Wednesday, September 27, 2017

पिरंगुट येथील जागृत शक्तिस्थान – तुळजाभवानी मातेचे मंदीर.


नवरात्र – जागर शक्तिचा  

शारदीय नवरात्र तसा आपणासर्वांसाठी नेमेची येणार इतर सणांसारखाच एक सण उत्सव आहे. घराघरातुन होणारी घटस्थापना, घटाची घराघरात दररोज सकाळी भराड्याने केलेली आरती, सार्वजनिक ठिकाणी मंडप, पताका लावुन , दांडीया आदी आपल्याला तसे नवीन नाही. काही गोष्टी नवीन आहेत जसे ट्राफीक ला अडथळा करुन नऊ दिवस निघणारी माळेची मिरवणुक, मंडपांमधुन सिनेमाच्या गाण्यांचा कर्णकर्कश्श आवाज, दांडीया गरबाच्या नावाखाली होणारा बीभत्सपणा… या सगळ्या बजबजपुरीमध्ये उत्सवाचे ऐतिहासिक आध्यात्मिक आणि पारंपारीक महत्व टिकवुन ते जनसामांन्यामध्ये रुजवण्याचे काम करताना कुणी दिसत नाही याची एक खंत नवरात्र सुरु झाल्यापासुन दरवर्षी जाणवते व आतल्याआत अस्वस्थ करीत असते. यावर्षी देखील असेच घडले आहे आजपर्यंत.
कालचा अनुभव मात्र खुपच वेगळा होता. काल सायंकाळी पिरंगुट येथील भवानी टेकडी वरील तुळजाभवानी मंदीरातील आरतीच्या वेळी मंदीरात उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाले. भाग्य च म्हणावे लागेल याला कारण सणाउत्सवाच्या नावाखाली सुरु असलेला आधुनिक कुरीतींना फाटा देत सार्वजनिक उत्सव कसे साजरे करावे याचे एक अतिशय छान उदाहरण पाहावयास मिळाले.  मंदीरामध्ये नवरात्रामध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी महाआरतीचा कार्यक्रम असतो व ही आरती अशा लोकांच्या हस्ते केली जाते की ज्यांनी समाजामध्ये सकारात्मक परीवर्तनासाठी मोलाचे योगदान दिले आहे. अनेकदा आपण पाहतो की दहीहंडी सारख्या उत्सवांमध्ये सिने अदाकारांना फक्त गर्दी खेचण्यासाठी आणले जाते. ५ ते १० मिनिटांचे लाख लाख रुपये समाजाच्या वर्गणीतुन गोळा केलेले पैसे असे अनाठायी उडवणारे संयोजकांच्या भाऊगर्दीमध्ये , तुळजाभवानी मंदीर विश्वस्तांनी रुढ केलेली प्रथा खरच सर्वांसाठी प्रेरणादायी, अनुकरणीय व आदर्शवत आहे, यात संदेह नाही.
काल महाआरतीसाठी आमंत्रित केलेले पाहुणेदेखील खरोखर समाजामध्ये सकाअरात्मक बदलांसाठी आयुष्य झिजवलेले असे दोन-तीन दिग्गज होते. त्यातील पहीले श्री मनोज जी वर्मा. हे श्रीमान, विश्व हिंदु परीषद, बजरंगदलाचे अखिल भारतीय संयोजक म्हणजे प्रमुख आहेत. तर दुसरे म्हणजे श्रीमंत दगडुशेठ गणेशोत्सव ट्रस्ट चे विद्यमान अध्यक्ष श्री अशोक गोडसे. तिसरे होते, वेदवेदांत गुरुकुलम चे संस्थापक आचार्य मंदार येनपुरे.  