Monday, July 31, 2017

सह्याद्री आणि गोपाळांची संस्कृती



माझ्या सह्याद्रीच्या भटकंतीमध्ये अनेकविध अनुभव घेता आले. सह्याद्रीची प्राचीनता आणि जैवविविधता सांप्रत अधिक चर्चिली जाते. सोबतच सह्याद्रीतील शिवाजी राजांचे अभेद्य किल्ले, द-या, डोंगर, विविध प्राचीन आणि आधुनिक घाट सर्वांनाच भुरळ पाडत असतात. सह्याद्रीने चालुक्य, यादव, माऊली, तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, या सर्वांनाच मोहीत केलेले दिसते.
सह्याद्रीचे शौर्य अभेद्य किल्ल्यांच्या रुपात आजही विद्यमान आहे. प्रत्येक किल्ला त्याच्या अवतीभवतीचे गावे, गावागावातील माणसे, लढवय्ये, मावळे, हवालदार, भालदार, धारकरी, हारकरी, किल्यावरच्या बाजारपेठा. पायथ्याची गावे, गावागावातील विविध इतिहास, कथा, दंतकथा काही ज्ञात तर काही अज्ञात. आपणास एकच हिरकणी माहीत आहे. पण अशा अनेक हिरकण्या ह्या सह्याद्रीने पाहील्या असतील. अनेक बहादुर मर्द मावळे गावागावात, वस्त्यावस्त्यांमध्ये असतील.
सदोदीत उन वारा पाऊस यांचा मारा अंगावर झेलत सह्याद्री एखाद्या तपस्व्याप्रमाणे अढळपणे उभा आहे. तो अविचल आहे. तो निर्विकार आहे. कसल्याही बाह्य व्यवधानांचा परीणाम त्याच्या तपश्चर्येवर होत नाही.  म्हणुनच की काय सह्याद्रीची विरक्ती त्याच्या विविध  बौध्द लेण्यांतुन कोरली गेली आहे.

