Wednesday, September 27, 2017

पिरंगुट येथील जागृत शक्तिस्थान – तुळजाभवानी मातेचे मंदीर.


नवरात्र – जागर शक्तिचा  

शारदीय नवरात्र तसा आपणासर्वांसाठी नेमेची येणार इतर सणांसारखाच एक सण उत्सव आहे. घराघरातुन होणारी घटस्थापना, घटाची घराघरात दररोज सकाळी भराड्याने केलेली आरती, सार्वजनिक ठिकाणी मंडप, पताका लावुन , दांडीया आदी आपल्याला तसे नवीन नाही. काही गोष्टी नवीन आहेत जसे ट्राफीक ला अडथळा करुन नऊ दिवस निघणारी माळेची मिरवणुक, मंडपांमधुन सिनेमाच्या गाण्यांचा कर्णकर्कश्श आवाज, दांडीया गरबाच्या नावाखाली होणारा बीभत्सपणा… या सगळ्या बजबजपुरीमध्ये उत्सवाचे ऐतिहासिक आध्यात्मिक आणि पारंपारीक महत्व टिकवुन ते जनसामांन्यामध्ये रुजवण्याचे काम करताना कुणी दिसत नाही याची एक खंत नवरात्र सुरु झाल्यापासुन दरवर्षी जाणवते व आतल्याआत अस्वस्थ करीत असते. यावर्षी देखील असेच घडले आहे आजपर्यंत.
कालचा अनुभव मात्र खुपच वेगळा होता. काल सायंकाळी पिरंगुट येथील भवानी टेकडी वरील तुळजाभवानी मंदीरातील आरतीच्या वेळी मंदीरात उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले. भाग्य च म्हणावे लागेल याला कारण सणाउत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला आधुनिक कुरीतींना फाटा देत सार्वजनिक उत्सव कसे साजरे करावे याचे एक अतिशय छान उदाहरण पाहावयास मिळाले.  मंदीरामध्ये नवरात्रामध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरतीचा कार्यक्रम असतो व ही आरती अशा लोकांच्या हस्ते केली जाते की ज्यांनी समाजामध्ये सकारात्मक परीवर्तनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अनेकदा आपण पाहतो की दहीहंडी सारख्या उत्सवांमध्ये सिने अदाकारांना फक्त गर्दी खेचण्यासाठी आणले जाते. ५ ते १० मिनिटांचे लाख लाख रुपये समाजाच्या वर्गणीतुन गोळा केलेले पैसे असे अनाठायी उडवणारे संयोजकांच्या भाऊगर्दीमध्ये , तुळजाभवानी मंदीर विश्वस्तांनी रुढ केलेली प्रथा खरच सर्वांसाठी प्रेरणादायी, अनुकरणीय व आदर्शवत आहे, यात संदेह नाही.
काल महाआरतीसाठी आमंत्रित केलेले पाहुणेदेखील खरोखर समाजामध्ये सकाअरात्मक बदलांसाठी आयुष्य झिजवलेले असे दोन-तीन दिग्गज होते. त्यातील पहीले श्री मनोज जी वर्मा. हे श्रीमान, विश्व हिंदु परीषद, बजरंगदलाचे अखिल भारतीय संयोजक म्हणजे प्रमुख आहेत. तर दुसरे म्हणजे श्रीमंत दगडुशेठ गणेशोत्सव ट्रस्ट चे विद्यमान अध्यक्ष श्री अशोक गोडसे. तिसरे होते, वेदवेदांत गुरुकुलम चे संस्थापक आचार्य मंदार येनपुरे.  असा हा त्रिवेणी संगम कालच्या आरतीच्या वेळी झालेला. सेवा सुरक्षा आणि संस्कार हे ब्रीद असलेल्याअ बजरंग दलाचे मुळशी तालुक्यातील कामाची मुहुर्तमेढ देखील कालच रोवली गेली. दुर्गा मातेने सतत नऊ दिवस नऊ रात्री युध्द करीत असुरांचे निर्दालन केले त्यामुळेच स्त्री शक्तीच्या जागराचे प्रतीक म्हणुनच नवरात्र साजरी केली जाते. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी हातात शस्त्र धारण करणा-या आई दुर्गेच्या प्रेरणे ने तरुणांना राष्ट्र निर्माणासाठी देववंदने सोबतच राष्ट्रवंदनेचा संस्कार करणा-या बजरंग दलाचे कार्याचा आरंभ नवरात्रीच्याअ मुहुर्तावर व्हावा याअत नक्कीच दैवी संकेत आहे यात शंका नाही. मतांच्या राजकारणापायी आजपर्यंत झालेले मुस्लीम तुष्टीकरण, असमान नागरी कायदे यासारख्या अनेक गोष्टींनी आजपर्यंत भारतात मुस्लीम धर्मांधतेचा देखील असुरच केला आहे. तसेच ख्रिस्ती धर्मप्रसारक देखील प्रलोभन आणि दहशत यांच्या बळावर सर्रास मतपरीवर्तनाचे काम करीत आहेत. व दोघेही आसुरी शक्तींचे प्रतीक आहेत. भारताचा आत्मा म्हणजे सांप्रदायिक सौहार्द व सांप्रदायिक स्वातंत्र्य. या सांप्रदायिक सौहार्दाच्या मुळावरच घाव करणारे हे दोन राक्षस देखील आज ठेचण्याची गरज आहे. व या कार्याचा शुभारंभ बजरंग दलाच्या अखिल भारतीय प्रमुखांच्या आशीर्वादाने व्हावा ही म्हणजे दुधात साखरच आहे.
