हिन्दी भाषिक तरुण सुध्दा दिसले. ज्यांना फक्त ट्रेकींग करायचे होते. त्यांना ना धड शिवाजी राजे माहीत,, न तोरण्याचा इतिहास. मी काही ग्रुप्सना जमेल तसे माहीती सांगण्याचा पर्यत्न केला त्यांना तो आवडला ही. यातील बरेच लोक निसर्गाप्रती संवेदन असलेले जाणवले. त्यांचा सर्व कचरा ते पुन्हा त्यांच्याच बॅगांमध्ये ठेवीत होते. मी त्यांचे कौतुक केले.

या सर्व निराशेच्या गर्तेत एक आशेचा किरण ही दिसला..
मला शिवणे, पुणे येथील एक तरुणांचा ग्रुप भेटला. त्यातील एकाने मला ओळखले. व दोन मिनिटे त्यांच्या गप्पा मारता आल्या. हे १५-२० तरुण गेली बरीच वर्षे न चुकता १४-१५ ऑगस्ट ला तोरणा किल्ल्यावर येतात व ध्वजवंदन करुन किल्ला सफाईचे काम निरपेक्ष हेतुंने करतात. यातील "आदेश पायगुडे" या तरूणास मी ओळखतो, म्हणुन फक्त त्याचाच नामोल्लेख करीत आहे. अशा तरुणांना प्रोत्साहन व सहकार्य करणे हे आपण सर्वांनी केले पाहीजे.

किल्ला म्हणजे नुसती सहल नाही, किल्ला म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत आहे.
हे प्रेरणास्त्रोत स्वच्छ, सुंदर व पवित्र राहावयास हवेत. त्यासाठी सर्वांनी आत्मपरीक्षणासोबतच कृतीशील होणे गरजेचे आहे

http://nisargshala.in