असंख्य प्राणीमात्रांस अभय देणा-या सह्याद्रीची एकात्मता त्याच्या अंगाखांद्यावर वाढलेल्या जैवविविधतेमध्ये आहे. सह्याद्रीचा रुद्रावतार त्याच्या काळ्याकभिन्न कातळकड्यांमध्ये आहे.
सह्याद्रीचे मातृत्व त्याच्या कड्या कपा-यांतुन उगम घेणा-या शेकडो नद्यांमध्ये आहे, ज्या पुढे जाऊन फक्त जलवाहीन्या न राहता जीवनवाहीन्या बनतात. किमान हजारेक नद्यांचा उगम सह्य रांगामध्ये होतो. काही पुर्व वाहीन्या तर काही पश्चिम वाहीन्या आहेत. शहरांना पिण्यासाठी पाणी, पाणी साठे, जलविद्युत प्रकल्प, शेतीसाठी धरणे, बंधारे, कालवे हे सर्व सह्याद्रीच्याच जीवावर आहे.
सह्याद्रीचे पितृत्व त्याच्या अंगाखांद्यावर हजारो लाखो वर्षे आनंदाने खेळणा-या बागडणा-या असंख्य प्राणीमात्रांच्या पालनपोषणामध्ये आहे. मागे एका लेखामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे सह्याद्रीमध्ये आढळणा-या एका बेडकाची जात साडे आठशे लाख वर्षापुर्वीची मानली जाते. व ही जात फक्त सह्याद्रीमध्येच आहे. आणि हा पुरातन काळ म्हणजे या पृथ्वीतलावर मानव नावाच्या प्राण्याची उत्पत्ती होण्याआधीचा काळ आहे. संशोधकांचा कयास जर प्रमाण मानला तर, आपणास माहीत असलेल्या या ज्ञात जीवास सह्याद्रीने कित्येक लाखो वर्षे सांभाळले आहे हे स्पष्ट दिसते.
ह्यासोबतच सह्याद्रीच्या कुशीत भारतीय संस्कृतीची छाप अगदी डोंगर द-यात असणा-या वाड्या-पाड्यावर देखील पहावयास मिळते. आपल्याकडे एक म्हण आहे, की भाषा दर पाच मैलांवर बदलते. भाषा बदल म्हणजे सांस्कृतिक वेगवेगळेपण हे नक्कीच. असे हे वेगळेपण आपणास बारा मावळांत पहावयास मिळते. ही बारा ही मावळे सह्याद्रीच्या कुशीतच आहेत. हे वेगळेपण विशिष्ट प्रसंगी पहावयास मिळते. एक उदाहरण सांगतो इथे. आमचे कडे एखाद्या व्यक्तिच्या और्ध्वदैहीक आचारांमध्ये एका दगडास( खडा ) विशेष स्थान आहे. याला जीवखडा असे म्हणतात. आता जीवखडा नावाची संकल्पना बाराच्या बारा मावळांत म्हणजे महाराष्ट्रातील सह्याद्री मध्ये वसलेल्या डोंगरद-यात राहणा-या लोकांत आहे. पण त्यात थोडे थोडे भेद आहेत. जसे काही ठिकाणी हा खडा मरणोपरांत दहा दिवस घराच्या बाहेर टांगुन ठेवतात तर काही ठिकाणी तेरा दिवस. काही ठिकाणी हा खडा घराच्या आढ्याला आतुन टांगतात तर काही ठिकाणी हा खडा भिंतीला असेलेल्या खुंटीला टांगतात. तर सांगायचा मुद्दा असा की वेगळेपण असले तरी जीवखडा संकल्पना मात्र सगळीकडे दिसते. कुणी शिकवले असेल बरे ह्या मावळ भागातल्या म्हणजेच डोंगरद-यात वाड्यावस्त्यांमध्ये लोकांस हे कर्मकांड? हे कर्मकांड योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे. पण हे एकसुत्रता सर्वत्र दिसुन येते. नुसतीच सह्याद्रीमध्येच आहे असे नाही तर संपुर्ण भारतात ही सांस्कृतिक एकसुत्रता दिसते आपणास.