असा हा त्रिवेणी संगम कालच्या आरतीच्या वेळी झालेला. सेवा सुरक्षा आणि संस्कार हे ब्रीद असलेल्याअ बजरंग दलाचे मुळशी तालुक्यातील कामाची मुहुर्तमेढ देखील कालच रोवली गेली. दुर्गा मातेने सतत नऊ दिवस नऊ रात्री युध्द करीत असुरांचे निर्दालन केले त्यामुळेच स्त्री शक्तीच्या जागराचे प्रतीक म्हणुनच नवरात्र साजरी केली जाते. दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी हातात शस्त्र धारण करणा-या आई दुर्गेच्या प्रेरणे ने तरुणांना राष्ट्र निर्माणासाठी देववंदने सोबतच राष्ट्रवंदनेचा संस्कार करणा-या बजरंग दलाचे कार्याचा आरंभ नवरात्रीच्याअ मुहुर्तावर व्हावा याअत नक्कीच दैवी संकेत आहे यात शंका नाही. मतांच्या राजकारणापायी आजपर्यंत झालेले मुस्लीम तुष्टीकरण, असमान नागरी कायदे यासारख्या अनेक गोष्टींनी आजपर्यंत भारतात मुस्लीम धर्मांधतेचा देखील असुरच केला आहे. तसेच ख्रिस्ती धर्मप्रसारक देखील प्रलोभन आणि दहशत यांच्या बळावर सर्रास मतपरीवर्तनाचे काम करीत आहेत. व दोघेही आसुरी शक्तींचे प्रतीक आहेत. भारताचा आत्मा म्हणजे सांप्रदायिक सौहार्द व सांप्रदायिक स्वातंत्र्य. या सांप्रदायिक सौहार्दाच्या मुळावरच घाव करणारे हे दोन राक्षस देखील आज ठेचण्याची गरज आहे. व या कार्याचा शुभारंभ बजरंग दलाच्या अखिल भारतीय प्रमुखांच्या आशीर्वादाने व्हावा ही म्हणजे दुधात साखरच आहे.
धर्मादाय क्षेत्रात कसे काम करावे याचा आदर्श घ्यावा तो श्रीमंत दगडुशेठ हलवाई ट्रस्ट कडुन. विविध समाजोपयोगी प्रकल्प आणि वेळप्रसंगी नैसर्गिक आपत्तीमध्ये समाजासाठी धावुन जाणारी सर्वात तत्पर संस्था म्हणजे दगडुशेठ हलवाई ट्रस्ट. आता हा निव्वळ योगायोगच असावा असे नाही की जयतुळजा भवानी ट्रस्ट, पिरंगुट देखील अशाच प्रकारे कार्य गेली अनेक वर्षे सातत्याने करीत आहे. आज म्हणजे दिनांक २७ रोजी म्हणजे नवरात्रीतील सप्तमी या दिवशी जय तुळजा भवानी ट्रस्ट व मायमुळशीडॉटकॉम चे संपादक, आतंरराष्ट्रीय क्रिडा पत्रकार , लेखक प्रा. संजय दुधाने यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी सेवा पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वर्षी हा पुरस्कार राष्ट्रीय सर्वांगिण ग्रामविकास संस्थेच्या पुनम मेहता यांचा देण्यात येणार आहे. मुळशी तालुक्यात निस्वार्थ भावनेने सर्वसामान्यांच्या हितासाठी सदोदीत झटणा-या कार्यकर्त्यांस हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो. तसेच ट्रस्ट च्या वतीने सर्वज्ञ विकास प्रबोधिनीच्या अंतर्गत मुळशी तालुक्यातील तरुणांना पोलीस भरतीसाठी विनामुल्य मार्गदर्शन देखील केले जाते. मुळशी तालुक्यात आजपर्यंत असे अभिनव प्रयोग झाले नव्हते. जय भवानी ट्रस्ट ने ही प्रथा सुरु केली व यात खंड पडु दिला नाही. गेली दहा पेक्षा जास्त वर्षे अनेक प्रकारे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवण्याचे काम ट्रस्ट करीत आहे. गावागावातील चौकाचौकातील अनेक गणेशोत्सव मंडळे, नवरात्री मंडळे यांनी अनुकरण करावे असे आदर्श उपक्रम जय तुळजा भवानी ट्रस्ट करीत आहेत. का नाही प्रत्येक गावागावात, त्या त्या गावामध्ये चांगले काम करणा-या गावच्याच व्यक्तिस पुरस्कार देण्यात यावा?  