धर्मादाय क्षेत्रात कसे काम करावे याचा आदर्श घ्यावा तो श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्रस्ट कडुन. विविध समाजोपयोगी प्रकल्प आणि वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्तीमध्ये समाजासाठी धावुन जाणारी सर्वात तत्पर संस्था म्हणजे दगडुशेठ हलवाई ट्रस्ट. आता हा निव्वळ योगायोगच असावा असे नाही की जयतुळजा भवानी ट्रस्ट, पिरंगुट देखील अशाच प्रकारे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहे. आज म्हणजे दिनांक २७ रोजी म्हणजे नवरात्रीतील सप्तमी या दिवशी जय तुळजा भवानी ट्रस्ट व मायमुळशीडॉटकॉम चे संपादक, आतंरराष्ट्रीय क्रिडा पत्रकार , लेखक प्रा. संजय दुधाने यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी सेवा पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वर्षी हा पुरस्कार राष्ट्रीय सर्वांगिण ग्रामविकास संस्थेच्या पुनम मेहता यांचा देण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात निस्वार्थ भावनेने सर्वसामान्यांच्या हितासाठी सदोदीत झटणा-या कार्यकर्त्यांस हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. तसेच ट्रस्ट च्या वतीने सर्वज्ञ विकास प्रबोधिनीच्या अंतर्गत मुळशी तालुक्यातील तरुणांना पोलीस भरतीसाठी विनामुल्य मार्गदर्शन देखील केले जाते. मुळशी तालुक्यात आजपर्यंत असे अभिनव प्रयोग झाले नव्हते. जय भवानी ट्रस्ट ने ही प्रथा सुरु केली व यात खंड पडु दिला नाही. गेली दहा पेक्षा जास्त वर्षे अनेक प्रकारे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे काम ट्रस्ट करीत आहे. गावागावातील चौकाचौकातील अनेक गणेशोत्सव मंडळे, नवरात्री मंडळे यांनी अनुकरण करावे असे आदर्श उपक्रम जय तुळजा भवानी ट्रस्ट करीत आहेत. का नाही प्रत्येक गावागावात, त्या त्या गावामध्ये चांगले काम करणा-या गावच्याच व्यक्तिस पुरस्कार देण्यात यावा?  असो, तर या जयतुळजा भवानी ट्रस्टच्या विनंतीस मान देऊन अशोक गोडसे सारख्या दिग्गजाने इथे यावे म्हणजे पुन्हा दुधात साखर. श्री गोडसे कडुन जय तुळजा भवानी ट्रस्ट ला नक्कीच आणखी बरेच काही शिकावयास मिळाले असणार व गोडसेंनाअ देखील जय तुळजा भवानी ट्रस्ट चे काम पाहुन आनंद झाला असेल.
कालच्या आरती मध्ये उपस्थित असलेली तिसरे व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य मंदारजी येनपुरे. खरतर व्यक्तिमत्व वगैरे सारखे शब्द त्यांच्या साठी वापरले तर त्यांच्यातील साधेपणाचा अपमान होईल. संस्कृत प्रचुर, वेद वेदांताचे अधिकारी अभ्यासक, अध्यापक, साधक, मदांर स्वामींनी भारतीतील महान अशा आचार्यांकडुन वेदांताचे शिक्षण, गुरुगृही राहुन घेतले. चार भांड्यांचा संसार न करता अवघ्या संसाराची, चराचराची चिंता करण्याचा संकल्प करुन, जीवन भारतमातेच्या सर्वसाधारण कन्या पुत्रांस वेदांताचे धडे देण्याचे कार्यास आरंभ केला. मुळशी तालुक्यात, चिंचवड या त्यांच्याच गावी, स्वतच्याच शेतजमीनीमध्ये गुरुकुलाची मुहुर्तमेढ रोवुन , येतील त्यांच्यासह आणि न येतील त्यांच्या शिवाय हा अवलिया अनेक वर्षे झपाटल्या सारखा कार्यरत आहे. नित्याचा स्वतचा वेद वेदांताचा अभ्यास , लौकीक सुखांचा त्याग, एक प्रकारे सर्वसंग परीत्यागच. पण समाजासाठी असणा-या प्रेमापोटी समाजामध्ये येऊन समाजाच्या उत्थानाचे काम करणारे आचार्य मंदारजींच्या हस्ते देखील काल आरती झाली. एकुणच काय तर काल पिरंगुटच्या भवानी टेकडीवर धर्मरक्षण, सेवाभाव आणि अध्यात्म या क्षेत्रात काम करणा-या तीन दिग्गजांचा त्रिवेणी संगमच झाला होता.