विकृती, प्रकृती आणि संस्कृती ह्या तीनही संकल्पना तशा एकाच मुल तत्वावर आधारीत आहेत. व ते मुल तत्व म्हणजे निसर्गनियम होय. वेगवेगळ्या संदर्भात ह्या संकल्पनांची उकल करता येईल. दोन तीन वर्षापुर्वी आमच्या घरच्या झाडाचे आंबे उतरवायचे काम सुरु होते. मी झाडावर चढलो होतो व टिपुन एकेक आंबा काढत होतो. झाडाच्या एका फांदीला आता शंभरेक आंबे शिल्लक होते. इतक्यात आई म्हणाली आता बास झाले. राहीलेले आंबे झाडाला तसेच राहुदे. मी का असे न विचारताच झाडावरुन खाली उतरलो. व आंबे पिकवण्याची आढी लावुन झाल्यावर आईला विचारले झाडाला आंबे ठेवायला का सांगितलेस तु मला? त्यावर आई म्हणाली की आपण सगळेच्या सगळे आंबे काढायचे नसतात.झाडावर येणा-या पक्षांना प्रसंगी प्राण्यांना खाण्यासाठी हे आंबे असेच ठेवायची पध्दत पुर्वापार असेल खेड्यापाड्यात. यात संस्कृती पाहायला मिळते. सर्वच्या सर्व आंबे काढणे व ते खाणे किंवा विकणे ही विकृती आहे. व जेवढी भुक आहे तेवढेच आंबे काढुन खाणे ही प्रकृती आहे. पण या एका प्रसंगात संस्कृतीची खुण दिसते. ही संस्कृती देखील सह्याद्रीचे अंगभुत वैशिष्ट्य आहे. एखादा समाज किती सुसंस्स्कृत आहे हे पाहण्यासाठी त्या समाजात कोणत्या चालीरीती आहेत, कोणत्या कला कौशल्यांना त्या समाजात स्थान आहे , समाजात  कोणते छंद जोपासले जातात , त्या त्या समाजात संगीत, लेखण वाचन आदी विषयी कितपत ज्ञान आहे , या सर्वांवर त्या त्या समाजाचा सुसंस्कृतपणा किती उच्च दर्जाचा आहे हे समजते. भुमीस माता म्हणणारा आपला हा मावळातला समाज सांस्कृतिक दृष्ट्या अभ्यासाचा एक स्वतंत्र विषय आहे. आपल्या विविध चालीरीतींच्या मागे एक विज्ञान आहे. मी दहावी मध्ये असताना माझे इंग्रजीचे शिक्षक श्री गुलाबराव सपकाळ सरांनी मला एक अप्रतिम पुस्तक वाचण्यासाठी दिले. प्रा. सौ कांचनगंगा गंधे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे नाव ही भारी्च आहे. “आपले वृक्ष आपली संस्कृती”. यात आपल्या विविध सणवारांमध्ये चालीरीती प्रथांमध्ये वापरल्या जाणा-या विविध वृक्ष वेलींचे सांस्कृतिक तसेच वैज्ञानिक महत्व त्यांनी सण व वृक्ष वार सविस्तर लिहिले आहे. म्हणजे आपल्या संस्कृतीला वैज्ञानिक आधार आहे व तो अगदी दुरदुर्गम अशा डोंगरद-यात राहणा-या आमच्या सह्याद्रीवासीयांना माहीत देखील होता. कोणत्याही संस्कृतीचे आणखी एक महत्वाचे अंग असते. ते म्हणजे सहजीवन. आधुनिक पाश्चात्य लेखक स्टीफन कॉव्हे याने त्याच्या एका सुपसिध्द पुस्तकात Interdependence is higher value than Independence असे तत्व मांडुन त्या तत्वास कॉर्पोरेट जीवनात यशाची गुरुकिल्ली असे म्हंटले. जाती पाती आणि उच्चनीच असा ओंगळवाणा वाटणारा प्रकार म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन वर म्हंटलेल्या परस्परालंबित्वाचे एक विकृत रुप आहे. जात हा शब्दास कारकुनी महत्व येण्याआधी आपल्याकडे बलुतेदार नावाची व्यवस्था कित्येक हजारोवर्षे वृध्दींगत होत गेली. त्याचे एक उदाहरण मला अगदी दोन तीन वर्षापुर्वी मोसे मावळ खो-यात फिरताना दिसले. बलुतेदारी संपली. पण काही ठिकाणी ती अजुन आहे. मी