असो, तर या जयतुळजा भवानी ट्रस्टच्या विनंतीस मान देऊन अशोक गोडसे सारख्या दिग्गजाने इथे यावे म्हणजे पुन्हा दुधात साखर. श्री गोडसे कडुन जय तुळजा भवानी ट्रस्ट ला नक्कीच आणखी बरेच काही शिकावयास मिळाले असणार व गोडसेंनाअ देखील जय तुळजा भवानी ट्रस्ट चे काम पाहुन आनंद झाला असेल.
कालच्या आरती मध्ये उपस्थित असलेली तिसरे व्यक्तिमत्व म्हणजे आचार्य मंदारजी येनपुरे. खरतर व्यक्तिमत्व वगैरे सारखे शब्द त्यांच्या साठी वापरले तर त्यांच्यातील साधेपणाचा अपमान होईल. संस्कृत प्रचुर, वेद वेदांताचे अधिकारी अभ्यासक, अध्यापक, साधक, मदांर स्वामींनी भारतीतील महान अशा आचार्यांकडुन वेदांताचे शिक्षण, गुरुगृही राहुन घेतले. चार भांड्यांचा संसार न करता अवघ्या संसाराची, चराचराची चिंता करण्याचा संकल्प करुन, जीवन भारतमातेच्या सर्वसाधारण कन्या पुत्रांस वेदांताचे धडे देण्याचे कार्यास आरंभ केला. मुळशी तालुक्यात, चिंचवड या त्यांच्याच गावी, स्वतच्याच शेतजमीनीमध्ये गुरुकुलाची मुहुर्तमेढ रोवुन , येतील त्यांच्यासह आणि न येतील त्यांच्या शिवाय हा अवलिया अनेक वर्षे झपाटल्या सारखा कार्यरत आहे. नित्याचा स्वतचा वेद वेदांताचा अभ्यास , लौकीक सुखांचा त्याग, एक प्रकारे सर्वसंग परीत्यागच. पण समाजासाठी असणा-या प्रेमापोटी समाजामध्ये येऊन समाजाच्या उत्थानाचे काम करणारे आचार्य मंदारजींच्या हस्ते देखील काल आरती झाली. एकुणच काय तर काल पिरंगुटच्या भवानी टेकडीवर धर्मरक्षण, सेवाभाव आणि अध्यात्म या क्षेत्रात काम करणा-या तीन दिग्गजांचा त्रिवेणी संगमच झाला होता.
महाआरती सुरु होण्यापुर्वीच मी मंदीरात पोहोचलो होतो. प्रमुख पाहुणे अद्याप पोहोचायचे होते. मंदीरात सुरेल भजनाचा कार्यक्रम सुरु होता. पंचक्रोशीतील अनक भजनकरी, वादक, गायक वारकरी पंरपरेमधील कर्णमधुर भक्तिरसाने ओतप्रोत अशा भजनांची मालिका सादर करीत होते. भक्त भाविक मोठ्या आस्थेने मंदीरात येत, भक्तिभावाने मातेचे दर्शन घेऊन सभामंडपाअमध्येच भजनाच्या सुरांमध्ये हरवुन जात. हळु हळु सभामंडप भक्त भाविकांच्या गर्दीने भरुन जाऊ लागला. गर्दी वाढत होती व गर्दी नियमनाचे काम, स्वयंसेवी वृत्तीने तालुक्यातीलच तरुण-तरुणी निस्वार्थ भावनेने करताना देखील दिसत होते. हे सर्व स्वयंसेवक पोलीस भरती प्रशिक्षणासाठी टेकडीवर नित्याने येणारे, मैदानी खेळ खेळणारे आणि पुस्तकी अभ्यास करणारे देखील होते. हे सर्व स्वयंसेवक अतिशय नम्रतेने व्यवस्था सर्व व्यवस्था पाहत होते.