महाआरती सुरु होण्यापुर्वीच मी मंदीरात पोहोचलो होतो. प्रमुख पाहुणे अद्याप पोहोचायचे होते. मंदीरात सुरेल भजनाचा कार्यक्रम सुरु होता. पंचक्रोशीतील अनक भजनकरी, वादक, गायक वारकरी पंरपरेमधील कर्णमधुर भक्तिरसाने ओतप्रोत अशा भजनांची मालिका सादर करीत होते. भक्त भाविक मोठ्या आस्थेने मंदीरात येत, भक्तिभावाने मातेचे दर्शन घेऊन सभामंडपाअमध्येच भजनाच्या सुरांमध्ये हरवुन जात. हळु हळु सभामंडप भक्त भाविकांच्या गर्दीने भरुन जाऊ लागला. गर्दी वाढत होती व गर्दी नियमनाचे काम, स्वयंसेवी वृत्तीने तालुक्यातीलच तरुण-तरुणी निस्वार्थ भावनेने करताना देखील दिसत होते. हे सर्व स्वयंसेवक पोलीस भरती प्रशिक्षणासाठी टेकडीवर नित्याने येणारे, मैदानी खेळ खेळणारे आणि पुस्तकी अभ्यास करणारे देखील होते. हे सर्व स्वयंसेवक अतिशय नम्रतेने व्यवस्था सर्व व्यवस्था पाहत होते.

आजच्या आरतीचे प्रमुख पाहुणे मनोज जी वर्मा मंदीरामध्ये, त्या पाठोपाठ अशोक जी गोडसे देखील पोहोचले लगेच. आचार्य मंदार जी येनपुरे आधीच भजनी मंडळींमध्ये बसुन भजन गाण्यात तल्लिन झाले होते. ज्ञानबा तुकारामच्या गजराने भजनाची सांगता झाली व सर्व जण बसल्या जागेवर उठुन उभे राहीले. आरती लाअ सुरुवात होणार होती.  आरती म्हणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांच्या हातात माईक होता ते सर्व ट्रस्ट चे कार्यकर्तेच होते. ज्ञानेश्वर पवळे, संदीप सातव, सचिन पवळे, पखवाज वादक येनपुरे (ढोल घेऊन), रामदास पवळे, संदीप पवळे(ताशा) आणि सर्वात आकर्षक वाद्य जर कोणते होते तर ते होते संबळ. एरवी आरती म्हणण्यासाठी नेहमीचे गाणारेच पुढे असतात. इथे तसे नव्हते. ट्रस्ट चे मुख्य कार्यकर्तेच हातात माईक, वाद्ये घेऊन आरती म्हणणार होते. एखाद्या मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष यांना नियोजन, व्यवस्था करण्यातुनच वेळ मिळत नाही तर आरती स्वत कसे म्हणतील. म्हणजेच काय तर देवीच्याअ ज्या मुख्य आराधनेसाठी , उपासने साठी हा सगळा अट्टाहास सुरु होता त्या मध्ये ट्रस्टचे मुख्य कार्यकर्ते सर्वांच्या पुढे होते. संबळ, घंटानाद, ताशाचा तर्रर्र ताल, ढोलाचा ठेका आणि डोळेबंद करुन कार्यकर्त्यांच्या सर्वांगातुन आरतीच्या रुपात बाहेर पडणारा आवाज सभामंडपाला अवकाशामध्ये उंच घेऊन जातो आहे की काय असा भास व्हायला लागला. हे सगळे आवाज एकत्र येऊन एक वेगळाच नादब्रम्ह जन्म घेत होता.व या नादब्रम्हामध्ये सर्व भाविक, गायक, वाद्य वाजवणारे, आरतीचे ताट हातात घेतलेले पाहुणे, स्वयंसेवक अगदी देहभान हरवुन गेले होते. हातात माईक घेऊन महाआरती गाणारे ट्रस्ट चे कार्यकर्ते आरती प्रत्येक शब्दाशी एकरुप झाले होते. देहभान हरवणे काय असते ते या आरती म्हणणा-या कार्यकर्त्यांना पाहील्यावर समजते. ह्या आरती मध्ये संगीताच्या भाषेतला सुर ताल फारसा नव्हता. पण महादेवीच्या रौद्र रुपाची उपासना करण्यासाठीचा रौद्रभाव नक्कीच होता. साक्षात शिव शंकर प्रकट होऊन तांडव करु लागतील असा वीर रस ह्या आरती मध्ये होता. जसे माईक हातात घेऊन आरती म्हणणारे देहभान हरवले होते तसेच सर्व भक्त भाविक देखील देहभान हरवुन गेले होते. इथे मी प्रकर्षाने अनुभव घेत होतो माझ्यातील समष्टीचा. मी समष्टी आहे असा अनुभव मला येतो होता. सर्वांची विभक्त भिन्न भिन्न मने एका सामुदायिक मनामध्ये विलीन झाली. एकत्वाचा हा अनुभव म्हणजे देवत्वाची अनुभुतीच आहे. व ही अवस्था अशीच राहावी असे वाटु लागले तर नवल ते काय, पण यथावकाश आरतीचे १०-१५ मिनिटे मंत्रमुग्ध होऊन सरले. संबळाचा ध्वनी थांबला, ताशाचा तांडव थांबला, घंटेचा नाद थांबला, माईक मधुन  आरती गाणा-यांचा सुर थांबला व शिल्लक राहीला तो फक्त भक्तिभाव. शिल्लक राहीली एकत्वाची अनुभुती.