एकदा, पानशेत वरसगाव हुन मोटारीतुन मुठा खो-याकडे येत होतो. तसा हा भाग ही दुर्गमच. अजुन ही तासनतास ह्या रस्त्यावर एखाददुस-या वाहनापेक्षा जास्त काही दिसत नाही. तर या प्रवासात, कोंढुर गावाजवळ, एक व्यक्तिने माझ्या गाडीला हात केला व लिफ्ट मागीतली. उंचीने साडेचार ते पाच फुट उंच थोडासा जाड, गव्हाळ, पायजमा आणि टोपी घातलेला हा माणुस या गावातीलच असणार असे मला वाटले व माझा तर्क बरोबर निघाला. गाडीत बसल्यावर त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यात त्यांच्या मुलांचे इंजिनियरींग वगेरे शिक्षणाविषयी समजले. ते कुटुंब सध्या पुणे शहरात राहते. मी त्यांना विचारले की इतक्या उशीरा कसे काय निघालात पुण्याकडे तर ते म्हणाले की ते ज्ञाती ने न्हावी आहेत व गावात जोंधळे घ्यायला आले होते. दर शनिवारी व रविवारी ते गावी येतात व गावातील लोकांची दाढी डोकी (हजामत) करतात. त्यांच्याकडे स्वतची शेती नाही. पण ह्या बलुतेदारीतुन त्यांना त्या वर्षी २८ अठ्ठावीस पोती भात, तेवढीच ज्वारी मिळाले. व त्यांच्या जन्मापासुन त्यांना व त्यापुर्वी त्यांच्या वाड वडीलांना देखील ही बलुतेदारी होती. पुर्वी त्यातीलच काही विकुण मसाले,तेल, कपडे आदी विकत घेत. म्हणजे गावातील गावकी मध्ये प्रत्येक घटकास सामावुन घेण्याची क्षमता होती व त्या प्रत्येक घटकाच्या पालनपोषणाची जबाबदारी समाज घेत होता. असेच पुर्वी इतर बलुतेदारांचे ही असायचे. व संस्कृतीच्या ह्या खाणा खुणा सह्याद्रीच्या कानाकोप-यात आज ही पहावयास मिळतील.
अंदाजे सहा सात वर्षापुर्वी मी हिरडस मावळात काही कामानिमित्त गेलो होतो. तिथे मला आश्चर्य चकीत करणारा असा सह्याद्रीच्या प्रगल्भ व अतीश्रीमंत संस्कृतीचा पुरावाच मिळाला. तिथे एक गोपाळ भेटला. गोपाळ हे त्याचे नाव नव्हते तर त्याच्या कामावरुन त्याला व त्याच्या सारख्या अनेकांना पडलेले नाव होते. हा गोपाळ गायीं पाळणाराच होता. व त्याही पुढे जाऊन गोपाळकृष्णासारखा एक पावा म्हणजे बासरी देखील घेऊन डोंगरावर गायींना चारत होता. वीसएक गायी, काही बैल, वासरे, गो-हे असा पन्नास एक जनावरांचा कळप त्याच्या मागेपुढे चरत फिरत होता. त्याच्या डोक्यावर पांढरी टोपी होती . अंगावर साधी मळकी कपडे होती. व आणखी एक विशेष घोंगडी की जिला जागोजाग घुंगरांनी सजवले होते अशी घेउन स्वतला पाउस व थंडीपासुन वाचवुन गायींना चारत होता. त्याच्या पाव्याला देखील घुंगरं लावली होती. त्याचे नाव गाव विचारले नाही. पण त्याच्याकडुन हे समजले की मावळात अशा प्रकारचे गोपाळ गावोगाव असत. यावरुन सह्याद्रीच्या कुशीतील एकेकाळच्या श्रीमंत संस्कृतीचे पुसटशे दर्शनच आम्हाला घडले. निसर्गात गायींना चारण्यासाठी घेऊन जाणे व बासरी वाजवणे, संगीत साधना करणे, निसर्ग व स्वतच्या गायी यांच्याशी एकात्मभाव स्थापित करणे हा तर हेतु नसेल ह्या गोपाळांचा?
लेखाच्या शेवटी दिलेल्या पेजवर जाऊन या गोपाळाचा पावा वाजवतानाचा व्हिडीयो अवश्य पहा.