आजच्या आरतीचे प्रमुख पाहुणे मनोज जी वर्मा मंदीरामध्ये, त्या पाठोपाठ अशोक जी गोडसे देखील पोहोचले लगेच. आचार्य मंदार जी येनपुरे आधीच भजनी मंडळींमध्ये बसुन भजन गाण्यात तल्लिन झाले होते. ज्ञानबा तुकारामच्या गजराने भजनाची सांगता झाली व सर्व जण बसल्या जागेवर उठुन उभे राहीले. आरती लाअ सुरुवात होणार होती.  आरती म्हणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांच्या हातात माईक होता ते सर्व ट्रस्ट चे कार्यकर्तेच होते. ज्ञानेश्वर पवळे, संदीप सातव, सचिन पवळे, पखवाज वादक येनपुरे (ढोल घेऊन), रामदास पवळे, संदीप पवळे(ताशा) आणि सर्वात आकर्षक वाद्य जर कोणते होते तर ते होते संबळ. एरवी आरती म्हणण्यासाठी नेहमीचे गाणारेच पुढे असतात. इथे तसे नव्हते. ट्रस्ट चे मुख्य कार्यकर्तेच हातात माईक, वाद्ये घेऊन आरती म्हणणार होते. एखाद्या मंडळाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष यांना नियोजन, व्यवस्था करण्यातुनच वेळ मिळत नाही तर आरती स्वत कसे म्हणतील. म्हणजेच काय तर देवीच्याअ ज्या मुख्य आराधनेसाठी , उपासने साठी हा सगळा अट्टाहास सुरु होता त्या मध्ये ट्रस्टचे मुख्य कार्यकर्ते सर्वांच्या पुढे होते. संबळ, घंटानाद, ताशाचा तर्रर्र ताल, ढोलाचा ठेका आणि डोळेबंद करुन कार्यकर्त्यांच्या सर्वांगातुन आरतीच्या रुपात बाहेर पडणारा आवाज सभामंडपाला अवकाशामध्ये उंच घेऊन जातो आहे की काय असा भास व्हायला लागला. हे सगळे आवाज एकत्र येऊन एक वेगळाच नादब्रम्ह जन्म घेत होता.व या नादब्रम्हामध्ये सर्व भाविक, गायक, वाद्य वाजवणारे, आरतीचे ताट हातात घेतलेले पाहुणे, स्वयंसेवक अगदी देहभान हरवुन गेले होते. हातात माईक घेऊन महाआरती गाणारे ट्रस्ट चे कार्यकर्ते आरती प्रत्येक शब्दाशी एकरुप झाले होते. देहभान हरवणे काय असते ते या आरती म्हणणा-या कार्यकर्त्यांना पाहील्यावर समजते. ह्या आरती मध्ये संगीताच्या भाषेतला सुर ताल फारसा नव्हता. पण महादेवीच्या रौद्र रुपाची उपासना करण्यासाठीचा रौद्रभाव नक्कीच होता. साक्षात शिव शंकर प्रकट होऊन तांडव करु लागतील असा वीर रस ह्या आरती मध्ये होता. जसे माईक हातात घेऊन आरती म्हणणारे देहभान हरवले होते तसेच सर्व भक्त भाविक देखील देहभान हरवुन गेले होते. इथे मी प्रकर्षाने अनुभव घेत होतो माझ्यातील समष्टीचा. मी समष्टी आहे असा अनुभव मला येतो होता. सर्वांची विभक्त भिन्न भिन्न मने एका सामुदायिक मनामध्ये विलीन झाली. एकत्वाचा हा अनुभव म्हणजे देवत्वाची अनुभुतीच आहे. व ही अवस्था अशीच राहावी असे वाटु लागले तर नवल ते काय, पण यथावकाश आरतीचे १०-१५ मिनिटे मंत्रमुग्ध होऊन सरले. संबळाचा ध्वनी थांबला, ताशाचा तांडव थांबला, घंटेचा नाद थांबला, माईक मधुन  आरती गाणा-यांचा सुर थांबला व शिल्लक राहीला तो फक्त भक्तिभाव. शिल्लक राहीली एकत्वाची अनुभुती.
एकंदरीत असा अनुभव मिळणे म्हणजे भाग्याचे आहे. काही मंदीरांमध्ये भक्तिभाव जागृत आपोआप होतो, जसे तुळजाभवानी चे तुळजापुरचे मंदीर, कानड्या विठ्ठलाचे पंढरपुर येथील मंदीर. पण तपश्चर्येच्या जोरावर, स्वच्छ चारीत्र्याच्या जोरावर , पारदर्शक कारभाराच्या जोरावर, पिरंगुट मधील तरुणांनी भवानी टेकडीवरील तुळजाभवानी मंदीर देखील एक जागृत देवस्थान बनविले असे म्हंटल्यास वावगे होणार नाही.
बजरंग दलाच्या तालुक्यातील कार्यास ह्या जागृत तुळजाभवानी मातेने आशीर्वाद दिलाय. बजरंग दलाचे तालुक्यातील धर्मरक्षण व संवर्धनाचे काम भवानी मातेच्या आशीर्वादाने यशस्वी होईल यात देखील शंका नाही.


श्री. हेमंत ववले,
भरे गाव

No comments:

Post a Comment