एकंदरीत असा अनुभव मिळणे म्हणजे भाग्याचे आहे. काही मंदीरांमध्ये भक्तिभाव जागृत आपोआप होतो, जसे तुळजाभवानी चे तुळजापुरचे मंदीर, कानड्या विठ्ठलाचे पंढरपुर येथील मंदीर. पण तपश्चर्येच्या जोरावर, स्वच्छ चारीत्र्याच्या जोरावर , पारदर्शक कारभाराच्या जोरावर, पिरंगुट मधील तरुणांनी भवानी टेकडीवरील तुळजाभवानी मंदीर देखील एक जागृत देवस्थान बनविले असे म्हंटल्यास वावगे होणार नाही.
बजरंग दलाच्या तालुक्यातील कार्यास ह्या जागृत तुळजाभवानी मातेने आशीर्वाद दिलाय. बजरंग दलाचे तालुक्यातील धर्मरक्षण व संवर्धनाचे काम भवानी मातेच्या आशीर्वादाने यशस्वी होईल यात देखील शंका नाही.


श्री. हेमंत ववले,
भरे गाव

Sunday, September 24, 2017

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं ।

नभं उतरु आलं, चिंब थरथर वलं ।
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात ॥
तसा मी रोमॅंटीक वगैरे नाही, आणि नाही कधी वरील गाणे मन लावुन ऐकले किंवा पाहीले आहे. पण नभातुन वाहणारे मेघ जेव्हा माझ्या अंगावर आले तेव्हा ह्या गाण्याच्या ओळी उस्फुर्त पणे आठवल्या. काळ कितीही पुढारलेला असला तरी सार्वजनिक जीवनात प्रेमास्पद आणि प्रेमिका (पती पत्नी देखील) प्रेमभावनेची अभिव्यक्ति करणे जड जाते, हे आपल्या अंगवळणी नाहीये अजुन. हा सहज प्रेम भाव म्हणजे नुसत प्रेमीका आणि प्रेमास्पद यांच्यापुरताच मर्यादीत आहे का?
खरतर प्रेम या विषयावर लिहिण्याचा माझा अधिकार कितपत आहे हे ,मला ठाऊक नाही. तरीही निसर्गाच्या सदोदीत सानिध्याने , पुर्वी केलेल्या थोड्याफार वाचनाने आणि जगतानाच्या कडुगोड अनुभवाची शिदोरी संगतीला घेऊन, धाडसाने इथे या अगम्य विषयावर लिहिण्याचे धाडस करीत आहे.
१४०० वर्षे तपश्चर्या करणारा वटेश्वराचा सुत, चांगदेव अंहकाराने ग्रासला, व मीच श्रेष्ठ आहे हे सिध्द करण्याच्या लालसेने ज्ञानेश्वरांना आव्हान करता झाला. कथा सर्वांना माहीत आहेच. कथेच्या तपशीलामध्ये आपणास जाण्याची आवश्यकता नाही, माऊलींनी चांगदेवास उपदेशपर केलेल्या लिखाणात अद्वैत मताचे अतिशय सुलभ आणि बालबोध उदाहरणाद्वारे विवेचन केले आहे. त्या अभंगांमध्ये अद्वैत वेदांत ठासुन भरलेला आहे. प्रत्येक अभंग आपणास द्वैताच्या पल्याड नेण्यासाठी समर्थ आहे. वाचकांनी अवश्य अभ्यासावा असा हा श्लोक संग्रह आहे. त्यातील एक अर्धी ओवी इथे मुद्दाम मांडतो.
तेंवि तूंतें मी गिवसी तेथें तूंपण मीपणेंसी उखते पडे ग्रासीं भेटीचि उरे
उरीभेट, म्हणजे गळाभेट झाल्यास “मी”पण आणि “तु”पण ग्रासले जाऊन गळुन पडते थोड्याशा या आशयाची ही ओवी आहे. उभय म्हणजे दोन, म्हणजेच द्वैत. हे द्वैत जर गळुन पडत असेल तर आपण ही खुशाल समजावे की आपण माउंलीच्या उपदेशाचे पाईक आहोत.