Friday, July 14, 2017

धर्म म्हणजे काय?

(मूळ: धरणे किंवा बंधून राहणे, सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे): सामाजिक रित्या संघटित मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व वितर्कीय कल्पनांचा संग्रह जोपर्यंत त्याचा निसर्गातअस्तित्वात असलेल्या गोष्टींशी (उदा. व्यक्ती, वस्तू, विश्वे, इत्यादि) निगडित असण्याचा दावा असतो. –


महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी तो धर्म. '
धर्म ही एकच संकल्पना अशी आहे की जिने आजपावेतो जगात सुख व शांतता व समाधान, करोडो लोकांस दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म म्हणजे काय हे जाणुन घ्यायचे असेल तर आधी या शब्दाच्या उगमाकडे जावे लागेल. आपण धर्म म्हणजे काय हे जाणुन घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्वात आधी एक मिथक आपण तोडले पाहीजे , ते म्हणजे, धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्य भाषेत समानार्थी शब्द नाही. धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा आंल्ग शब्द basic instict हा आहे.तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णु शकत नाही. त्यामुळे पुढे वाचण्यापुर्वी हे पक्के लक्षात असुद्या की धर्म या शब्दाविषयी जाणुन घेताना भारतीय दृष्टीकोनातुनच पाहीले पाहीजे. दुसरे एक मिथक आपण समुळ नष्ट केले पाहीजे. ते म्हणजे धर्म म्हणजे रीलीजन. रीलीजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. रीलीजन हा शब्द कोणत्या भारतीय शब्दाचा समानार्थी शब्द आहे हा ह्या लेखाचा विषय नाही. असो, तर मग आपण दोन गोष्टी नीट समजुण घेतल्या असतील तर धर्म म्हणाजे काय याकडे आपणास पाहता येईल व्व समजुन घेता येईल. तर पुन्हा एकदा ह्या दोन खुळचट समजुती आपण पाहु...खूळचट समजुत १.- रीलीजन म्हणजे धर्म ....खुळचट समजुत २.- सर्व धर्म समान असतात (ही एक खुळचट समजुत आहे असे म्हणण्याचे कारण असे की अधिकांश लोकांना धर्म म्हणजे हे माहीत नसताना ते धर्म या विषयावर काथ्याकुट करण्यात अग्रेसर असतात)
आता धर्म म्हणजे काय याकडे पाहु.
वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. ज्या विशिष्ट गुण विशेषा मुळे एखाद्या वस्तु, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झालेले असते त्या गुण विशेषास धर्म असे म्हणता येईल. याचे कारण धृ म्हणजे धारण करणे या संस्कृत धातुचा आधार जरी घेतला वस्तु, जीवाने धारण केलेल्या गुणविशेषास धर्म म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मुळ अर्थ काय आहे? व हा अर्थ सहज समजेल अशा बोली भाषेत सांगता येईल का? तर याचे उत्तर आहे, हो! सहज सोप्या भाषेत या शब्दाचा अर्थ सांगता येईल व समजुन देखील घेता येईल. तर काय आहे हा अर्थ?
सह्ज समजेल अशा भाषेत सांगायचे तर धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती. धर्म म्हणजे उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभुत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभुत गुणविशेष हे बाहेरुन आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. याची काही उदाहरणे पाहील्यावर आपणास याचा नेमका अर्थ काय आहे हे समजेल.
उदा १ - वस्तु - पाणी व या वस्तुचा अंगभुत गुण - शीतलता
उदा २- वस्तु - हवा व या वस्तुचा अंगभुत गुण - चंचलता
उदा ३ - वस्तु - अग्नि व या वस्तुचा अंगभुत गुण - दाहकता
उदा ४ - वस्तु- पाषाण - व या वस्तुचा अंगभुत गुण - जडता
वरील उदाहरणे निर्जीव एककांची आहेत. आता सजीवांची काही उदाहरणे पाहुयात
उदा १ - वाघ - भुक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासुन संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे.(भुक भागवण्यासाठी , अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे)
उदा २ - वाघ - जीवाच्या आकांताची, कितीही भुक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजलेजरी असेल तरीही वाघ गवत खात नाही.(अखाद्य न खाणे)
उदा ३ - गाय वासरु - वात्सल्य
उदा ४ - गरुड - विहंगम करणे
उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे
वरील काही उदाहरणे प्राण्यांची पाहीली , आता आपण मनुष्याशी निगडीत काही उदाहरणे पाहुयात
उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारीके मध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थे मध्ये असतो. पण एकदा का ती कुमारीका प्रसुता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरीक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. पण जोपर्यंत ममत्वाचा आविर्भाव होत नाही तोपर्यंत त्या कुमारीकेस ममत्व म्हणजे काय हे कितीही निबंध लिहुन कुणी समजावु जाईल तरीही तिला समजणास नाही. ममत्व , मातृत्व ही स्त्री मधील उपजत सहज अंगभुत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याची उस्फुर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय.
उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, वडील झाल्यावर(म्हणजे त्याला अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागलेली असते, त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतच्या दिनचर्या तसेच सामाजिक चरीत्रामध्ये एक विशिष्ट बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मुलभुत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी उस्फुर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास जो कर्तव्यबोध होत असतो त्यास पितृ धर्म असे म्हणतात.
उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म
उदा ४- मित्र - मित्र-धर्म
उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म
वरील उदाहरणे मनुष्याशी निगडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्माचे आचरण करु शकतो. तो मनुष्य कोणत्या भुमिके मध्ये आहे यावर अबलंबुन आहे तो त्या प्रसंगी कोणत्या धर्माचे पालन करील. उदाहरण दाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवी घेऊ. एक शासक म्हणुन तिला राजधर्म पाळायचा होता व भल्लाल ची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडुन राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते? तर राजधर्माचे नीट पालन. कोणत्या ही पुर्वग्रहाशिवाय तिने बाहुबली व त्याची पत्नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी, एक शासक या नात्याने द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरुन आहे ते करणे म्हणजे त्या त्या परीस्थीतील धर्म होय.
वरील सर्व विवेचनावरुन किमान एक संभ्रम्म तरी दुर व्हावा. की धर्म म्हणजे रीलीजन नाही. धर्म व रीलीजन, अगदीच काय तर सांप्रदाय यांचा दुर दुर पर्यंत संबध नाहीये. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभुत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदीत सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.

Monday, July 10, 2017

नाच्या बेडुक


नाच्या बेडका विषयी दोन तीन वर्षापुर्वी वाचले होते. परवा आपल्या निसर्गशाळा कॅम्पसाईट परीसरात हा बेडुक प्रत्यक्ष पाहाण्याचा योग आला. यशदिप आणि जेवण आटोपुन पसायदाना विषयी एक ऑडीयो ऐकत झोप येण्याची वाट बघत होते. कॅम्पिगला आलेले लोक देखील कॅम्पफायर भोवती गराडा करुन गप्पा टप्पा मध्ये मग्न होते. आमच्या किचन शेड वर नळीचा पत्रा आहे. अचानकच पावसाची एखादी सर यायची आणि आमच्या डोक्यावर (पत्र्यावर) ताशा वाजवुन जायची. असा हा ताशाचा आवाज थोडा कमी झाला की मग मात्र एक विशिष्ट आवाज दुरवरुन कानावर येत होता. चालबध्द, लयबध्द उच्च स्वरात म्हणजे अगदी खर्जातला वाटावा असा हा आवाज लक्ष वेधुन घेत होता. सोबतीलाच अनेक वेगवेगळे आवाज येत होते. पण त्यात एकतानता होती. साद होती, तर प्रतिसाद देखील होती. आम्ही दोघांनी या आवाजांच्या दिशेने जायचे ठरवले व फोन आणि टॉर्च घेऊन त्या आवाजाच्या दिशेने निघालो. आमचा शोध कॅम्पसाईट शेजारच्या भाताच्य खाचरात संपला. त्या खाचरात शेकडो बेडुन होते. वेगवेगळ्या जातींचे. (प्रजातींचे योग्य शब्द आहे.) त्यातल्या त्यात ज्या आवाजाचा पाठलाग करत आम्ही आलो तो आवाज व त्या आवाजाचा उदगाता तो बेडुक देखील दिसला. याला नाच्या बेडुक म्हणतात. सोबत दिलेल्या वेबसाईटच्या पेज वर जाऊन त्याचा व्हिडीयो पाहता येईल. नाच्या बेडुक हे त्याच्या द डान्सींग फ्रॉग या इंग्रजी नावाचे स्वैर भाषांतर आहे. अंदाजे दोन तीन वर्षापुर्वीच शास्त्रज्ञांना अशा प्रजातीचा बेडुक असतो हे समजले. त्याच्या विशिष्ट प्रकारे पाय हलवण्याच्या व आपटण्याच्या सवयी मुळे त्या प्रजातीस सर्रास डान्सींग फ्रॉग असे बोली भाषेतले नाव पडले. तर हा नाच्या बेडुक दिसला आणि त्याचे ते खर्जातले गाणे गाताना त्याचे आविर्भाव व त्याचा नाच देखील दिसला. सोबतच्या लिंकवर क्लिक करुन अवश्य हा व्हिडीयो पहावा.


त्यानंतर ह्या बेडकाविषयी जरा अधिक माहीती शोधण्याचा प्रयत्न केला व आणखी एक अचंबित करणारी माहीती पुढे आली. बेडकाची ही विशिष्ट जात ८५० लक्ष वर्षापुर्वी अस्तित्वात आली असा अभ्यासकांचा दावा आहे. म्हणजे माणुस नावाचा प्राणी अस्तित्वात येण्याच्या कित्येक लाखो वर्षे आधी ही बेडकाची प्रजात अस्तित्वात आली.  प्रियराधनासाठी हा बेडुक पायाच्या हालचाली करतो असे अभ्यासकांना सुरुवातीस वाटले. नतर च्या अभ्यासातुन हे समजले की समागमासाठी तो नाचत नाही तर, मादीपासुन इतर अन्य नर बेडकांना हाकलुन लावण्यासाठी हा पायाचा उपयोग करतो. अगदी पैलवानाने षडडु ठोकावा तसा काहीसा प्रकार आहे. षड्डु ठोकुन ही प्रतिस्पर्धी नर ऐकत नसेल तर मग लत्ताप्रहार (म्हणजे लाथ मारणे) हा प्रयोग करावा लागतो. समागमानंतर, हा बेडुक नर आणि मादी दोघे ही पुन्हा भुमिगत होतात. व पुन्हा पुढच्या वर्षी फक्त दोन आठवड्यांसाठी जमीनीच्या पृष्टभागाच्या वर येतात. म्हणजे जवळजवळ १२ ही महीने हे झोपतात. यांचे जीवनमान किमान ८ ते १६ वर्षांचे असु शकते.