प्रसंग असा होता की आम्ही पुन्हा एकदा सह्याद्रीच्या अप्रतिम अद्वीतीय अवर्णनीय अशा ठिकाणी नुकतेच पदभ्रमण करुन पोहोचणार होतो. तशी ट्रेकींग करताना पायाखालची वाट तुडवत आपण जात असतो. पण यावेळी असे नव्हते. पायाखालची वाट असंख्य अशा नाजुक, लोभस, सुंदर छोट्या छोट्या निसर्गाविष्काराने भरलेली होती. नुसती पायवाटच नाही तर, जिथवर नजर जात होती तिथवर नजाकत निसर्गाच्या प्रत्येक घटकामधुन ओथंबुन वाहात होती. लव लव कणारी गवताची पाती, कधी त्या गवताच्या पात्यांवर अलगद अडकुन पडलेला एकच पाण्याचा थेंब, कधी कधी त्याच गवताच्या पात्यांवर इवलीशी गोगलगायी चिकटुन आणखी उंची गाठण्याच्या यत्नात , कधी एखादा गांडुळ पायवाट मध्ये आडवा पडलेला दिसतो व सरपट तो पायवाटेच्या पलीकडे जाण्याचा प्रयतन करीत असताना दिसतो. कधी पायवाटेच्या बाजुच्या हिरवाईतुन एखादे फुल पायवाटेवर डोके वर काढुन , हसुन आमचे स्वागत करताना दिसते. बर फुल एक  न दोन , असंख्य प्रकारची असंख्य म्हणजे मिजता येणार नाही एवढी फुले, नव्हे नव्हे फुलांचे गालिचेच सर्वदुर पसरलेले. कधीही पाहीले नसतील असे छोटे छोटे बेडुक, मधमाश्या, सापसुरळ्या, सरडे आणि हे सगळे होत असताना, नभातील ढग तरी का नभातच राहतील. नभ देखील उतरले होते. क्षणक्षण धुंदल्या सारखे व्हायचे. पावलापावलावर येथील कळ्या, फुले, पाने, वेली, गवत , प्राणी नव्हे सगळी सृष्टीच एका सुमधुर संगीताच्या तालावर एका लयीत धुंद झाल्यासारखी भासत होती. आता मला सांगा ही वाट काय तुडवायची आहे? नक्कीच नाही. अगदी हळुवारपणे आम्ही एक एक पाऊल आमच्या ध्येयाकडे टाकीत होतो. शेवटच्या वळणावर समोरचा दांड हळु लहान होत होता. एका क्षणी त्या दांडाच्या पलीकडे आकाशाला गवसणी घालणारे एक डोंगराचे टोक दिसु लागले. प्रत्येक पावलागणिक त्या डोंगराची उंची देखील वाढु लागली. आम्ही त्या डोंगराच्या, नव्हे सुळक्याच्या दिशेने त्याच्या जवळ जवळ जात होतो. हा एक किल्ला आहे. लिंगाणा नाव आहे ह्या किल्ल्याचे. जसे जसे आम्ही लिंगाण्याच्या अलीकडच्या पठाराच्या कड्याकडे पोहोचत होतो तस तशी ही धुंदी आणखी वरच्या पातळीवर जात होती. क्षणात वा-याचे झोत येऊन समोरच्या तसेच डाव्या आणि उजव्या बाजुच्या द-यांचे ओघवते दर्शन घडत होते. आणि दुस-याच क्षणात तीच धुंदी पुन्हा सर्व चराचर व्यापुन टाकीत होती. समोर जे काही घडत होते ते सर्व नाट्यमय आणि प्रचंड उर्जा प्रदान करणारे होते. नभ उतरलेले होते, ते म्हणजे नभ आणि सभोवार चिंब ओले झालेले होते, आणि अंग झिम्माड झाले होते रायलिंगाच्या हिरव्या बहरात.
मी जे काही अनुभवत होतो ते स्वर्गीय होते, अलौकीक होते. आम्ही अंदाजे एक ते सव्वा तास रायलिंगावर घालवला. वा-याच्या झोतांसोबत मध्येच ढग नाहीशे होत आणि समोर, पश्चिमेकडे बा रायगडावरील जगदीश्वराच्या प्रासादाची गगनचुंबी शिखरे दिसत. अजुन उजवी कडे पाहिल्यावर सह्यगिरीची असंख्य शिखरे, आकाशात झेपावताना दिसत, त्यामध्ये प्रकर्षाने दिसले ते कोकणदिवा, रायलिंग माची. लिंगाणाच्या कधी डावीकडुन ढगांचे लोट येत तर कधी उजवीकडुन व अर्धा अधिक लिंगाणा, शिखर सोडुन, ढगात जाई. व लिंगाण्याचे शिखर म्हणजे टोक मात्र तसेच अधांतरी तंरगताना दिसे. हे दृश्य काही फार लांब नव्हते. एक दोन पावले पुढे जाऊन लिंगाण्या च्या टोकाला हात लागेल की काय इतका जवळ होता लिंगाणा आमच्या समोर.