सध्याची स्थिती अशी आहे की, वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे ह्या जातीचे तसेच बेडकाच्या अन्य ही अनेक जातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
मला ज्ञात असलेला एकच देव आहे. तो म्हणजे निसर्ग. ह्या देवाची लिला अपरंपार आहे. किती विविधता आहे पहा या विश्वाच्या पसा-यात. कुणी शाकाहारी तर कुणी मांसाहारी. कुणी पाण्यात राहणारे तर कुणी पाण्या बाहेर राहणारे. तर कुणी कुणी पाण्यातही आणि पाण्याबाहेर ही राहु शकणारे. निसर्गाचे चक्र अव्याहतपणे फिरते आहे. निसर्गातील अन्न साखळी स्वयंचलीत आहे. किमान अजुन तरी आहे. वाढत्या मानवी हस्तक्षेपाने ह्या अन्नसाखळीतील काही कड्या तुटावयास आलेल्या आहेत. वाढत्या अन्नाची गरज, नवनवीन शेतजमीन तयार करण्याची गरज,  पाण्याचे प्रवाह बदलण्याची गरज, फार्महाऊस साठी जमीन सपाटीकरण करीत पर्यावरण परीस्थितीकीला बदलण्याची गरज, उत्पादन वाढीसाठी व किटनियंत्रणासाठी विषारी खते व औषधांची गरज, या अशा अनेक कारणांमुळे नाच्या बेडकासारख्या असंख्य जीवांचे अस्तित्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे.

देवाने मानवास पृथ्वीवरील एक सहचर म्हणुन बनविला, पण माणुस स्वतःस या पृथ्वीचा स्वामी समजु लागला आहे. व याच्याच परीणामी, स्वतच्या फायद्यासाठी सृष्टीचे अव्याहत पणे शोषण मनुष्य करतो आहे.  नाच्या बेडकासारख्या असंख्य प्रजाती असतील. इतर अनेक प्राण्यांच्या देखील असतील. व काही संपुष्टात देखील आल्या असतील. व सांप्रत या सर्वास जबाबदार मनुष्यच आहे. चंगळवाद व उपभोगवादाच्या दुष्टचक्रात अडलेल्या आधुनिक माणसाला हे समजत देखील नाही की त्याचा निसर्गातील आततायी हस्तक्षेप एक दिवस त्यालाच संपुष्टात आणेल.

ह्या दुष्टचक्रातुन सुटका करुन घ्यायची असेल तर मुल्यांची पुर्नस्थापना करणे गरजेचे आहे. "इदं न मम" ह्या व अशा अनेक प्राचीन मुल्यांना प्रतिष्टा प्राप्त करुन देणे गरजेचे आहे. "मी" चा म्हणजे "अहं"चा उत्तरोत्तर विकास होत गेला पाहीजे. हा देहाधारी मी (अहं ब्रम्हास्मी), कालौघात व संस्कारांत व्यक्ति, व्यष्टीच्या पुढे गेला पाहीजे. व्यष्टीकडुन त्याने समष्टी(समाज) झाले पाहीजे व समष्टीकडुन सृष्टीमध्ये त्याचा अहंकार विलीन झाला पाहीजे. ही सृष्टी म्हणजेच मी आहे असा अनुभव मनुष्यास आला पाहीजे. याला आपल्या संस्कृतीमध्ये एक सुंदर वाक्य वापरलेले आहे. "सर्व खल्विदं ब्रम्ह"...हे सर्व जगच ब्रम्ह आहे.  असा अनुभव म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन एकाच जाणिवांच्या पातळीवर किंवा हवे तेव्हा हवे तसे हव्या त्या जाणिवेच्या पातळीवर जाऊन हव्या त्या प्राणीमात्राच्या जाणिवा जाणता येणे व सहवेदना सहन करणे, असे तर नसेल?  आपण सगळे एकच आहोत. माझ्यात , तुझ्यात, सर्वांच्या अंतरी, सर्व प्राणीमात्रांत तीच एक चेतना विद्यमान आहे. हा समान धागा पकडुन आपण म्हणजे मनुष्य स्वामी नसुन सृष्टीतील इतर सर्व जीवांचा(प्राणी आणि वनस्पती) एक सहचर आहे हा संस्कार माणसामाणसावर करता येईल का?. त्यातुन मग शोषणाची वृत्ती नाहीसी होऊन आवश्यक तेवढेच व इतरांस कमीतकमी अपाय  होऊन मिळेल तेवढेच निसर्गाकडुन घेण्याची सहज, उपजत प्रवृत्ती (म्हणजे धर्म) रुढ होईल.

खरच हे अवघड आहे का?

असो, विषयांतर झाल्यासारखे वाटले असेल कदाचित आपणास हे सर्व वाचताना. सुरुवातीस पर्यावरण, निसर्ग आणि शेवटास अध्यात्म. जर आपणास असे वाटले असेल की विषयांतर झाले तर आज किमान हे नक्की शिका की निसर्ग आणि अध्यात्म वेगळे नाही. निसर्गाच्या कणाकणात अध्यात्म आहे. प्रत्येक जीव (मनुष्य देखील) एका अज्ञात, निनावी , अनाकलनीय अशा सुप्त जिज्ञासेने पछाडलेला आहे. प्रत्येकास काही ना काही मिळवायचे आहे. कशाची तरी कमतरता आहे. प्रत्येक सजीव अविरत जीवंत राहण्याचा अटोकात प्रयत्न करताना दिसतो. जीवंत राहण्यासाठी खटाटोप सुरु आहे. अहोरात्र सुरु आहे. पण जीवंत का राहायचे? ह्याची उकल काही कुणालाच झालेली नाही. व ती याची देही याची डोळा होईल असे वाटत ही नाही कारण जीवंत काअ राहायचे? हा प्रश्नच जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत त्याचे उत्तर शोधण्याची किंवा मिळवण्याची सुतराम शक्यता नाहीये. संघर्ष, अपार कष्ट, प्रेम, मैथुन , निद्रा व कारण माहीत नसताना जीवंत राहण्याचा आग्रह व त्यासाठीचे कष्ट, ही सगळी लक्षणे त्या नाच्या बेडकाची आहे. आणि मनुष्याची देखील आणि चराचरातील सर्व प्राणीमात्रांची देखील आहेत. आणि हा बेडुक तर माणसापेक्षा कित्येक शेकडो वर्षे आधी पृथ्वीवर अस्तित्वात आला आहे. त्याच्याकडे जास्त अनुभव आहे व तो अनुभव पुढच्या पिढ्यांकडे सोपवला जात आहे. व ह्या सर्व क्रियाकलापाचा हेतु जर त्या न पडलेल्या प्रश्नाची उकल करणे हा असेल तर हा बेडुक माणसापेक्षा नक्कीच जास्त जवळ पोहोचला असेल त्या उत्तराच्या.  त्यामुळे विषयांतर अजिबात नाही. आपल्यातील चिकित्सक वृत्ती जागी व्हावी. पर्यावरण, निसर्ग हे काही आपल्यापेक्षा वेगळे काही नाहीये. आपण स्वतःच निसर्ग आहोत. इतर सर्व प्राणीमात्रांचे सहचर आहोत स्वामी हा संस्कार आपण पुढच्या पीढ्यांना देऊया.
माऊलींच्या पसायदानामध्ये परवाच एक ओवी ऐकली. त्याप्रमाणे होवो.


॥जो जे वांछिल तो ते लाहो प्राणीजात...॥

विसरु नका - वेबपेज वर जाऊन नाच्या बेडकाचा नाच आणि सुरेल गाणे जरुर ऐका.

http://nisargshala.in/amazing-kick-boxer-nisargshala/