कॅम्पसाईटवर माघारी वेळेत, अंधारण्यापुर्वी जाणे गरजेचे होते. आमच्यापैकी अनेकांना तर इथुन माघारी जाण्याची इच्छाच होईना, अगदी मला ही. कित्येकांनी मला परतीच्या प्रवासात विचारले की आपण रायलिंग पठारावरच टेंट लाऊन मुक्काम का करीत नाही. त्यांना समजावुन सांगावे लागले की, मुक्कामामुळे आपण निसर्गातील “त्या” सौहार्दामध्ये (धुंदी मध्ये) व्यत्यय निर्माण करण्याचा धोका जास्त आहे. मंडळींना हा विचार पटला देखील व आवडला देखील.
कॅम्पसाईटकडे परतताना, त्या धुंदीचा, नभाचा, झिमाड अंगाचा आणि हिरवाईचा  विचार डोक्यात डोक्यात आला. माझ्यासाठी माझ्या सोईने मी या सा-या विचारांना एका सुत्रात बाधण्याचा प्रयत्न करु लागलो.
हा हिरवा बहर खरच इतका मोहीत करतो की इथे आल्यावर माझे अंग झिम्माड होते म्हणजे माझे मीपण गळुन पडते. माझ्यातील देहबोध नाहीसा होत जातो. व मी एक आणखी उच्च अशा अनुभुतीच्या पातळीवर जातो जिथे द्वैत राहत नाही. माझ्यातील मी एका खुप मोठ्या प्रवासास निघतो. तो दृश्य अदृश्य अशा अनेक वस्तुंना स्वतमध्ये सामावुन घ्यायला सुरुवात करतो. माझ्यातील मी मोठा व्हायला सुरुवात झालेली असते. समोर दिसणा-याअ सर्व चल अचल चराचरास तो सामावुन घ्यायला सुरवात करतो. आधी मला अनुभुती होते की हे ह सभोवातीदिसणा-या निखळ सुंदर अशा निसर्गाच्या मधुन पावले टाकत टाकत चालणारा हा देह, हे शरीर म्हणजे मी आहे, नतर, ती लवलवणारी गवताची पाती म्हणजे “मी” आहे अशी अनुभुती होऊ लागते, नंतर ती पान, फुल, फुलपाखर, प्राणी, हवा पाणी, ढग, ढगांमधील तुषारविंदु, डोंगर, द-या, दगड हे सगळे एकसंध, एकजीव एकात्म असल्याची अनुभुती होते.
आणि हा एकात्मभाव जेव्हा अनुभवास येतो तेव्हा “मी” पण संपते. आणि मग ती धुंदी, एकतानता, सौहार्द अनुभवास येते. या अनुभुतीच्या उच्च पातळीवर मी नसतो. तिथे तु नसतो. तिथे “असणे” च नसते. आणि “नसणे” देखील नसते.  तिथे असते फक्त सौहार्द, सामंजस्य. हे सामंजस्य उस्फुर्त, निसर्गदत्त असते. ओढुन ताणुन आणलेले नसते. आणि जिथे असे सौहार्द असेल तिथे अपाय होईलच कसा? आणि म्हणुनच आमच्याकडुन पायाखालची वाट तुडवली गेली नाही. आम्ही स्वतच वाट झालो होतो. लिंगाण्याला मिठी मारुन आलेले ढंगामधील तुषार आमच्या रंध्रा रंध्रात अविरत आरपार जात होते, बाहेर येत होते. “मी” राहीलोच नाही. फक्त निसर्ग होता. फक्त निसर्ग.
तेंवि तूंतें मी गिवसी तेथें तूंपण मीपणेंसी उखते पडे ग्रासीं भेटीचि उरे
माऊलींनी यापेक्षा आणखी वेगळा उपदेश केलाय असे मला तरी वाटत नाहीये. दैनंदीन जीवनात ह्या एकात्मभावाचा अनुभव घेता येणे शक्य आहे का? दैनंदीन जीवनात अनुभुतीच्या अशा उच्च पातळीवर आपणास जाता येईल का? दररोज माझे ज्या व्यक्तिशी व्यवहार (बोलणे चालणे देणे घेणे)  होतात काय ती व्यक्ति निसर्गाचा घटक नाहीये का? मी देखील निसर्ग आहे व ती व्यक्तिदेखील निसर्ग आहे. आम्हा दोघांमधील दोघेपण लोप पावुन एकपण जर आले, तादात्म्य जर आले, सौहार्द जर आले तर कुणासही अपाय कसा होईल? प्रेमी(म्हणजे प्रेम करणारा किंवा करणारी) आणि प्रेमास्पद (ज्या व्यक्तिवर प्रेम करतो ती व्यक्ति) या दोघांमध्ये अभेद निर्माण होणे, एकात्म भाव निर्माण होणे म्हणजे खरी प्रेमाची फलशॄती होय. अध्यात्म यापेक्षा वेगळे ते काय आहे. लौकीकात ज्या प्रेम हा शब्द वापरला जातो, तो अर्थ जरी गृहीत धरला तरी आज प्रत्येक स्वतःच “मी” आपल्या प्रेमास्पदाच्या “तु” मध्ये विलीन करुन, स्वतःच “मी” मोठा करण्याची संधी आहे. व हा मी उत्तरोत्तर वृध्दींगत होऊन त्याने समष्टीमध्ये विलीन झाले पाहीजे, त्यानंतर सृष्टी , नंतर परमेष्टी मध्ये रुपांतरीत झाले पाहीजे. थोडक्यात काय तर प्रेम म्हणजे प्रेम असत वाल प्रेम ही अध्यात्माची पहीली व शेवटची पायरी आहे. व सगळा प्रवास होतो निसर्गामधुन. आपणास फक्त एकच भान ठेवायचे असते, ते म्हणजे पायाखालची वाट तुडवायची नाही. अलगद, हळुवार, मृदुल पावले टाकीत आपल्या सहचरांची काळजी घेत त्या गगनचुंबी ध्येयावरील नजर न हलवता  , धुंद होऊन मार्गक्रमण करीत राहायचे असते.
हेमंत ववले,
निसर्गशाळा, पुणे

(टिप - आमच्या या स्वर्गीय सहलीची शब्दसफर आवडली असेल तर अवश्य फोटोसफर खालील लिंकवर क्लिक करुन करा. फोटोग्राफी – यशदीप माळवदे )

Saturday, September 2, 2017

जीडीपी आणि नोटबंदी



२०१७-१८ च्या दुस-या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.४ % इतका म्हणजे जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असा होता. तोच २०१६च्या दुस-या तिमाहीमध्ये हा दर ९.२ % इतका होता. २०१४ ला तो ८.३ % इतका होता. म्हणजे मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सुरुवातीला हा दर कमी झाला व नंतर २०१६ पर्यंत तो ९.२ % इथवर पोहोचला. आणि अर्थ शास्त्रींच्या मते २०१७ च्या ४थ्या तिमाहीपर्यंत हा दर ७.१ % पर्यंत पोहोचेल. चालु तिमाहीमध्ये उत्पादन क्षेत्र, खाणकाम आणि बाम्धकाम क्षेत्रामध्ये मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत जास्त घट झाली आहे. त्याच वेळी आर्थिक सेवा, संरक्षण, दुरसंचार, हॉटेलींग, वाहतुक, व्यापार आदी क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. आता नोटबंदीमुळे उत्पादन क्षेत्रात वाढ कमी झाली असे मानायचे का? बांधकाम क्षेत्राचे एकवेळ मान्य करता येईल कारण ते क्षेत्र त्या मानाने खुपच असंघटीत व व्यवस्थेला बगल देणारे आहे. त्यामुळे नोटबंदीचा फटका बांधकाम क्षेत्रास झाला हे एकवेळ मान्य करावे लागेल. राहीला प्रश्न खनिज खाणकाम. भारतील बहुतांश खनिजे खाणी सरकारी लिलाव पध्दतीने खाणकामासाठी विकल्या जातात. यातुन मिळणारे खनिज मुख्यत्वे करुन भारतातीलच उत्पादन क्षेत्रासाठी व थोड्या प्रमाणात निर्यात केले जाते. उत्पादन क्षेत्रातच मंदी असल्याने स्वाभाविकच खनिज उत्पादनावर त्याचा परीणाम होणारच. आता आपण उत्पादन क्षेत्रात मंदीचे कारण नोटबंदी असु शकते का याचा शोध घेण्याचा प्रयत्न करु. 2013 मध्ये हाच दर ४.१ % इतक्या नीचांकी पातळीवर गेला होता व पुन्हा २०१६ मध्ये ९.२% इतक्या उंचीवर जाऊन आला. सोबतदिलेला चार्ट पाहिल्यावर आपणास हे नक्की समजेल की जीडीपी मध्ये चढ उतार हा मागणी आणि पुरवठा या साध्या तत्वावर अवलंबुन आहे. उत्पादन क्षेत्रातील घटता दर नोटबंदीमुळे झालेला नाही हे समजण्यासाठी काही मुद्दे पाहु यात.

१. उत्पादन क्षेत्रात कोणताही कच्चा माल रोखीने घेतला जात नाही
२. उत्पादन क्षेत्रात कोणत्याही कामगाराचे वेतन रोखीने दिले जात नाही
३. उत्पादन क्षेत्रात पंजीकृत कंपन्याचे उत्पादन आणि विक्री ही देखील मुळात कागदोपत्री होणार अशी अपेक्षा आसते, त्यानुसार कंपनीचे व्यवहार पध्दती रुढ झालेली असते. त्यामुळे नोटा नाहीत म्हणुन उत्पादन रखडले जाणे हे शक्यच नाही.
४. आपल्या भागात अनेक छोटे मोठे कारखाने आहेत. त्या कारखान्यांमध्ये आपल्या भागातील अनेक छोटे मोठे व्यावसायिक काही ना काही सेवा पुरवतात. जसे गाडी भाड्याने देणे, जेवण डबे, चहा, सब वेंडर, इत्यादी सर्व खर्च ह्या कंपन्या बॅकेतुनच करायच्या. सेवा पुअरवणा-यांना चेक ने पैसे चुकते केले जायचे(अजुन ही तसेच होत आहे)

एवढे सगळे व्यवहार जर नोटाशिवाय वर्षानुवर्षे सुरु आहेत तर नोटबंदीमुळे जीडीपी दर कमी झाला असे म्हणणे म्हणजे दुधखुळे पणा आणि नुसता आकस आहे यात शंका नाही.
नोटबंदीमुळे सामान्य नागरीकांस त्रास झाला यात शंकाच नाही. पण मुळात सामान्य माणसाकडे खुप मोठ्या प्रमाणात काळा पैसा (कर चुकवुन कमावलेला किंवा साठवलेला पैसा, म्हणजे रोखीने केलेले व कर चुकविलेले व्यवहार) इतका जास्त नव्हता की त्यास अगदी दररोजच रांगेत जावे लागले. जे काही थोडे फार पैसे सामान्य माणसाकडे होते ते बॅंकेत जमा करण्यासाठी एक किंवा दोन वेळाच जावे लागणे अपेक्षित होते. त्यापेक्षा जास्त वेळा बॅम्केत जावे लागले असेल, व अस्वस्थता शिगेला पोहोचली असेल तर काळा पैसा पांढरा करायचा कसा ? या एकाच चिंतेने असामान्यांचे हाल झाले. कर नाही तर डर कशाला, याप्रमाणे सामान्य जनतेने आनंदाने होणारा त्रास सहन केला. आधीच्या एका पोस्ट मधील ते श्रीमान क्ष़. होते की ज्यांना खुपच त्रास झाला. तरीही त्रास झाला हे नाकारता येत नाही. पण हा त्रास झाला म्हणुन नोटबंदीच चुकीची होती असे मानने सर्वथा अयोग्य आहे. काही लोकांचा रांगामध्ये मृत्यु देखील झाला. दुर्दैव. पण खरच नोटबंदीमुळे लोक मृत्युमुखी पडले का? तुमच्या माझ्या सारखा धडधाकट माणुस नाही मरण पावला. जे जर्जर झाले होते किंवा व्याधी होत्या , अती रक्तदाब किंवा हृद्यरोग आदी असणारेच मृत्युमुखी पडले. यात नोटबंदीचा दोष कसा काय? रांगा आम्हाला माहीत नव्व्हत्या का? , वीज बिल भरण्यासाठी रांग, फोन बिल भरण्यासाठी रांग, घरगुती गॅस टाकी मिळवण्यासाठी ४-५ तासाची रांग, राशन साठी रांग, रेल्वे तिकीटासाठी रांग, दाखले काढण्यासाठी रांग, दगडुशेठ, पंढरपुर, आळंंदी मध्ये दर्शनासाठी रांग, चितळ्यांकडे रांग, दारुच्या दुकानांमध्ये रांग, ॲडमिशन साठी रांग, रांग काय नवीन आहे आपल्याला? आणि रांगेत अपघात देखील होऊ शकतात. पण विरोधी पक्षातील लोकांनी या रांगेचा बागुलबुआ केला नोटबंदीच्या काळात. व , राई का पहाड केला. वरील पैकी ब-याच रांगा नोटबंदीच्या अनुषंगाने आलेल्या डीजीटल क्रांतीने कमी केल्या आहेत. व गॅससठीच्या रांगा नोटबंदीच्या आधीच्या जनधन व आधार जोडणी मुळे संपल्या आहेत.
सामान्य जनतेला त्रास झाला हे खरे असले तरी हा त्रास जनतेने आनंदाने स्वीकारला. दुख झाले ते त्यांनाच ज्यांच्या कडे काळा पैसा होता व तो रद्द बातल होण्याची त्यांना भिती होती.
आता मुळ मुद्द्याकडे वळु नोटबंदी यशस्वी झाली की नाही हा या लेखाचा विषय नाही. नोटबंदीचा 'क्ष' रीपोर्ट मध्ये नोटबंदी ची फलस्रुती वाचता येईल. याअ लेखाचा विषय आहे जीडीपी आणि नोटबंदीचा परीणाम. वर सविस्तर लिहिल्याप्रमाणे , नोटबंदीचा उत्पादन क्षेत्रावर अजिबात परीणाम झालेला नाही. मागणी आणि पुरवठा या साध्या तत्वावर उत्पादन क्षेत्र कार्य करते त्यानुसार उत्पादन दर वर खाली जाणे स्वाभाविक आहे. किंवा आणखी ही इतर घटक आहेत जे उत्पादन क्षेत्रावर प्रभाव टाकु शकतात. जसे प्रशासकीय सपोर्ट. निर्यात क्षमता वाढवण्यासाठीची धोरणे, गुणवत्ता धोरणे अमलबजावणी, इत्यादी. यातील कदाचित धोरणांच्या बाबतील सरकार ला दोष देता येऊ शकेल कारण ७० वर्षाची रुढ पध्दती त्यांनी ३ वर्षात बदलली नाही. असो हा वेगळा विषय आहे.
त्यामुळे जीडीपी दर घटणे आणि नोटबंदी यांचा दुर दुर पर्यंत संबंध नाही हे नक्की समजावे.